-->
इस्त्रोची उंत्तुंग भरारी

इस्त्रोची उंत्तुंग भरारी

संपादकीय पान शुक्रवार दि. २४ जून २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
इस्त्रोची उंत्तुंग भरारी
अवकाश तंत्रज्ञान व संशोधन क्षेत्रात भारताच्या इस्रो (इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन) या संस्थेने आता उंत्तुंग भरारी घेतली आहे. इस्त्रोने एकाच वेळी २० उपग्रहांना बरोबर घेऊन उड्डाण केले व सर्वच्या सर्व उपग्रह भूस्थिर कक्षेत स्थिरावण्यात यश मिळविले. या उपग्रहांमध्ये गुगलचा एक उपग्रह तसेच पुण्यातील व चेन्नईतील महाविद्यालयांनी बनविलेल्या उपग्रहांचा समावेश होता. अशा प्रकारे देशातील विद्यार्थ्यांनी तयार केलेला बहुउद्देशिय उपग्रह अवकाशात झेपावण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यांना अनुक्रमे स्वयंम व सत्त्यभामा अशी समर्पक नावे देण्यात आली आहेत. यातून तरुण पिढीला अवकाश संधोधनात वाव देण्याचा झालेला प्रयत्न खरोखर कौतुकास्पद ठरावा. स्वातंत्र्यानंतर पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या पुढारीपणाखाली इस्त्रोची स्थापना झाली, आता ही संस्था केवळ देशातीलच नव्हे तर एक आन्तरराष्ट्रीय पातळीवर कामगिरी करीत आहे. यावरुन पंडित नेहरुंची दूरदृष्टी आपल्या अनुभवता येते. तसेच देशातील अवकाश संशोधन आता किती उच्च पातळीवर पोहोचले आहे त्याची प्रचिती मिळते. एकाच वेळी २० उपग्रहांना एकसाथ नेऊन त्यांचे यशस्वी प्रक्षेपण करणे ही बाब काही छोटी नाही. जगात अर्थातच एकाच वेळी ३३ उपग्रह अवकाशात सोडण्याचा विक्रम आहे. मात्र तो विक्रम तोडण्याच्या आपण जवळपास आलो आहोत असे म्हणता येऊ शकते. रशियाच्या डीएनईपीआर अग्निबाणाने २०१४ मध्ये एकाच वेळी ३३ उपग्रह सोडले होते. अमेरिका, रशियाच्या सामर्थ्याचा हा तपशील पाहिला तर इस्रोला स्वबळावर अजून किती मजल गाठायची आहे हे लक्षात येईल. उपग्रह प्रक्षेपणामध्ये व्यावसायिक स्पर्धाही वाढली आहे. उपग्रह अवकाशात सोडणे हा व्यवसायिक प्रकार आहे. जगातील प्रदेश देशाची आता ती गरज झाली आहे. परंतु त्यांच्याकडे त्या उपग्रहांचे प्रक्षेपण करण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध नसते. रशिया, अमेरिका, चीन यांनी यात बरीच मोठी मजल गेल्या काही वर्षात मारली आहे. त्याच तोडीची मजल भारताने मारली आहे. आपणही विकसीत देशांच्या तुलनेत काही कमी नाही हे भारताने सिध्द करुन दाखविले आहे. १९७५ साली देशाने पहिला उपग्रह आर्यभट्ट तयार केला व त्यानंतर जी आपण या क्षेत्रात प्रगती केली आहे ती कौतुकास्पद ठरली आहे. यातील बहुतांश तंत्रज्ञान भारताने स्वबळावर निर्माण केले आहे. उपग्रह सोडण्याच्या बरोबरीने चांद्रयान मोहीम ते मंगळावर स्वारीच्या मोहीमा देखील इस्त्रोने आखल्या व यशस्वी केल्या. उपग्रह प्रक्षेपणातील तंत्रज्ञान आपण चांगलेच विकसीत केले आहे व त्याचा तिसर्‍या जगातील लहान देशांचा याचा फायदा करुन दिला आहे. इस्त्रो ज्या प्रमाणे कार्यक्षमतेने काम करीत आहे तसेच याच क्षेत्रातील जगातील पहिल्या क्रमांकाची संस्था नासामध्ये देखील भारतीय संशोधक मोठ्या संख्यने काम करीत आहेत. त्यामुळे अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात भारतीय संशोधकांनी मोठी कामगिरी केली आहे. त्याचा पाया हा इस्त्रोने घातला आहे, हे विसरता कामा नये. इस्त्रोची ही उत्तुंग भरारी देशाच्या प्रगतीतील एक मोठा मैलाचा दगड ठरु शखेल यात काहीच शंका नाही.

0 Response to "इस्त्रोची उंत्तुंग भरारी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel