-->
करबुडव्यांना चपराक

करबुडव्यांना चपराक

संपादकीय पान गुरुवार दि. २३ जून २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
करबुडव्यांना चपराक
प्राप्तिकर बुडविणार्‍या व्यक्तींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे त्याला प्रतिबंध करण्यासाठी प्राप्तिकर विभागाने अधिकार्‍यांना करबुडव्यांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. याअंतर्गत कर बुडविणार्‍यांना अटक करणे, ताब्यात घेणे यासह मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्यात येईल.
यासंबंधी चालू आर्थिक वर्षासाठी कारवाईचा आराखडा केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने तयार केला आहे. कर चुकवेगिरी करणार्‍या व्यक्तीला प्राप्तिकर कायद्यानुसार तीन महिने ते तीन वर्षे कारावासाची शिक्षा व दंड करता येतो. सध्या हा कायदा अस्तित्वात अससला तरीही अगदी अपवादाने ही कारवाई करण्यात येते. यापुढे अधिकार्‍यांनी जास्तीतजास्त प्रमाणात कारवाई करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी कर वसुली अधिकारी नेमण्यात आले असून, त्यांच्यामार्फत ही कारवाई केली जाईल. त्यासाठी त्यांना पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळ पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासोबत त्यांना कार्यक्षमता वाढविण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. नोटीस बजावूनही कर बुडविणार्‍या व्यक्तीला अटक, तसेच ताब्यात घेण्याची कायदेशीर तरतूद नियमात आहे. कर लवादासमोर प्रलंबित असलेल्या प्रकरणांची संख्या २.३२ लाखांवरून २.५८ लाखांवर गेली आहे. चालू आर्थिक वर्षासाठी १.३३ लाख प्रकरणे निकाली काढण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्राप्तिकर विवरणपत्र न भरणार्‍या करपात्र व्यक्तींची संख्या २०१४ मध्ये २२.०९ लाख होती. ती २०१५ मध्ये वाढून ५८.९५ लाखांवर पोचली आहे. २०१३ मध्ये हा आकडा केवळ १२.१९ लाख होता. विवरणपत्र न भरणार्‍या करपात्र व्यक्तींवर कारवाई करून कर भरणार्‍या व्यक्तींची संख्या वाढविण्याचा प्राप्तिकर विभागाचा प्रयत्न आहे. विवरणपत्र भरणे आवश्यक असूनही ते न भरणार्‍या व्यक्तीला दंडात्मक कारवाईत एक ते पाच हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. कायदेशीर कारवाईत तीन महिने ते तीन वर्षांची शिक्षा आणि दंड होऊ शकतो. सध्या सरकारची तिजोरी रिकामी होत चालली आहे. परिणामी जास्तीत जास्त कर वसुली करुन ज्या यासंबंधीत छकबाक्या आहेत त्या वसुल करण्याची मोहीमच हाती घेण्यात आली आहे. ही घटना स्वागतार्ह असली तरी विनाकारण नागरिकांना याचा थळ होणार नाही याकडे लक्ष दिले गेले पाहिजे. अनेकदा मोठे करबुडवे सर्रास मोकळे सुटतात तर लहान करद्यात्याला विनाकारण त्रास सहन करावा लागतो. करबुडव्यांना चाप लावताना याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.
-------------------------------------------------------

0 Response to "करबुडव्यांना चपराक"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel