-->
संपादकीय पान बुधवार दि. १४ मे २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------
अब की बार...?
----------------------------------
लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा संपल्यावर सोमवारी सायंकाळी जाहीर झालेल्या जवळजवळ प्रत्येक एक्झीट पोलमध्ये भाजपा व त्यांच्या नेतृत्वाखालील आघाडीचे सरकार सत्तेत येणार असे भविष्य जाहीर झाले आहे. भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी सुमारे पाच हजार कोटी रुपये खर्चुन केलेल्या निवडणूक खर्चाला यश येणार असेच सध्या चित्र दिसत आहे. मात्र एक्झट पोलचा आजवरचा अनुभव पाहता प्रत्यक्षात निकाल उलटेही लागले आहेत. तत्यामुळे यावेळी एक्झीट पोल भाजपाचे सरकार येणार असे सांगत असला तरीही प्रत्यक्षात निकाल लागेपर्यंत काही सांगता येत नाही. २७२चा आकडा आपण सहज पार करू, असे मोदी आणि त्यांचे समर्थक सांगत आहेत; पण त्यांना तीस-चाळीस जागा कमी पडू शकतील अशी धाकधूक भाजपच्याच अनेकांना वाटत आहे. खरे काय ते सोळा मे रोजी कळेल. मात्र एक बाब स्पष्ट आहे की, निवडणुकीचा हा सर्व सामना मोदी यांनी एकहाती खेळला आणि आपल्या बाजूने फिरवला. आता विजय मिळाला, तर तो निव्वळ त्यांचाच असेल. त्यांच्यासाठी द्या भांडवलदारांनी आपल्या थैल्या रित्या केल्या त्यांचा तो विजय असेल. आजवरचे आपले पंतप्रधान हे स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेले होते. स्वतंत्र भारतात जन्मलेले नरेंद्र मोदी हे पहिलेच असतील. एखाद्या राज्यस्तरीय नेत्याने इतक्या अल्पावधीत देशभर आपल्या नावाचा झंझावात निर्माण करावा आणि एकट्याच्या बळावर निवडणूक जिंकून देण्याचा पराक्रम करावा हे प्रथमच घडेल. यापूर्वी एकेका राज्यांमध्ये असा प्रकार घडला आहे. उदाहरणार्थ, आंध्रात एन. टी. रामाराव आणि नंतर चंद्राबाबू नायडू किंवा ओडिशात नवीन पटनाईक वा बंगालमध्ये ममता इत्यादी. संपूर्ण देशातील चित्रविचित्र राजकीय समीकरणांवर मात करून स्वत:चे प्रभुत्व निर्माण करणे ही एक मोदी यांची जबरदस्त कामगिरी ठरेल.  अर्थात हे करण्याच्या कामी त्यांना मीडियाचा मोठा उपयोग झाला आहे. किंबहुना, मीडियाचा वापर करून एखाद्या नेत्याची देशव्यापी प्रतिमा तयार करणे आणि त्या बळावर निवडणूक जिंकणे हे खरोखरच घडू शकते का याचे उत्तर सोळा तारखेला मिळणार आहे. त्याचबरोबर सोशल मिडिया आपल्याकडे किती प्रभावी ठरला हे देखील स्पष्ट होईल. या दृष्टीनेदेखील स्वतंत्र भारतातील ही एक अभूतपूर्व निवडणूक ठरणार आहे. मोदी यांचा विजय झाला, तर ते आपल्या राजकीय व्यवस्थेत मीडिया नावाच्या एक घटकाच्या प्रचंड शक्तीचे प्रकटीकरण असेल. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की, आज वृत्तपत्रे, टीव्ही चॅनल्स किंवा इंटरनेटवरील सोशल मीडिया यांनी मिळून मोदी यांचे दैवतीकरण केले असले, तरीही ती मीडियाची स्वत:ची भूमिका आहे, असे नव्हे. लोकांवर प्रभाव टाकण्याची किंवा अधिक तीव्र भाषेत बोलायचे, तर जनमत उलटेपालटे करण्याची एक महाकाय अशी शक्ती मीडियाकडे आहे, पण ही शक्ती कोण कशा रीतीने वापरून घेतो यावर सर्व काही अवलंबून आहे. दोन वर्षांपूर्वी अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांनी ही शक्ती वापरली. लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले तेव्हा राहुल गांधी आणि मोदी यांना मीडियाची ही शक्ती वापरण्याची जवळपास समसमान संधी होती, पण प्रचारात तरी असे दिसले की मोदींनी या लढाईत राहुल गांधी यांना साफ झोपवले. आता जर निवडणुकीचे निकालही मोदींच्या बाजूने आले तर मीडिया वापरण्याच्या मोदींच्या शक्तीवर शिक्कामोर्तब तर होईल. महत्वाचे म्हणजे सत्ता हाती असतानाही राहून गांधी सोशल मिडियापासून ते डिजिटल मिडीयात आपला प्रभाव टाकून त्याचा आपल्या दिशने वापर करु घेण्यात ते अयशस्वी ठरले. आजवर कॉँग्रेस पक्षाने किंवा भाजपा वगळता विरोधी पक्षांनी तसेच डाव्या पक्षांनी जे सर्वधर्मसमभावाचे जे बबिज स्वातंत्र्यानंतर रोवले त्याचा पराभव मोदींच्या विजयात असेल. तसेच हिंदुस्थान हा हिंदूंचा देश आहे, हिंदू येथे बहुसंख्याक आहेत आणि येथील राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक परिसरावर पूर्णपणे हिंदूंचेच स्वामित्व असले पाहिजे, असे ठामपणे मानणार्‍यांंपैकी मोदी हे प्रमुख आहेत. या देशात हिंदू सुमारे ८५ टक्के आहेत. तरीही यापैकी बहुसंख्य हिंदूंनी आजवर देशात हिंदूंचे स्वामित्व प्रस्थापित करण्याची मोदी यांच्यासारख्यांची भूमिका मान्य केली नव्हती. या भूमिकेचा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये नेहमीच मोठा पराभव झाला होता. तसेच जो तरुण वर्ग यावेळी मतदानाला उतरला त्याने आपले मत मोदींच्या बाजूने टाकले असे स्पष्ट दिसेल. या तरुण वर्गातील जो मध्यमवर्गीय व नवमध्यमवर्गीय समाजातील तरुण आहेत त्यांनी मोदींना पसंती दर्शविली असेच उघड होईल. हाच तरुण वर्ग सोशल मिडियाचा ग्राहक आहे. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला समजा साधे बहुमत मिळाले, तरीही उरलेल्या अडीचशे खासदारांपैकी बहुसंख्य हिंदू असणार आहेत. त्यांना पाठिंबा देणारा हातदेखील प्राधान्याने हिंदूच असणार आहे. अशा स्थितीत मोदी यांचा विजय म्हणजे ध्रुवीकरणाचे टोक गाठले गेले, असेही समजायचे कारण नाही. भाजपाने जे राजकारण केले, त्या हिंदुत्ववादी राजकारणाचा हा विजय असला तरी मोदींना सत्तेत आल्यावर सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन जावे लागणार आहे. अर्थात जे वाजपेयींनी केले तो मुखवटा मोदींकडे नाही. त्यांनी जी आश्‍वासने देऊन जनतेच्या अपेक्षा वाढविल्या आहेत त्याची पूर्तता करण्यात मोदींची कसोटी लागेल. अर्थात निकालानंतर ते सत्तेत आले तरच्या या गप्पा आहेत.
--------------------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel