-->
नरेंद्र मोदींच्या मुलाखतीचा फार्स

नरेंद्र मोदींच्या मुलाखतीचा फार्स

रविवार दि. ०३ जुलै २०१६ च्या मोहोरसाठी लेख --
-------------------------------------------
नरेंद्र मोदींच्या मुलाखतीचा फार्स
---------------------------------------
एन्ट्रो- पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आता माध्यमांशी संवाद जवळपास नसतोच. अर्थात तसा संवाद ठेवावाच असे काही गरजेचे नाही. परंतु मोदी पूर्वी मनमोहनसिंग यांच्यावर याबाबतीत टीका करीत होते त्यामुळे त्यांना माध्यमांशी संवाद ठेवणे गरजेचे होते, म्हणजे मनमोहनसिंग यांच्यापेक्षा आपण वेगळे आहोत असे त्यांना दाखविण्याची संधी होती पण आता सत्तेत आल्यावर त्यांना त्याची गरज वाटत नाही. नुकतीच मोदी यांनी एक मुलाखत टाईम्स नाऊ या खासगी वाहिनीला दिली आहे. अर्थातच ही मुलाखत ही पेड असणार त्यात काहीच शंका नाही. कारण या मुलाखतीची वेळ व त्यातील मुद्दे पाहता ही मुलाखत शंभर टक्के पेड होती. त्यामुळे पंतप्रधानांची ही मुलाखत म्हणजे त्यांनी देशातील सर्व माध्यम प्रतिनिधींशी साधलेला संवाद नव्हे. मात्र निदान आपली मुलाखत पैसे खर्च करुन देण्याची गरज मोदींना का बरे वाटली?
-------------------------------------------
पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळी कॉँग्रेसच्या विरोधात निवडणुकांपूर्वी बोंबाबोंब करीत देशभर फिरत होते त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग हे पत्रकारपरिषदा घेत नाहीत, माध्यमांशी संवाद साधत नाहीत अशी टीका सातत्याने करीत. आता मोदी पंतप्रधानपदी आरुढ झाल्याला दोन वर्षे लोटली आहेत. मात्र मोदींनी एकही खुली पत्रकारपरिषद घेतलेली नाही. आपल्या विदेश दौर्‍यात आजवर पत्रकारांना नेण्याची प्रथाही त्यांनी बंद केली आहे. त्यामुळे मोदींचा आता माध्यमांशी संवाद जवळपास नसतोच. अर्थात तसा संवाद ठेवावा असे काही गरजेचे नाही. परंतु ते पूर्वी मनमोहनसिंग यांच्यावर टीका करीत होते त्यामुळे त्यांना माध्यमांशी संवाद ठेवणे गरजेचे होते, म्हणजे मनमोहनसिंग यांच्यापेक्षा आपण वेगळे आहोत असे त्यांना दाखविण्याची संधी होती पण आता सत्तेत आल्यावर त्यांना त्याची गरज वाटत नाही. नुकतीच मोदी यांनी एक मुलाखत टाईम्स नाऊ या खासगी वाहिनीला दिली आहे. अर्थातच ही मुलाखत ही पेड असणार त्यात काहीच शंका नाही. कारण या मुलाखतीची वेळ व त्यातील मुद्दे पाहता ही मुलाखत शंभर टक्के पेड होती. त्यामुळे पंतप्रधानांची ही मुलाखत म्हणजे त्यांनी देशातील सर्व माध्यम प्रतिनिधींशी साधलेला संवाद नव्हे. मात्र निदान आपली मुलाखत पैसे खर्च करुन देण्याची गरज मोदींना का बरे वाटली? यामागेही निश्‍चितच काही कारणे आहेत. एक महत्वाचा मुद्दा म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून सरकारविरोधी वातावरण तयार होत आहे. प्रामुख्याने रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारल्यामुळे सरकारची एक प्रकार जगातच इज्जत गेली आहे. भाजपाचा मोठ्या संख्येने मतदार असलेल्या शहरी मध्यमवर्गीयाने सोशल मिडीयात याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. तसेच एन.एस.जी. प्रकरणी सरकारने एक जे वातावरण तयार केले होते त्याचा फुगा फुटल्याने मोदींसह सर्व भाजपाच्या लोकांचे अचानक पाय जमिनीवर आले आहेत. चीनच्या पंतप्रधानांशी झोके घेत गप्पा केल्या म्हणजे आपण चीनला खीशात घातले या थाटात मोदी वागत होते. मात्र चीनने आपल्यालाच एन.एस.जी. प्रकरणी विरोध केला आणि सगळेच भाजपावाले बसकन जमिनीवर आले. खरे म्हणजे यापूर्वी कॉँग्रसेच्या राजवटीत एन.एस.जी.मध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु त्यावेळी देखील हा प्रयत्न फसला होता. त्याचा फारसा गवगवा झाला नव्हता. मात्र यावेळी मोदींनी त्याची एवढी हाईप केली होती की आता जणू काही मोदी जगाला आपल्या खिशात ठेवणार आहेत. त्यांची ही सर्वच गणिते बिनसल्यामुळे सत्ताधार्‍यांचा भ्रमाचा भोपळा फुटला. या सर्व पार्श्‍वभूमीवर मोदींनी आपली बाजू मांडण्यासाठी ही मुलाखत दिली होती. त्यांनी जर सर्वच पत्रकारांची पत्रकारपरिषद आयोजित केली असती तर त्यंाना पाहिजेत ते मुद्दे प्रकर्षाने मांडता आले नसते. असो. या मुलाखतीत मोदींनी एन.एस.जी. संबंधी मते मांडली परंतु हा विषय जास्त न लांबविता राजन यांच्याबाबतीत शंका व्यक्त करणे चुकीचे आहे असे म्हटले आहे. यात त्यांनी सुब्रम्हण्यम स्वामींना फटकारले आणि राजन यांना घालविण्यात आपला हात नाही हे दाखवून दिले. परंतु त्यांना जर राजन पाहिजे होते तर त्यांनी त्यावेळीच आपली भूमिका स्पष्ट मांडून राजन यांना राहाण्यास सांगणे आवश्यक होते. परंतु त्यांनी तसे केले नाही. त्यामुळे मोदी या प्रश्‍नी उघडे पडले आहेत. देशांतर्गत प्रश्‍नांविषयी बोलताना त्यांनी, जीएसटी विधेयक राज्यसभेतही लवकरच मंजूर होईल, हे सांगताना हे विधेयक कॉंग्रेसच्या मदतीशिवाय मंजूर करण्याची तयारी सुरू असल्याचे संकेत त्यांनी दिले. काळ्या पैशांविषयी कॉंग्रेसने एसआयटी नेमण्यास उशीर केला आणि आपण सत्तेवर येताच ती नियुक्त केली. त्यामुळे परदेशात गेलेला काळा पैसा परत आणण्यात आणि काळा पैसा निर्माणच होणार नाही, अशी व्यवस्था आणण्यात आपण कटिबद्ध आहोत, याचा त्यांनी पुनरुच्चार केला. पण हे आपण कसे करणार, हे मात्र त्यांनी स्पष्ट केलेले नाही. काळा पैसा विदेशातून आणण्याबाबतही त्यांनी थातूरमाथूर उत्तरे दिली. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत जातीयवादाचा संबंधच येत नाही, विविध समस्यांवर विकास हेच उत्तर आहे, हे मोदींचे विधान म्हणजे उत्तरप्रदेशात जातीयतेचे राजकारण करुनच निवडणुकीचे डाव आखले जातील यात काही शंका नाही. एकूणच पाहता मोदींची ही एकमेव चॅनेलला दिलेली ही मुलाखत म्हणजे त्यांच्या पी.आर. एक्सरसाईजचा भाग होता. कारण एरव्ही प्रश्‍नांची सरबत्ती करुन मुलाखत देणार्‍याला भंडावून सोडणारे अर्णव गोस्वामी या मुलाखतीत मात्र फारसे आक्रमक दिसत नव्हते. तसेच मोदींना त्यांनी फारसे बुचकळ्यात टाकणारे प्रश्‍नही विचारले नाहीत. त्यामुळे मोदींच्या या मुलखतीचा हा फार्स चांगला जमला असे भाजपा नेत्यांना वाटत असलेतरीही जनता दुधखुळी राहिलेली नाही हे त्यांतनी लक्षात घ्यावे.
---------------------------------------------------------------------

0 Response to "नरेंद्र मोदींच्या मुलाखतीचा फार्स"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel