-->
वाढता वाढता वाढे महागाई...

वाढता वाढता वाढे महागाई...

संपादकीय पान सोमवार दि. २३ नोव्हेंेबर २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
वाढता वाढता वाढे महागाई...
गणपती-दसरा-दिवाळीपासून स्वयंपाकघरापर्यंत पोहोचलेले महागाईचे शुक्लकाष्ठ अजूनही सामान्यांची पाठ सोडायला तयार नाही. या वर्षातले ही तीनही उत्सव महागाईतच गेले. महागाई वाढता वाढता वाढतच चालली आहे. महागाई कमी होण्याची काही लक्षणेच दिसत नाहीत. दिवाळीत महागलेली तूरडाळ किलोमागे २०० रुपयांवर रेंगाळत असतानाच तांदूळही महाग झाला आहे. त्यामुळे आता डाळीपाठोपाठ भात खाणेही आवाक्यात राहाणार नाही असेच दिसते. मग आता सर्वसामान्यांनी खावे तरी काय? त्याच्याजोडीला टोमॅटोही अलीकडेच वधारण्यास सुरुवात झाली आहे. त्यात आता भाज्यांची भर पडली आहे. एरव्ही कोणाच्या खिजगणतीतही नसलेल्या भेंडीने किलोमागे ५० ते ६० रुपयांचा दर गाठला असून मेथी, पालक, कोबी, मटार यांच्या दरांनीही महागाईचा ग्राफ वाढवण्यास हातभार लावायला सुरुवात केली आहे. घाऊक बाजारात फ्लॉवर, मटार, गाजर या भाज्यांचा निर्माण झालेला तुटवडा टोमॅटो व भेंडीच्या दरवाढीला कारणीभूत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. कमी पावसामुळे देशातील शेतीउत्पादनाचे गणित यावर्षी काहीसे कोलमडल्याचे चित्र आहे. मात्र हे वाढलेले दर शेतात राबणार्‍या शेतकर्‍याला मिळत नाहीत, तर दलालांच्या खिशात भर पडते आहे. त्यामुळे ही दरवाढ हे सट्टेबाज दलालच करीत आहेत. परंतु त्यांच्या विरोधात सरकारी यंत्रणा काहीच करीत नाही. नाशिक जिल्ह्यातून संपूर्ण देशाला पुरवठा होणार्‍या कांद्याने तीन महिन्यांपूर्वी ८० रुपयांच्या भावांवर उडी घेतली होती.कांद्याच्या साठेबाजीविरोधात त्यावेळी केंद्राने वेळीच पावले उचलल्याने ही दरवाढ आटोक्यात आली. मात्र, तरीही कांद्याने झटका दिलाच होता. त्यामुळे गृहिणींचे पाकगृहाचे अर्थनियोजन फिसकटले होते. त्यातच तूरडाळीने दिवाळसणाच्या तोंडावरच दोनशेचा पल्ला गाठल्याने सामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले. उडीद डाळीनेही याच दरम्यान महागाईचे टोक गाठले. आता महागाईची ही लागण भाज्यांपर्यंत पोहोचली आहे. घाऊक बाजारात ३२ ते ३६ रुपये प्रतिकिलो दराने विकला जाणारा टोमॅटो किरकोळ बाजारात चक्क ६० ते ६२ रुपयांनी विकला जात आहे. भेंडीने तर किरकोळ बाजारात किलोमागे ५० रुपयांवर मजल मारली आहे. फ्लॉवर, कोबी, गाजर, मटार यासारख्या बाजारातील सर्वसामान्यां ताटीतील भाज्यांचे उत्पादन कमी झाल्याने ही दरवाढ झाली असल्याचे सांगितले जात आहे. लवकरच गुजरातहून फ्लॉवर, राजस्थानातून गाजर व कर्नाटकातील मटार बाजारात दाखल झाल्यानंतर भाज्यांचे दर कमी होतील, असा विश्वास व्याापारी व्यक्त करीत आहेत. कांदा, बटाटा, लसूण आणि टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाली असून या भाज्यांची आवक कमी होत असल्यामुळे त्यांचे दर वाढत आहेत. किरकोळ बाजारात टोमॅटो आणि कांद्याची विक्री ४० ते ६० रुपये किलो या दराने सुरू आहे. नागपूरसह विदर्भातही भाज्यांचे दर कडाडलेले आहेत. विदर्भात थंडीच्या मोसमात भाज्यांचे दर कमी असतात. मात्र, यंदा दर वाढलेले असल्याचे स्थानिक व्यापार्‍यांनी सांगितले. भाज्यांची ही दरवाढ कृत्रिम असण्याची शक्यता असल्याचे सांगत येत्या काही दिवसांत दर कमी होतील, असा आशावादही व्यापारी व्यक्त करतात. डाळींचा हा शेवटचा हंगाम असून डाळ संपत आल्यामुळे डाळींचे दर कमी होण्याची चिन्हे नाहीत. डिसेंबरमध्ये डाळींचा नवा हंगाम सुरू होईल. त्यानंतर सट्टेबाज पुन्हा उचल खातील व महागाई गगनाला पोहोचेल. एकूणच पाहता सध्याच्या महागाईला केंद्र व राज्य सरकार जबाबदार आहे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान होण्यापूर्वी अच्छे दिन येण्याचा वादा केला होता. प्रत्यक्षात अच्छे दिन सोडा बुरे दिनच जनतेच्या वाट्याला आहेत. तत्यामुलेच या जनतेने बिहारमध्ये नरेंद्र मोदींना हिसका दाखविला आहे. यंदा पावसाळा चांगला झाला नाही हे वास्तव कुणी नाकारत नाही. त्यामुळे कृषी उत्पन्नावर परिणाम होणे स्वाभाविक आहे. परंतु त्यामुळे सर्वच महागाई टोकाला भिडणे हे कुणालाच पटत नाही. म्हणजेच सरकार प्रभावीपणे कार्य करीत नाही. व्यापारी व सट्टेबाजांना मात्र यातून अच्छे दिन आले आहेत. तर दुसरीकडे पंतप्रधान दर पंधरवड्याला विदेश यात्रा करीत मोकाट सुटले आहेत. मला दिल्लीला पाठवा तुमचा व्दारपाल म्हणून काम करेल अशी वल्गना करणारे मोदी आता देशात सापडतच नाहीत अशी स्थीती आहे. विदेश वार्‍या करुन काही देशाचे प्रश्‍न व महागाई कमी होणार नाही. लोकांना सध्या महागाई कमी करुन पाहिजे आहे. केंद्रातील सरकार आता १८ महिने व राज्यातील सरकार १३ महिने सत्तेत आहे. परंतु त्यांनी महागाई नियंत्रणात आणण्यासाठी काहीच केलेले नाही.
--------------------------------------------------------------

0 Response to "वाढता वाढता वाढे महागाई..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel