-->
सावित्रीचे रौद्र रुप

सावित्रीचे रौद्र रुप

संपादकीय पान गुरुवार दि. ०४ ऑगस्ट २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
सावित्रीचे रौद्र रुप
मुंबई-गोवा महामार्गावरील महाड-पोलादपूररम्यानचा रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीवरील जुना पूल बुधवारी पहाटे कोसळला. नदीच्या पुरात दोन एसटी बसेससह सात ते आठ वाहने वाहून गेली आहेत. राजापूर-बोरिवली आणि जयगड-मुंबई या दोन बसमधील एकूण २२ प्रवाशी बुडाल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुदैवी घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. सावित्री नदीला गेले चार दिवस पूर आला असून गेले काही दिवस महाड शहरामध्ये पाणी शिरलेले आहे. या पार्श्‍वभूमीवर १००वर्षे जुना असलेला महाडनजीकचा हा पूर कोसळला. बुधवार पहाटे या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलिस आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे जवान घटनास्थळी दाखल झाले व मदतकार्य सुरु झाले आहे. मदतीसाठी नौदल आणि तटरक्षक दलालाही पाचारण करण्यात आले आहे. तटरक्षक दलाच्या चेतक हेलिकॉप्टरच्या मदतीने शोधकार्य सुरु झाले आहे. येथील पुराचा मारा पाहता मदतकार्य एवढ्या लवकर संपेल असे दिसत नाही. रायगडच्या जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी शितल उगले आणि पोलिस अधीक्षक सुवेज हक यांनी घटनास्थळाची पाहणी केली. मात्र पालकमंत्री सकाळी दहा वाजेपर्यंत संपर्कात नव्हते. त्यांच्या पी.ए.च्या वतीने साहेब पुजेत आहेत असे सांगण्यात आले. पालकमंत्र्यांचा हा हलगर्जीपणा निषेधार्थच म्हटला पाहिजे. सावित्री नदीला पूर आल्याने ही दुदैवी घटना घडली हे वास्तव आपण एकवेळ मान्य करु, मात्र या पुलाने १०० वर्षे पूर्ण केल्यावर याचे बांधकाम करणार्‍या ब्रिटीश कंपनीने आता या पुलाचे आयुष्य संपल्याचे पत्र सरकारला लिहिले होते. परंतु शासन मात्र झोपेतच होते. या पत्राची त्यावेळी दखल घेऊन जर हा पूल वापरण्यावर बंदी घातली असती तर आजची दुर्घटना घडली नसती. मात्र १०० वर्षानंतरही या पुलाचे बांधकाम करणारी कंपनी तुम्हाला जाग आणून देते मात्र आपले सरकार शांत झोपून आहे त्याला काय म्हणावे? त्यामुळे ही घटना केवळ पुरामुळे म्हणजे अस्मानी नाही तर सुल्तानी आहे. कारण हे शासन त्याला जबाबदार आहे. या घटनेच्या निमित्ताने पुन्हा एकदा मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाची किती आवश्यकता आहे त्याचा आपल्याला अंदाज येतो. हा महामार्ग मृत्यूचा सापळा झाला आहे असे आपण नेहमी म्हणतो, अनेक अपघात ज्या भीषणरितीने होतात ते पाहता हा मृत्यूचा सापळाच आहे. गेले कित्येक वर्षे हा महामार्ग चौपदरी करण्याच्या केवळ घोषणा होतात. सुदैवाने नितीन गडकरी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री झाल्यावर त्यांनी या कामाला वेग देण्याच्या घोषणा केल्या. त्यासंबंधी निश्‍चितच काही कामे मार्गी लागत आहेत. परंतु अपेक्षित वेग या चौपदरीकरणाच्या कामाने अजून तरी गाठलेला नाही. हा अपघात पाहता आता तरी शासनाने जागे होऊन चौपदरीकरणाच्या कामाला वेग देऊन किमान येत्या दोन वर्षात हे काम पूर्ण करण्याच्या हेतून कामाला लागण्याची आवश्यकता आहे, असेच म्हणावे लागेल.

0 Response to "सावित्रीचे रौद्र रुप"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel