-->
वरुणराजाचे आगमन

वरुणराजाचे आगमन

संपादकीय पान बुधवार दि. २२ जून २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
वरुणराजाचे आगमन
संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागून असलेल्या वरुणराजाचे आगमन आता मुंबईसह संपूर्ण कोकणात तसेच विदर्भात झाले आहे. येत्या आठवड्याभरात हा पाऊस संपूर्ण राज्यात पसरेल अशी चिन्हे आहेत. जून महिन्याच्या सुरुवातीपासून शेतकऱीच नव्हे तर शहरी लोकांनाही पावसाची आस लागली होती. देशातील हवामान खात्यएाने मात्र दिलेली तारीख यंदाही चुकली, त्यामुळे दुष्काळाने त्रासलेल्या जनतेचा काळजाचा ठोका चुकला होता. वरुणराज कधी खूष होणार व बरसणार याकडे सर्व लक्ष ठेऊन होते. मध्यंतरी असाच कोकणाच्या किनारपट्टीवर पाऊस पडला परंतु तो बिगर मोसमी होता असा निष्कर्ष हवामान खात्याने काढल्याने आता खरा मोसमी पाऊस कधी येणार असा प्रश्‍न पडला होता. मात्र मुंबईकर पावसाची वाट बघत असताना शनिवारी पहाटे पश्चिम उपनगर परिसरात वरूणराजाने जोरदार हजेरी लावली. मुंबईत पाऊस बरसत असताना कोकण किनारपट्टीही पावसाच्या आगमनाने त्याचवेळी सुखावली. पावसाचा प्रवास पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असून येत्या ४८ तास मध्य महाराष्ट्राचा काही भाग, संपूर्ण कोकण-गोवा, मराठवाडा भागात पाऊस येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबई शहर, उपनगर परिसरातही पावसाचा अंदाज आहे. खरे तर ऊन-पावसाचा खेळ गेला आठवडाभर मुंबईकर अनुभवत होते. अधुनमधून बरसणार्‍या पावसाचा प्रभाव पाहता लवकरच मोसमी पावसाला सुरुवात होईल, अशी अपेक्षा बाळगणा-या मुंबईकरांची निराशा झाली होती. आता मात्र मोसमी पावसाने प्रारंभ केला आहे. मात्र अजूनही अधूनमधून बरसणारा पाऊस मोसमी पाऊस नसून मान्सून पूर्व पाऊस असल्याचे वेधशाळेतर्फे सांगण्यात आले. मात्र येत्या काही दिवसांत ऊन-पावसाचा हा खेळ संपून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस बरसण्याचा अंदाज वर्तवला आहे. नैऋत्य मोसमी पावसाची उत्तरसीमा आणखी उत्तरेकडे सरकली असून येत्या ४८ तासांत राज्यातील विविध भागांत पाऊस दाखल होण्याचा अंदाज पुण्यातील भारतीय हवामान शास्त्र विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे खरा मोसमी पाऊस बरसण्यासाठी यंदा देखील जूनचा तिसरा आठवडा उजाडला आहे. गेले कित्येक वर्षे पाऊस हा जूनमध्ये शेवटच्या आठवड्यातच पडतो असे चित्र आहे. पूर्वी हाच पाऊस जूनच्या पहिल्या आठवड्यात पडत असे. मात्र आता हाच पाऊस महिनाभर पुढे सरकला आहे. गेले दोन वर्षे पावसावर अल् निओची छाया होती. यंदा अल्‌‌ निओचा प्रभाव संपलेला असेल त्यामुळे पाऊस चांगलाच बरसेल व सरासरीपेक्षा किमान दहा टक्के वाढलेला असेल असा अंदाज आहे. असे झाल्यास दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला चांगला दिलासा मिळणार आहे.

0 Response to "वरुणराजाचे आगमन"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel