-->
मुंबईतील भयाण वास्तव

मुंबईतील भयाण वास्तव

संपादकीय पान गुरुवार दि. २३ जून २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
मुंबईतील भयाण वास्तव
सध्या मुंबईला वेध लागले आहेत ते भविष्यात येऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकांबाबत. निदान शिवसेना-भाजपा ज्या रितीने एकमेकांच्या कुरघोड्या करीत आहेत ते पाहता निवडणुकांचे वेध आता मुंबईला लागले आहेत, निदान या दोन पक्षातील राजकारण्यांना तरी सध्या तरी जनतेच्या प्रश्‍नांपेक्षा निवडणुकाच डोळ्यापुढे दिसत आहेत. परंतु सर्वसामान्य मुंबईकर मात्र आपला जीव मुठीत घेऊन पहिल्या पावसात प्रवास करीत आहे. मुंबईत पहिल्याच पावसाने जीवनवाहिनी असलेल्या लोकल वाहतुकीचा पूर्णपणे विचका झाला. मुसळधार पावसामुळे मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने सकाळी मुंबईच्या दिशेने कामावर जाणार्‍या चाकरमान्यांचे हाल झाले. मध्य रेल्वेवर याचा मोठा परिणाम झाला असून जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या.  भायखळ्यापुढे लोकलच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मध्य रेल्वेची सीएसटीच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. विद्याविहार, ठाणे, विक्रोळी, भांडूप, कल्याण, डोंबिवली स्थानकांवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमा होती. पारसिक बोगद्याजवळ उदयनगर येथे रेल्वेच्या संरक्षक भिंतीचा कठडा रेल्वे ट्रॅकवर कोसळल्याने ठाणे रेल्वे स्टेशनवर वाहतुकीचा खोळंबा झाला. त्यामुळे आधीच उशिरा धावणार्‍या गाड्यांमुळे प्रवाशांचे अधिक हाल झाले. संरक्षक भिंतीचा कठडा कोसळल्याने डोंगराचा भाग खाली येण्याची भिती व्यक्त होत आहे. तसेच कळवा येथेही दरडीचा धोका कायम आहे. त्यामुळे पुन्हा पाऊस सुरु झाल्यास येथे रुळावर माती येण्याचा धोका आहे. रेल्वेची सेवा कोलमडली असताना कल्याण आणि ठाणे दरम्यान बस सेवा सुरु करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात आली. तर कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अतिरिक्त बसेस नवी मुंबई, ठाण्याच्या दिशेने, तर ठाण्याच्या बसेस नवी मुंबई आणि कल्याणच्या दिशेने सोडण्यात आल्या. मध्य रेल्वे रखडली असताना पश्चिम आणि हार्बर रेल्वेही उशिराने धावल्या. परिणामी मुंबईचे सर्वच जनजीवन ठप्प झाले होते. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने दिवा रेल्वे स्थानकात हिंसक प्रतिक्रिया उमटली. दिवा स्थानकात संतप्त प्रवाशांनी पंचवटी एक्सप्रेसवर दगडफेक केली. प्रवाशांचा अंत रेल्वे पाहात आहे, त्यामुळे संप्तप्त झालेल्या प्रवाशांकडून असे वर्तन झाल्यास आश्‍चर्य वाटू नये. मध्य रेल्वेत या गर्दीत एका गरोदर महिलेले एका बालकाला जन्म दिला. तिला रुग्णालयापर्यंतही पोहोचविणे शक्य झाले नाही. त्यामुळे तिची डिलिव्हरी लोकलमध्येच करण्यात आली. मुंबईतले हे भयाण वास्तव आहे. मुंबईतील एक करोडहून जास्त जनता दर पावसाळ्यात हा अनुभव घेत आहे. मात्र याचा राज्यकर्त्यांवर काहीच परिणाम होत नाही. एवढ्या मोठ्या मुंबईत चांगली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरविणे ही प्राथमिक गरज आहे. मात्र आजवर राज्यकर्त्यांनी ही किमान गरजही पुरविली नाही. मुंबईतून फक्त पैसा काढून घेण्याचा धंदा आजवर प्रत्येक पक्षाने केला. मराठी माणसाच्या नावाचे शिवसेनेने भांडवल केले. मात्र मराठी माणसासाठी काय केले, हा एक संशोधनाचा विषय ठरेल. उलट मुंबईतून मराठी माणूस आता उपनगरात फेकला गेला आहे. उपनगरातल्या या चाकरमन्याचेच हाल दररोज या लोकलच्या प्रवासात होत आहेत. मुंबईत गेल्या पंचवीस वर्षात नियोजन करुन मेट्रो-मोनो व विद्यमान लोकलचे विस्तारीकरण करण्याची गरज होती. परंतु हे कुणीच केले नाही. याचा जाब येत्या निवडणुकीत विचारण्याची आता वेळ आली आहे.

0 Response to "मुंबईतील भयाण वास्तव"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel