-->
नवे वारे वेग घेणार

नवे वारे वेग घेणार

संपादकीय पान शनिवार दि. २१ नोव्हेंेबर २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
नवे वारे वेग घेणार
पटणाच्या ऐतिहासिक गांधी मैदानावर उभारलेल्या भव्य शामियान्यात बिहारचे पाचवे मुख्यमंत्री म्हणून नितिशकुमार यांचा शपथविधी पार पडला. गेले सहा महिने गाजत असलेली ही निवडणूक पार पडली व बिहारी जनतेने आपला कौल नितिश-लालू-कॉँग्रेस यांच्या महाआघाडीच्या बाजूने दिला. त्यामुळे काही क्षणात देशातील राजकारणाची दिशा बदण्याचे वातावरण तयार झाले. मुळात म्हणजे ही निवडणूक सेक्युलर पक्षांनी एकत्र येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हिंदुत्ववादी राजकारणाला विरोध करण्यासाठी लढविली होती. सुरुवातीच्या टप्प्यात नरेंद्र मोदी बाजी मारणार असे चित्र होते. मात्र शेवटच्या टप्प्यात नितिश-लालू यांनी बाजी मारली व या निवडणुकीत विजयश्री खेचून आणली. अशा पार्श्‍वभूमीवर झालेल्या या निवडणुकीत कोणत्या समाजाला मंत्रिपदासाठी कसे वाटप होणार याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले होते. अर्थातच अपेक्षेनुसार लालूप्रसाद यादव यांनी आपल्या दोन्ही मुलांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ घातली आहे. त्याचे राजकीय विरोधक याबाबत त्यांच्यावर घराणेशाहीचा आरोप करतीलही, मात्र भाजपापासून सर्वच पक्षात घराणेशाही आहे. अर्थात जनतेला एखादा लोकप्रतिनिधी नको असला तर त्याला घराणेशाहीच्या पलिकडे जाऊन लोकांनी पराभव चाखावयास लावला आहे, असे सांगावेसे वाटते. लालूप्रसाद यांचा विचार करता, त्यांच्यासाठी तब्बल अर्ध दशकाहून जास्त काळानंतर त्यांचे राजकीय पुर्नवसन झाले आहे. यापूर्वी सत्तेत असताना लालूप्रसाद यांनी ज्या चुका केल्या त्या यावेळी टाळतील असे दिसते. त्यांनी आपल्या मुलांना सत्ता बहाल केल्याने त्यांचे विरोधक जास्त आक्रमकपणे त्याचा वापर करतील, परंतु लालूंच्या तरुण मुलांनी सत्तेचा वापर समाजसेवेसाठी केल्यास जनता त्यांना दुवाच देईल. अगदी लहान वयात त्यांच्या ताब्यात सत्ता आलेली आहे, त्यामुळे त्यांनी त्याचा वापर जनतेच्या भल्यासाठी करण्याची गरज आहे. महत्वाचे म्हणजे नितिश-लालू यांच्यासारखी समीकरणे भविष्यात अन्य राज्यात होण्याची व कदाचित देशातही होण्याची शक्यता आहे. अशावेळी लालूप्रसाद आज सत्तेत नसले तरी त्यांच्या दोघा मुलांनी सत्ता चांगल्यारितीने राबविणे गरजेचे आहे. अन्यथा त्याचा फायदा विरोधक घेऊ शकतात. बिहारमध्ये नितिशकुमार यांनी यादव, ठाकूर, दलित, मुस्लिम या आपल्याला मतदान केलेल्यांना पुरेसे प्रतिनिधीत्व दिले आहे. कॉँग्रेसने तर आपल्या वाट्याला आलेल्या चार मंत्रिपदापैकी एक दलित, मुस्लिम व ब्राह्मण यांना देऊन जातीची समीकरणे जुळविण्याचा चांगला प्रयोग केला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या शपथविधीला जमलेल्या विरोधी पक्षांतील नेत्यांची मांदयाळी पाहता नितीश व लालू यांनी भाजपाविरोधी पक्षांना एकत्र आणण्याचे सुतोवाच केले आहे. कॉँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ज्योती बसू, माकपाचे सरचिटणीस सीताराम येचुरी, भाकपाचे सरचिटणीस बर्धन, शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील असे डाव्या चळवळीतील तसेच भाजपाविरोधी पक्षांनी य शपथविधीला हजेरी लावली होती. खेर तर उध्दव ठाकरे यांनाही बोलाविण्यात आले होते. परंतु त्यांनी आपले प्रतिनिधी पाठविण्याचे ठरविले होते. नेहमी बिहारी माणसाच्या विरोधात बोलणार्‍या शिवसेनेच्या नेत्यांनाही या शपथविधीला बोलाविण्यात आले. यातून नितीश व लालू यांना भाजपाविरोधी एक देशव्यापी आघाडी उभारायची आहे. यात अर्थातच डावे व सेक्युलर पक्षच असतील. सध्याच्या स्थितीत केवळ कॉँग्रेस विरोध करुन चालणार नाही तर सेक्युलर पक्षांची एक व्यापक आघाडी उभारण्याची संकल्पना आहे. त्याचा एक मिनी प्रयोग बिहारमध्ये यशस्वी झाला आहे. केंद्रातील भाजपाचे सरकार प्रत्येक आघाडीवर अयशस्वी झाले आहे. तसेच या सरकारने देशाचा आजवरचा सेक्युलर ढाचा बदलण्याचा घाट घातला आहे. हे सरकार हिंदुत्ववाद आपल्यावर लादू पाहात आहे. अशा वेळी या सरकारला बिहारच्या जनतेने योग्य जागा दाखविली आहे. मात्र सेक्युलर पक्ष एकत्र आल्यास एक व्यापक एकजूट होऊन भाजपाला टक्कर देऊन सत्ता काबीज केली जाऊ शकते. त्यादृष्टीने एक नवे वारे देशात वाहू लागले आहे. या शपथविधीच्या निमित्ताने त्यादृष्टीने एक महत्वाचे राजकीय पाऊल पडले आहे, असे म्हणता येईल. मात्र या शपथविधीला समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यादव यांची अनुपस्थिती ही प्रकर्षाने जाणवते. मात्र पुढील वर्षी उत्तरप्रदेशात होणार्‍या निवडणुकीत त्यांना स्वबळावर नव्हे तर सर्व सेक्युलर पक्षांना बरोबर घेऊन जावे लागणार आहे. त्याचबरोबर आसाम, पश्‍चिम बंगाल, केरळ या राज्यातही विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्यात भाजपाला सेक्युलर पक्ष एकत्र आल्यास मोठे आव्हान उभे राहू शकते. आजच्या शपथविधीतील वातावरण पाहता हा भाजपाविरोधी पक्षांचा मेळावाच ठरावा. यातून देशात नवे वारे वाहू लागतील, अशी आशा वाटते.
-------------------------------------------------------------------------

0 Response to "नवे वारे वेग घेणार"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel