-->
डिजिटल बँकिंग जोरात

डिजिटल बँकिंग जोरात

संपादकीय पान बुधवार दि. २२ जून २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
डिजिटल बँकिंग जोरात
बँकिंग क्षेत्र आपल्याकडे आता कात टाकू लागले आहे. अर्थात आपण जगाचा विचार करता बरीच वर्षे मागे आहोत. कारण जगात इंटरनेट बँकिंग व शाखा विरहीत बँकिंग ही संकल्पना प्रदीर्घ काळ कार्यरत आहे. अगदी आवश्यकता असेल तरच बँकेत जाण्याची संकल्पना आपल्यकडे अजून काही रुजलेली नाही. मात्र इंटरनेट आणि अन्य तंत्रज्ञानानंतर गेल्या दोन वर्षांपासून डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बँकिंग सेवा उपलब्ध करून दिल्यानंतर आता ग्राहकही या नव्या तंत्राला चांगलेच सरावले असून, डिजिटल बँकिंगच्या माध्यमातून आतापर्यंत तब्बल १० लाख कोटी रुपयांचे वित्तीय व्यवहार झाल्याची माहिती पुढे आली आहे. डिजिलट तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्राहकांनी, पैसे काढणे, भरणे, पैसे ट्रान्स्फर करणे, बिल भरणा करणे, गिफ्ट चेक देणे, ई-कॉमर्स सेवांसाठी बँकेच्या ऍप्सच्या माध्यमातून पैसे भरणे आदी सेवा वापरण्यास सुरुवात केली आहे. या सर्व सेवांची ग्राहकाला माहिती झाली. हे व्यवहार करणे अतिशय सोयीचे असल्यामुळे ग्राहकांमध्ये या सेवा लोकप्रिय होत आहेत. डिजिटल बँकिंगचे तंत्रज्ञान इंटरनेटवर आधारित असले तरी इंटरनेट बँकिंगची पुढची पायरी डिजिलट बँकिंग हीच असेल. रोखीचे व्यवहार कमी करण्यासाठी आणि एकूणच बँकिंग सेवांवरील ताण कमी करण्यासाठी बँकांनी आता इंटरनेट आणि डिजिटल बँकिंग सेवांचा प्रसार झपाट्याने करण्यास सुुरुवात केली आहे. या सेवा लोकप्रिय करण्यासाठी आणि या माध्यमातून होणार्‍या व्यवहारांसाठी ग्राहकांना प्रोत्साहित करण्यासाठी अनेक बँकांनी विविध व्यवहारांवर २० टक्क्यांपर्यंत सूट देखील दिली आहे. याला ई-कॉमर्स कंपन्यांचीही जोड मिळताना दिसत आहे. देशात इंटरनेटचा वाढता वापर, त्यात आलेली सुरक्षितता आणि स्मार्टफोनच्या माध्यमातून वाढलेला इंटरनेटचा वापर या पार्श्वभूमीवर बँकांनी डिजिलट प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले. यात प्रामुख्याने बँकांनी स्वत:चे ऍप्स तयार करीत त्या माध्यमातून जे नित्याचे बँकिंग व्यवहार आहेत ते पूर्णपणे ऍपच्या माध्यमातून ग्राहकांना उपलब्ध करून दिले आहेत. यामुळे २४ तासांत कधीही ग्राहकाला हवे तेव्हा हवे ते व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. यामुळे केवळ ग्राहकांनाच सुविधा मिळाली नाही, तर यामुळे व्यवहारात वाढ झाल्यामुळे बँकांनाही फायदा होताना दिसत आहे. ग्राहक ज्या ज्या सेवा-सुविधांसाठी डिजिटल तंत्रज्ञान वापरतात, त्या सर्वच प्लॅटफॉर्मवर आता बँकांनी प्रवेश केला आहे. एवढेच कशाला फेसबुक आणि टिव्टरसारख्या सोशल मीडियावरूनही बँकांनी आता ग्राहकांना सेवा देण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये देशातील खासगी बँकांचा पुढाकार आहे. सोशल मीडियावरून ग्राहकांना पैसे ट्रान्स्फर करणे, बिल भरणा करण्यासारख्या सुविधा उपलब्ध असून, ग्राहकांचा या सेवांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. डिजीटल बँकिंगचे हे स्वरुप पाहता आता देशातील बँकिंग उद्योग एका नव्या वळणावर येऊन ठेपला आहे हे मात्र नक्की.
----------------------------------------------------

0 Response to "डिजिटल बँकिंग जोरात"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel