-->
गोवा, पंजाबमध्ये काय होणार?

गोवा, पंजाबमध्ये काय होणार?

संपादकीय पान सोमवार दि. 6 फेब्रुवारी 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
--------------------------------------------
गोवा, पंजाबमध्ये काय होणार?
देशातील सर्वात लहान राज्य गोवा व उत्तर भारतातील लहान राज्य पंजाब या दोन्ही ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडले आहे. पाच राज्यातील होऊ घातलेल्या निवडणुकीतील हे पहिल्या टप्प्यातील मतदान होते. यांचे निकाल हाती येण्यासाठी मार्च महिन्यातील दुसर्‍या आठवड्याची वाट पहावी लागणार असली तरी येथील उत्सुकता सर्वात जास्त ताणली गेली आहे. याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे या दोन्ही राज्यात सत्ताधारी असलेला भाजपा पुन्हा येथे सत्तेत येणार का, याची सर्वांनाच उत्सुकता आहे. गोव्यात सत्तेत आल्यास सलग दुसर्‍यांचा भाजपाला हे यश लाभेल तर अकाली दलासह सत्तेत असलेल्या भाजपाने यावेळी सत्ता राखल्यास त्यांचा तिसरा विजय ठरेल. गोव्यात भाजपाने आपली सर्व ताकद पणाला लावली आहे. माजी मुख्यमंत्री व विद्यमान संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर हे गेले महिनाभर गोव्यात तळ ठोकूनच होते. तेथे काँग्रेस विस्कळीत झालेली आहे तर आम आदमी पार्टीने नवे आव्हान उभे केले आहे. रा. स्व. संघाचे बंडखोर सुभाष वेलिंगकर यांच्या गोवा सुरक्षा मंच, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष आणि शिवसेनेच्या युतीमुळे भाजपच्या मतांमध्ये होणारे विभाजन यामुळे एरव्ही दुरंगी लढती होणार्‍या गोवा विधानसभेची निवडणुक चौरंगी झाली. भाजपच्या दृष्टीने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची असून, निवडणूक सोपी नसल्याचा अंदाज आल्यानेच भाजपने संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याकडे राज्याचे नेतृत्व सोपविण्याचे संकेत देत सरकारच्या विरोधातील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
गोवा विधानसभेचे 40 मतदारसंघ असून, सत्तेसाठी 21 जादुई आकडा स्वबळावर गाठणे शेवटच्या टप्प्यात कोणत्याही राजकीय पक्षासाठी सोपे दिसत नाही.  गोव्यात 23 टक्के ख्रिश्‍चन मतदार आहेत. त्यामुळे चर्चचा पाठिंबा दक्षिण गोव्यात महत्त्वाचा ठरतो. गेल्या वेळी त्यांचा कल भाजपकडे होता. बेकायदा खाण उत्खननावरून पर्रिकर यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेला पाठिंबा मिळाला होता. यंदा चर्च भाजपच्या विरोधात असल्याचे बोलले जाते.  ख्रिश्‍चनबहुल चार मतदारसंघांत भाजपने अपक्षांना पाठिंबा दिला आहे. भाजपनेही संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याच नावावर मते मागितली. पर्रिकर हे गोव्यातील भाजपचा सर्वमान्य चेहरा. गोव्यात भाजपला 15 ते 16 जागा मिळतील व मगोपच्या साथीने पुन्हा सरकार स्थापन करेल अशी शक्यता व्यक्त होत आहे. विरोधी पक्षात असताना पर्रिकर यांनी एकेक आरोप केले होते, मात्र पुढे काहीच कारवाई झाल्याची अनेकांची तक्रार आहे. भाजपच्या विरोधातील नाराजीचा वास्तविक काँग्रेसला लाभ घेणे शक्य होते, पण गोव्यातील काँग्रेसला सुरुवातीपासूनच गटबाजीचा शाप लागला आहे. भाषेच्या मुद्दयावरून मगोप आघाडीने भाजपची कोंडी झाली आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांना दिलेले अनुदान बंद करावी अशी गोवा सुरक्षा मंचची भूमिका आहे. मतांमुळे भाजपने नंतर भूमिका बदलली असा आरोप आहे. या सर्व आरोप प्रत्यारोपात भाजपा सत्ता राखील का, असा सवाल आहे. स्वबळावर भाजपाला सत्ता मिळणे अश्यक्यच वाटते. मात्र गोव्यात त्रिशंकू झाल्यास आयाराम-गयाराम बोकाळणार आहेत हे नक्की. गोव्याप्रमाणे पंजाबमध्ये काय होते याकडे अनेकांचे लक्ष आहे. भाजपा व अकाली दल यांची आघाडीची सत्ता तेथे आहे. सत्तेची ही दुसरी टर्म असल्याने तिसर्‍या वेळी त्यांचा विजय होणे अशक्यच वाटते. कारण राज्यातल्या सत्ताधार्‍यांच्या विरोधात बर्‍यापैकी जनमत तयार झाले आहे. मात्र त्यात कॉग्रेस किंवा आम आदमी पक्ष आपली हवा कशी भरते व त्यांचा पराभव करते हे महत्वाचे आहे. केजरीवाल यांच्याविषयी येथे अनेकांना आकर्षण आहे, मात्र फारसे आपल्या बाजून जनमत उभे करण्यात ते यशस्वी झालेले नाहीत. कॉग्रेसला येथे विजय मिळाल्यास एक नवी संजिवनी पक्षाला यातून मिळू शकते. कारण पंजाबसारख्या लहान राज्यातही कॉग्रेसला पुन्हा सत्तास्थानी पोहोचता आले तर तो भाजपासाठी जसा मोठा धक्का असेल तसाच तो कॉग्रेससाठी मोठा विजय ठरेल. काजी जमांच्या अंदाजानुसार, येथे त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. मात्र कॉग्रेसला चांगल्या जागा मिळतील याबाबतीत अनेकांची सहमती आहे. पंजाबच्या गावागावांमध्ये अकाली दलाविरोधात नाराजीची भावना प्रकर्षांने दिसतेय, एवढे मात्र खरे आहे. मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या कुटुंबांची एकाधिकारशाही याला कारणीभूत आहे. मुलगा सुखबीरसिंग उपमुख्यमंत्री, सून केंद्रीय मंत्री, सुनेचा भाऊ राज्याचा शक्तिशाली मंत्री. राजकारणाबरोबर अर्थकारणावरही त्यांचीच पकड. सरकारी बस महामंडळ तोटयात आहे, पण बादलांची खासगी वाहतूक कंपनी नफ्यात आहे. वाहतूक, बांधकाम, पर्यटन-हॉटेल, आरोग्य, दारू गुत्ते यासारखी अनेक क्षेत्रे बादलांच्या खिशात आहेत. त्याशिवाय कार्यकर्त्यांंची गुंडागर्दी. त्यामुळे या राजवटीला जनता कंटाळली आहे. एकेकाळी हरित क्रांतीमुळे श्रीमंती आलेल्या या राज्यात अंमली पदार्थांचा विळखा आहे. त्याला अनेक सामाजिक व आर्थिक कारणे आहेत. अंमली पदार्थांमुळे पंजाबच्या पिढया नासायला लागल्या आहेत. एकीकडे अकाली दलाबद्दल नाराजी दिसताना दुसरीकडे केजरीवालांबद्दल उत्सुकतेची भावना जाणवतेय. दिल्लीतील आलेल्या या बिगरशीख नेत्याला पंजाबी जनतेतून प्रतिसाद कशामुळे मिळतोय, हे पहावे लागेल. कारण जनतेला बदल हवाय, मात्र कॉग्रेसलाही काही अन्य पर्याय मिळतो का, याची चाचपणी जनका करीत असावी. काँग्रेसमधील अंतर्गंत खेचाखेचीदेखील त्यास कारणीभूत आहे. कॅ. अमरिंदरसिंग यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार ऐनवेळी घोषित करण्यात आले. या सर्व राजकारणात कोणाला सत्तेची लॉटरी लागते ते पहायचे.
-------------------------------------------------------------

0 Response to "गोवा, पंजाबमध्ये काय होणार?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel