-->
एल.आय.सी.साठी धोक्याची घंटा

एल.आय.सी.साठी धोक्याची घंटा

संपादकीय पान शुक्रवार दि. २४ जून २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
एल.आय.सी.साठी धोक्याची घंटा
विमा उद्योग खासगी क्षेत्रास खुले करुन आता तब्बल पंधरा वर्षे लोटली आहेत. त्यापूर्वी विमा उद्योगात केवळ सरकारी कंपनी म्हणजे एल.आय.सी.चीच मक्तेदारी होती. खासगी कंपन्यांना यात प्रवेश दिल्यावरही प्रदीर्घ काळ एल.आय.सी.चेच विमा उद्योगावर प्रभूत्व होते. आता मात्र हळूहळू खासगी कंपन्यांनी ही बाजारपेठ काबीज करण्यास प्रारंभ केला असून नुकत्याच खासगी क्षेत्रातील मॅक्सलाईफ, मॅक्स फिनानिश्यल व एच.डी.एफ.सी. लाईफ या तीन कंपन्यांचे विलीनीकरण झाल्याने देशातील खासगी उद्योगातील सर्वात मोठी कंपनी स्थापन झाली आहे. त्याचबरोबर खासगी विमा कंपन्यांचा देशातील विमा बाजारातील वाटा ५२ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेले काही वर्षे या खासगी कंपन्यांचा वाटा जेमतेम ३५ टक्केच होता. त्यामुळे आपल्याकडे विमा उद्योगातील खासगी कंपन्या आपला जम काही बसवू शकत नाहीत असेच चित्र होते. विमा उद्योगातील एल.आय.सी.चे वर्चस्व कायमच राहाणार असे चित्र दिसत होते. आता मात्र याला छेद दिला गेला असून खासगी कंपन्या आता अधिक आक्रमकतेने वाटचाल करतील असे दिसते. त्यामुळे एल.आय.सी.साठी ही धोक्याची घंटा ठरु शकते. त्यासाठी त्यांनी आताच धोका ओळखून विमाधारकांसाठी नवीन नवीन योजना व चांगली सेवा देण्यास प्रारंभ केला पाहिजे. एल.आय्.सी.ने आपल्यात आमुलाग्र बदल केल्याशिवाय गे घडणार नाही. सरकारी लाल फितीचा कारभार आता फेकून देऊन त्यांनी काम करण्याची तयारी ठेवली पाहिजे. मॅक्सलाईफ, मॅक्स फिनानिश्यल व एच.डी.एफ.सी. लाईफ या तीन कंपन्यांचे विलीनीकरण झाल्याने आता शेअर बाजारात नोंद असलेली ही सर्वात मोठी खासगी कंपनी ठरली आहे. अजून सरकारी कंपनी एल.आय्.सी. शेअर बाजारात नोंदणीकृत नाही. या खासगी कंपनीच्या खालोखाल एस.बी.आय. लाईफ व आय.सी.आय.सी.आय. फ्रूडेंन्शियल लाईफ या दोन खासगी क्षेत्रातील मोठ्या कंपन्या म्हणून ओळखल्या जातात. आपल्याकडे शंभर कोटीहून जास्त लोकसंख्या असली तरी जेमतेम २० कोटी लोकांचाच विमा काढण्यात आलेला आहे. अर्थात देशातील गरीबांना आपला विमा काढणे काही शक्य होत नाही. सरकारने अल्प उत्पन्न गटातील लोकांना विम्याचे कवच पुरविले असले तरीही ते काही पुरेसे नाही. अशा वेळी विमा कंपन्यांचे लक्ष्य हे देशातील उच्च उत्पन्न गटातील लोक व मध्यमवर्गींयांकडेच आहे. सध्या याच लोकांमध्ये विम्याचे कवच घेण्याकडे कल असतो. कारण विमा घेणे त्यांना परवडू शकते. आपल्याकडे जसे लोकांचे उत्पन्न वाढत जाईल तसे विम्याची बाजारपेठ ही विस्तारत जाणार आहे. त्यादृष्टीने पाहता विमा कंपन्यांना मोठे आव्हान भविष्यात पेलावे लागणार आहे. आपल्याकडे प्राप्तिकर भारणार्‍यांची अजूनही लोकसंख्या जेमतेम तीन कोटी एवढी आहे. ही संख्या दुप्पट व्हावी यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत. त्याचप्रमाणे विमा उद्योगही वेगात वाढणार आहे. यात खासगी कंपन्या आक्रमकतेने वाटचाल करतील. मात्र त्यात सरकारी कंपनीने लाल फितीच्या चक्रात न अडकता व्यावसायिकदृष्ट्या काम करणे आवश्यक आहे. तसे केल्यास त्यांना देखील बाजारातील मोठा वाटा हस्तगत करता येऊ शकतो. अन्यथा त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा ठरु शकते, हे त्यांनी लक्षात घ्यावे.
-----------------------------------------------------------

0 Response to "एल.आय.सी.साठी धोक्याची घंटा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel