-->
चंदू चव्हाण मायदेशी

चंदू चव्हाण मायदेशी

संपादकीय पान बुधवार दि. 25 जानेवारी 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
--------------------------------------------
चंदू चव्हाण मायदेशी
देशाची सीमा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत घुसलेल्या भारतीय जवान चंदू चव्हाण यांची सुटका पाक सरकारने अनपेक्षितरित्या केली आहे. या घटनेचे स्वागत केले पाहिजे. यामुळे उभय देशातील संबंध सुधारण्यास मदत होणार आहे. भारताने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर लगेचच दुसर्‍या दिवशी चंदू चव्हाण पाकच्या हद्दीत शिरले होते. धुळे जिल्ह्यातील बोरीविहार गावचे असलेल्या चंदू चव्हाण यांचे अचानक पाकिस्तानच्या हद्दीत निघून जाणे हेच अनाकलनीय होते. वरिष्ठ अधिकार्‍यांशी झालेल्या भांडणामुळे डोक्यात राख घालून चंदू चव्हाण यांनी हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत असले तरी त्याला तसा काही ठोस आधार नाही.चंदू चव्हाणांच्या रूपाने एक भारतीय जवान पकडला गेल्यानंतर पाकिस्तानी राज्यकर्ते व लष्कर यांना चेव येणे साहजिकच होते. पाकिस्तानी प्रसार माध्यमांनी चंदू चव्हाणांना हेर ठरविले होते. मात्र चव्हाण हे कोणतीही हेरगिरी करण्यासाठी तेथे गेले नव्हते त्यामुळे या निरपराध माणसाची सुटका करण्यात यावी, अशी बाजू भक्कम पुराव्यानिशी भारताने पाकिस्तानकडे लावून धरलेली होती. अखेर पाक सरकारने भारतीय बाजू एैकून व त्याची शहानिशा करुन चव्हाण यांची सुटका केली आहे. आता पाकिस्तान सरकारच्या काही अपेक्षा आहेत. विविध गुन्ह्यांखाली अटक झालेले व न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेचा कालावधी पूर्ण केलेले 33 पाकिस्तानी नागरिक अद्यापही भारतीय तुरुंगात असून त्यांची ओळखही पटली आहे. भारताने त्यांची सुटका करून त्यांना मायदेशात परत पाठवावे, अशी मागणी पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बसीत यांनी केली आहे. यातील प्रत्येक प्रकरणाचा अभ्यास करुन निर्णय घेऊन भारत सरकार सकारात्मक पाऊल टाकेल असा विश्‍वास वाटतो. या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तचानच्या ताब्यात असलेल्या कुलभूषण जाधव यांची सुटकाही अपेक्षित आहे. गेल्या वर्षी बलुचिस्तान प्रांतात हेरगिरी केल्याच्या आरोपावरून त्याला पाकिस्तानने अटक केली होती. कुलभूषण भारतीय नौदलाचा माजी सैनिक. निवृत्तीनंतर व्यवसायानिमित्त त्याची जगभर भ्रमंती सुरू झाली. त्यातूनच बलुचिस्तानला असताना पाकिस्तानने त्याला अटक करून डाव साधला. आपण हेरगिरीसाठी पाकिस्तानात आलो होतो, असे त्याच्याकडून पाकिस्तानी अधिकार्‍यांनी जबरदस्ती वदवून घेतलेले असले तरी तो हेर नाही, असेच भारताचे मत आहे. त्यादृष्टीने काही पुरावेही पाकिस्तानला सादर करण्यात आले, परंतु कुलभूषणची सुटका पाकिस्तानने केलेली नाही. उभय देशातील संबंध जर सुधरायचे असतील तर अशा प्रकारे काही जणांच्या सुटका करुन एक पाऊल दोन्ही बाजूंकडून पडण्याची अपेक्षा आहे.
-------------------------------------------------------------

0 Response to "चंदू चव्हाण मायदेशी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel