-->
रविवार दि. ९ नोव्हेंेबर २०१४ च्या मोहोरसाठी लेख --
-------------------------------------------
मृत्यूश़य्येेवर कॉँग्रेस पक्ष
---------------------------------
प्रसाद केरकर
-------------------------------
ज्या कॉंग्रेस पक्षाने भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे तेजस्वी नेतृत्व केले आणि स्वातंत्र्य मिळाल्यावर अनेक दशके सत्ता उपभोगात प्रगतीचा पाया घातला, तो कॉंग्रेस पक्ष आता मृत्यूशय्येवरील एखाद्या रोग्याप्रमाणे झाला आहे. केंद्रातील कॉँग्रेसचे सरकार कोसळल्यावर लगेचच शंभरहून जास्त वर्षांची परंपरा असलेला हा पक्ष झपाट्याने सावरेल अशी अपेक्षा होती. परंतु ती अपेक्षा फोल ठरली. कारण त्यानंतर पुढील चार महिन्यात झालेल्या महाराष्ट्र व हरयाणा या दोन महत्वाच्या राज्याच्या निवडणुकात कॉँग्रेस पक्ष निवडणुकीच्या अगोदरच हरलेल्या मनस्थितीत निवडणूक लढला आणि शेवटी अपेक्षेनुसार त्यांना निवडणूक गमवावी लागली. सध्या कॉँग्रेस पक्षाची अवस्था युद्धभूमीवरील उदास आणि उजाड राहुटीसारखी झाली आहे. पक्षाकडे पराभवाने जखमी झालेले निष्ठावान सैनिक आजही आहेत. मात्र, त्यांना उमेद देणारा खंबीर, सळसळता सेनापती नाही आणि दुसरीकडे जायबंदी झालेल्या वृद्ध नेत्यांमध्ये नव्याने शंखनाद करण्याएवढी शक्ती उरलेली नाही.
स्वातंत्र्यानंतर जास्तीत जास्त काळ कॉँग्रेस पक्ष सत्तेत होता. पहिला मोठा पराभव त्यांनी पाहिला तो १९७७ साली. आणीबाणी नंतर झालेली ही निवडणूक म्हणजे कॉँग्रेस पक्षासाठी मोठी कसोटीच ठरली. परंतु त्यावेळी सत्तेत आलेल्या जनता पार्टीची दीड वर्षातच शकले झाली आणि इंदिरा गांधी व त्यांचा इंदिरा कॉँग्रेस पक्ष सत्तेत आला. त्यानंतर ९०च्या दशकात भाजपाची पाच वर्षांची असलेली सत्ता वगळता कॉँग्रेस पक्ष नेहमीच सत्तेत होता. संसदीय राजकारणात हार-जीत ही नित्याची बाब असते. मात्र कॉँग्रेस पक्षाने पराभव कमी पाहिलेले असल्याने व सत्ता जास्त काळ उपभोगली असल्याने सत्तेशिवाय जगणे या पक्षाला कठीण जाते. लोकशाहीतील लढाया कधी कुणाचा कायमचा पराभव करीत नाहीत आणि कोणाला जन्मभराचा पट्टाभिषेकही करीत नाहीत. मात्र, हे वास्तव कॉंग्रेस विसरून गेली की काय, अशी शंका येते. कॉँग्रेस पक्षाचा आणखी एक भरभक्कम पाया म्हणजे नेहरु-गाधी घराणे. या घराण्याने देशाला व कॉँग्रेसला बरेच काही दिले हे वास्तव आहे. परंतु गांधी घराण्यातील जर कुणी नेता पक्षाच्या नेतृत्वात नसेल तर कॉँग्रेस पक्ष गळपटलेल्या अवस्थेत असतो. मध्यंतरी राजीव गांधी यांच्या निधनानंतर नरसिंहराव यांच्या कारकिर्दीत कॉँग्रेस पक्षाचे नेतृत्व गांधी घराण्याकडे जवळपास एक तप नव्हते, हाच काय तो अपवाद. सोनिया गांधींनी पक्षाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ज्या विद्युत वेगाने पक्षावर आपले वर्चस्व स्थापन केले ते वाखाणण्याजोगेच होते. त्यानंतर त्यांनी सत्ताही खेचून आणली. त्यामुळे कॉँग्रेसवाल्यांना सोनिया गांधी या मते खेचणार्‍या मशिन आहेत याचा साक्षात्कार झाला आणि त्यांच्या मागे सर्व सत्तेची भूवातळ उभी राहिली. सोनिया गांधी यांनी २००९ साली देखील आपल्या करिश्म्यावर सत्ता कायम राखण्यात यश मिळविले. मात्र सलग दहा वर्षे सत्ता आल्याने काहीशी सुस्त झालेला कॉँग्रेस पक्ष ढिलाईने काम करु लागला. तसेच प्रशासनावरची पक्कडही ढिली झाली. भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे बाहेर आल्याने सरकारची प्रतिमा मलिन झाली. याची बरोबर संधी भाजपाचे नेते नरेंद्र मोदी यांनी साधली आणि कॉँग्रेसच्या या धोरणाविरुध्द रण माजवून राजकारण ढवळून काढले. मोदींचा हा झंझावात किती गंभीर आहे व त्यातून आपली सत्ता जाऊ शकते याचे मोजमाप करण्यास कॉँग्रेसचे नेते चुकले. शेवटी यातून कॉँग्रेसची सत्ता गेली. एकदा का सत्ता गेली की कॉँग्रेसचे नेतृत्व दुबळे होऊ लागले. पक्षाची उभारणी हीच मुळात सत्ताकेंद्रीत राजकारणावर झालेली असल्याने अनेक नेते मोदी कॅम्पमध्ये दाखल झाले. कॉँग्रेसचा वाडा पडका, भग्न होऊ लागला. आता भविष्यात राहूल गांधी या भग्न झालेल्या वाड्याला नवा साज देऊन नव्याने उभारी आणतील का हा सवाल आहे.  
कॉंग्रेसचे ज्येष्ठ सरचिटणीस दिग्विजयसिंग आता (तरी) राहुल गांधी यांनी पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारावे, अशी जाहीर गळ घालत आहेत. गेले काही दिवस दिग्विजयसिंगांपासून पी. चिदंबरम यांच्यापर्यंत आणि ए. के. अँटनी यांच्यापासून अशोक गेहलोत यांच्यापर्यंत असंख्य नेते राहुल यांच्याशी चर्चा करीत आहेत. या चर्चेचा तपशील गुलदस्त्यात असला तरी या सर्वांची भावना दिग्विजयसिंग यांच्यापेक्षा वेगळी खचितच नसणार. कॉंग्रेसमध्ये ज्येष्ठ, कर्तबगार आणि अनुभवी नेत्यांची फळीच्या फळी आहे. कोणत्याही पक्षाला हेवा वाटावा, असे बुद्धिमान, जगाचा आवाका असणारे आणि प्रकांडपंडित नेते आहेत. या सार्‍यांना एका सूत्रात ओवून सोनिया गांधी यांनी पक्षाला नवी दिशा, नवी ताकद दिली होती. तसे पुन्हा व्हावयाचे असेल तर राहुलनाही नव्या पिढीतील कर्तबगार नेत्यांची फौज बांधावी लागेल. राहुल सरचिटणीस झाले त्याला आता दहा वर्षे होतील. त्यांचे वडील दिवंगत राजीव गांधी यांची तर एकूण राजकीय कारकीर्दच दहा वर्षांची होती. तरीही, त्यांनी भारताच्या वाटचालीवर ठसा उमटविला. राहुल गांधी यांनी गेल्या दहा वर्षात पक्षाचे सरचिटणीस म्हणून नेमके कोणते काम केले व त्याचा पक्षाला कोणता फायदा झाला, असा सवाल आहे. राहूल गांधींनी देशव्यापी दौरे केले, अगदी दलित, आदिवासी वस्तीत राहून त्यांचे जीवन जवळून पाहिले. परंतु त्याची पुढील काळात सांगड घालून पक्षाला त्याचा कसा उपयोग होईल हे त्यांना जमले नाही. सत्ताधारी असताना लोकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रशासन व पक्षाची यंत्रणा गतिमान करुन त्याचा सर्वसामान्य जनतेला लाभ कसा होईल हे पाहाण्यात ते कमी पडले. नरेंद्र मोदी यांनी तरुणांशी संवाद साधून सोशल मिडियासारख्या नव्या माध्यमांशी आपली नाळ जोडत मतदारांना आपल्याकडे आकर्षित केले. तसे पाहता नरेंद्र मोदी यांनी वयाची साठी ओलांडली आहे. असे असूनही ते नव्या माध्यमांचा वापर तर करतातच तसेच तरुणांशीही उत्तम प्रकारे संवाद साधू शकतात. मात्र राहूल गांधी हे तरुण असूनही यात मागे पडले. कॉँग्रेसने या आपल्या अपयशाचा अभ्यास केला आहे का ?
कॉंग्रेसने गांधीघराण्याच्या बाहेरचा नेता निवडावा का, ही चर्चा काही दिवसांपूर्वी नव्याने सुरू झाली आहे. तशी ती अधुनमधून होत असते. मात्र, बर्‍याचदा ती कॉंग्रेसपेक्षा बाहेरचेच लोक अधिक करतात. परंतु सध्या कॉँग्रेसकडे नेतृत्वाबाबत अन्य पर्यायही उपलब्ध नाही. प्रियांका गांधी जर राजकारणात आलीच तर तो एक सशक्त पर्याय ठरु शकतो. मात्र तोपर्यंत राहूल गांधींना नेतृत्वात चॅलेंन्ज होण्याची शक्यता नाही. अशा वेळी राहूल गांदींचे नेतृत्व कॉँग्रेसला तारु शकते काय असा प्रश्‍न उपस्थित होतो. कॉँग्रेसचे नेतृत्व हे जनसामान्यांतील आहे, असे आम जनतेला कधी वाटेल. तसे वाटण्यासाठी राहूल गांधी जीवाचा आटापीटा करतील का?  तसे आता राहुलना नव्याने सिद्ध करावे लागेल. आजही देशातील जास्तीत जास्त राज्यांमध्ये कार्यकर्ते असणारा आणि कधी ना कधी तेथे सत्तेवर असलेला कॉंग्रेस हा एकच पक्ष आहे. गरज आहे ती या निपचित पडलेल्या संघटनेत चैतन्य फुंकण्याची. मरणासन्न असलेली ही कॉँग्रेसची अवस्था बदलेल का, असा प्रश्‍न उपस्थित होतो. भाजपाचे नेते कॉंग्रेसमुक्त भारताची स्वप्ने पाहात आहेत. ते प्रचार म्हणून ठीक असले तरी भारतीय लोकशाहीच्या वाटचालीसाठी ते योग्य नाही. कारण एकपक्षीय राजकारण आपल्याकडील लोकशाहीतील जान संपवून टाकेल. त्यासाठी सत्ताधार्‍यांना तुल्यबळ असा विरोधी पक्ष असण्याची आवश्यकता आहे. राहुल इतके दिवस नेतृत्व स्वीकारण्यास अनुत्सुक होते. आता त्यांची मानसिक तयारी झाली आहे, असे सांगितले जाते. ते खरे असेल तर त्यांनी यापुढे एक क्षणही दवडता कामा नये. दिग्विजयसिंग यांनी म्हटल्याप्रमाणे नव्या कॉंग्रेस अध्यक्षाने रस्त्यावर उतरून, गावागावात जाऊन भारत-यात्रा काढण्याची गरज आहे. हा सल्ला राहुल किती लवकर ऐकतात हे कळेलच. प्रश्न त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा नाहीच, कॉंग्रेस नावाच्या वटवृक्षाला नवी पालवी फुटण्याचा आहे. अन्यथा कॉँग्रेसची ही मरणासन्न अवस्था सुधारणार नाही.
----------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel