-->
पावसाचा मुक्काम वाढला

पावसाचा मुक्काम वाढला

संपादकीय पान सोमवार दि. ०४ जुलै २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
पावसाचा मुक्काम वाढला
जूनच्या मध्यानंतर धीमेगतीने सुरु झालेला पाऊस आता चांगलाच स्थिरावला आहे. पावसाने आपला मुक्काम सध्या तरी वाढविल्याचे सुखकारक चित्र आपल्यासमोर आहे. कोकणात तर पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. परंतु सर्वच राज्यातील बहुतांशी भागात पावसाने आता आपले अस्तित्व दाखविले आहे. त्यामुळ दुष्काळामुळे हैराण झालेली जनता आता पावसाच्या पहिल्या वृष्टीमुळे सुखावली आहे. यावर्षी दुष्काळाने हैराण झालेल्या लातूरमध्ये तर ढगफुटी आल्याने वाईटातून चांगले अशी भावना लातूरकरांनी व्यक्त केली आहे. एकूणच पाहता आता संपूर्ण राज्य चिंब भिजले आहे. जलयुक्त शिवाराने मग ते सरकारी काम असो वा विविध संस्थांच्या प्रयत्नाने केलेले काम असो झालेल्या कामांमुळे पाणी त्यात अडवून जिरविण्याची प्रक्रिया आता सुरु झाली आहे. मुंबई-ठाण्यात तर गेले तीन दिवस पावसाने धुमाकूळ घातला आहे. या दोन्ही महानगरातील जनजीवन पावसाने मोडकळीस आले आहे. मुंबईची जीवनवाहिनी असणार्‍या लोकलच्या अनियमीतपणामुळे मुंबईकरांची पार दैना उडाली असली तरी आलेल्या या पावसाने सर्वांनाच दिलासा दिला आहे. मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचल्याने मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाचे व तिथे सत्ता असणार्‍या शिवसेना-भाजपाचे एकूणच कार्यक्षमतेचे पितळ उघडे पडले आहे. कोकण किनारपट्टीवर तर गेले आठ दिवस सूर्यप्रकाश नाही. पावसाने जोरदार मुसंडी मारत शेतकर्‍यांना मोठा दिलासा दिला आहे. या पावसामुळे शेतीच्या कामाला तर अनेक भागात पेरणीच्या कामाला जोर आला आहे. रायगड जिल्ह्यात सर्वत्र पावसाची संततधार सुरु असून सावित्री, भोगावती, अंबा, कुंडलिका या नद्या धोक्याच्या पातळीवर पोहोचल्या आहेत. महाबळेवरमध्ये तर १९५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सावित्री नदीचे पाणी महाडमध्ये शिरले आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक अजूनही स्थिर चालू आहे. तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे कोकण रेल्वेला अजूनही या पावसाचा फटका बसलेला नाही, ही बाब सुखद म्हटली पाहिजे. पावसाचा हा जोर कोकणात अजून काही दिवस राहाणार असा अंदाज आहे. या पावसामुळे सर्वांनाच दिलासा मिळाला आहे, मात्र अजूनही बराच पाऊस शिल्लक आहे. आता कुठे पावसाची सुरुवात आहे. शेतीच्या कामाला आत्ताच कुठे सुरुवात झाली आहे. त्यादृष्टीने सध्याचा पाऊस थोड्याफार अंतराने का होईना पुन्हा आला पाहिजे. यावर्षी दुष्काळग्रस्त भागात पावसाने सध्यातरी दिलासा दिला असला तरी तेथेही अजून बराच पाऊस होणे बाकी आहे. अजूनही राज्यातील अनेक धरणांच्या परिसरात मोठा पाऊस झालेला नाही. भविष्यात तो होईल व सर्व धरणे तुडुंब भरतील असे सध्याचा पाऊस पाहता आपण म्हणू शकतो. पडलेला हा पाऊस आता साठवून ठेवणे व तो जमिनीत झिरपविणे ही एक मोठी जबाबदारी आहे. यासाठी आखलेल्या सरकारी योजना कितपत यशस्वी ठरल्या हे पुढील काळात समजेलच. कोकणात पडलेला पाऊस अजूनही थेट अरबी समुद्रात जाऊन मिळतो. ते पाणी अडविल्यास संपूर्ण महाराष्ट्र कायमचा ओला राहू शकतो यासाठी प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे.

0 Response to "पावसाचा मुक्काम वाढला"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel