-->
आवाज अखंड महाराष्ट्रचा

आवाज अखंड महाराष्ट्रचा

संपादकीय पान गुरुवार दि. ०४ ऑगस्ट २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
आवाज अखंड महाराष्ट्रचा
सध्या विधीमंडळात स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावरुन रणकंदन सुरु आहे. आपण संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा विदर्भ आपल्यापासून वेगळा होण्यासाठी केलेला नाही. यासाठी ज्या १०६ हुतात्यांनी बलिदान केले त्यालाच हरताळ फासला जात आहे. सध्या बेळगाव, कारवारसारखे कर्नाटकात गेलेला भाग परत मिळविण्याचे तर सोडून द्या उलट भाजपाचे हे सरकार महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचे कारस्थान रचित आहे, राज्याच्या हे हिताचे नाही. अर्थात मुख्यमंत्र्यांनी याबाबत कसलीही राज्याच्या विभाजनाची योजना सरकार दरबारी नाही, मी अखंड महाराष्ट्राचाच मुख्यमंत्री आहे असे प्रतिपादन केले असले तरीही त्यांच्या वक्तव्यावर कोणाचा विश्‍वास नाही. याचे महत्वाचे कारण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या पक्षाचे आहेत त्या भाजपाची उघड भूमिका छोट्या राज्यांची आहे. त्यांच्याच काळात झारखंड, उत्तराखंड ही राज्ये कसलेही आंदोलन नसताना करण्यात आली. या घटनेला आता पंधरा वर्षाहून जास्त काळ लोटला असताना या राज्यांनी अशी कोणती मोठी प्रगती केली आहे? भाजपाचा हा आवडता सिध्दांत आहे की, राज्य छोटे असले तर ते झपाट्याने प्रगती करते. परंतु हे काही खरे नाही. आजवर कोणतेही छोटे राज्य वेगाने प्रगती करीत नाही असे सिध्द झाल आहे. उलट अशा प्रकारच्या छोट्या राज्यांमध्ये राजकिय अस्थिरता जास्त असते. याचा उलट त्यांच्या आर्थिक प्रगतीला फटकाच बसतो. भाजपाने अशा प्रकारे अधिवेशनात विदर्भाचे पिल्लू सोडून दोन्ही सभागृहातील कामकाजावर परिणाम घडविला आहे. गेले तीन दिवस सभागृहाचे काही काम होत नाही. जनतेच्या अनेक महत्वाच्या मुद्यांवर याच्या परिणामी चर्चाच होत नाही. एकीकडे विदर्भाची चर्चा सुरु ठेवायची व राज्याचे तुकडे पाडण्यासाठी मागच्या दरवाजाने पावले टाकायची तर दुसरीकडे जनतेच्या प्रश्‍नांवर चर्चा होऊ नये यासाठी याचा उपयोग करावयाचा, अशी दुहेरी कूटनिती भाजपाची आहे. मात्र राज्यातील या जनतेने त्यासाठी सजग राहण्याची आवश्यकता आहे. भाजपा आपला छोट्या राज्यांचा अजेडा काही सोडणार नाही. कदाचित आपल्या कारकिर्दीची पाच वर्षे पूर्ण होत असताना असा ठराव मांडून केंद्राकडून त्याची मंजुरी मिळविली जाण्याची शक्यता काही नाकारता येत नाही. सध्या शिवसेनेला सत्तेची उब मिळत असल्याने त्यांनी अखंड महाराष्ट्र पाहिजे अशी भूमिका घेतलेली असली तरीही मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर विश्‍वास ठेवत असल्याचे सांगून शेपटी घातली आहे. त्यामुळे हे राज्य फुटू नये यासाठी राज्यातील जनतेने ठामपणाने उभे राहिले पाहिजे व फुटीरतेची भाषा करणार्‍यांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे.

0 Response to "आवाज अखंड महाराष्ट्रचा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel