-->
संपादकीय पान सोमवार दि. १० नोव्हेंेबर २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
आजारी महाराष्ट्र
----------------------------------
सध्या देशात व महाराष्ट्रात नरेंद्र मोदी यांच्या मोहिमेचा भाग म्हणून स्वच्छतेची मोहीम राबविली जात आहे. स्वच्छतेची ही मोहीम स्वगतार्ह आहे. परंतु ही स्वच्छता केवळ दिखाव्यापुरती व एक फॅशन ठरु नये. ही मोहीम कायम स्वरुपी राबविली पाहिजे. एकदा स्वच्छता केली की आपले काम झाले व आता सगळीकडे स्वच्छता नांदेल अशी समजूत लोकांची असेल तर ती चुकीची आहे. मात्र एकीकडे स्वच्छतेची मोहीम राबविली जात असताना राज्यात डेंग्यु, हिवताप-गॅस्ट्रोसारख्या रोगांनी हजारो लोकांना पछाडले आहे. राज्यातील १९ जिल्ह्यातील डेंग्युचे रुपण आढळले आहेत. यावर उपाय म्हणजे मोठ्या प्रमाणात डासांचा नायनाट करावा लागेल तर दुसरीकडे नवीन डासांची पैदास होणार नाही याकडे लक्ष द्यावे लागेल. प्रत्येक ठिकाणचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी मोहीम हाती घ्यावी लागेल. मुंबईसारख्या महानगरात तर डेंग्युने थैमानच घातले आहे. एका शिक्षण घेणार्‍या डॉक्टराचा मृत्यू झाल्यावर राज्यात खळबळ उडाली आणि या रोगाकडे गांभिर्याने बघण्यास सुरुवात झाली. संपूर्ण राज्यात थैमान घालणार्‍या डेंग्युची लागण रायगड जिल्ह्यातही झालेली आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून उपलब्ध माहितीनुसार जानेवारी ते ऑक्टोबर २०१४ या १० महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात डेंग्युचे ३८१ संशयित रुग्ण निष्पन्न झाले. डेंग्युची खातरजामा करण्याकरिता करण्यात येणार्‍या उपचारांमध्ये एकूण ३५ रुग्णांच्या चाचण्या सकारात्मक निष्पन्न झाल्या. त्यांच्यावर जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार करुन डेंग्युमुक्त करण्यात आले. दरम्यान एप्रिल २०१४ मध्ये अलिबाग तालुक्यांतील सागांव येथील यशवंत भगत यांचा डेंगीमुळे मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा डेंग्युने डोके वर काढल्याचे स्पष्ट झाले. डेंग्युचा सर्वाधिक प्रादुर्भाव ज्या ठिकाणी इमारत बांधकामे सुरु आहेत, अशा ठिकाणी झाल्याचे दिसून येतोे. जिल्ह्यातील एकूण ३८१ डेंग्यु संशयित रुग्णांमध्ये ९० टक्के रुग्ण या बांधकामांवरील परप्रांतीय मजूर असल्याचे निष्पन्न झाले आहे. रायगड जिल्हा रुग्णालयात दाखल ३८ डेंग्यु रुग्णांमध्ये चार रुग्ण अलिबाग शहर परिसरातील होते तर उर्वरित ३४ रुग्ण हे बांधकामांवरील परप्रांतीय मजूर होते. ग्रामीण भागात गाव, वाडी, वस्तीवर सध्या डेंगीचे रुग्ण आढळून आले आहे. डेंगी ताप (हाडमोडी ताप) हा आजार विशिष्ट विषाणूंमुळे होतो. डेंगीचा प्रसार एडीस एजिप्टाय नावाच्या डासापासून होतो. या डासाची उत्पत्ती साठविलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. प्रामुख्याने प्लास्टिकच्या बादल्या, नारळाच्या करवंट्या, घरातील शोभेच्या कुंड्या, फुलदाण्या, निरुपयोगी टायर्स आदी ठिकाणी डासांची उत्पत्ती होते. याविषयी जनजागृती करण्याची आवश्यक आहे. रायगड जिल्ह्याच्या शेजारीच असलेल्या ठाणे, पालघर जिल्ह्यांत डेंग्यूने व विविध साथीच्या रोगाने डोके वर काढले आहे़ येथील शहरी व ग्रामीण भागांत आतापर्यंत सुमारे ८ हजार १३६ रुग्ण या आजारांनी त्रस्त आहेत. यातील हिवतापाने तिघांचा मृत्यू झाला असून, दोघे डेंग्यूने दगावले आहेत़  या जिल्हा शासकीय रुग्णालयासह त्यांच्या नियंत्रणातील ६ रुग्णालये, तर जिल्हा परिषदेची सुमारे ६५ प्राथमिक आरोग्य केंदे्र आणि महापालिका रुग्णालय परिसरात सुमारे १० हजार रुग्णांपेक्षा जास्त रुग्ण गॅस्ट्रो, हिवताप, अतिसार, हगवण, कावीळ इत्यादी साथीच्या आजारांनी हैराण आहेत. परंतु, प्राप्त अहवालानुसार शासकीय रेकार्डवर सुमारे ८ हजार १३६ रुग्ण मागील चार महिन्यांपासून आतापर्यंत साथीच्या आजारांनी जर्जर आहेत. तरीही, सद्य:स्थितीला जिल्ह्यात कोठेही साथीचा उद्रेक नसून प्रत्येक रुग्णालयात एक-दोन तापाचे रुग्ण उपचार घेत असल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे़ साथीच्या आजारांसह डेंग्यूच्या तापाने सुमारे ५२५ रुग्ण फणफणत असून, यापेक्षा तिप्पट रुग्ण डेंग्यूचे संशयित म्हणून उपचार घेत आहेत. डेंग्यूमुळे तिघांचा मृत्यू झाला आहे. यातील दोघे मीरा-भार्‌इंदर महापालिका क्षेत्रातील असले तरी मृतांमधील एक डेंग्यूचा संशयित असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय, ठाणे महापालिकेच्या परिसरात एकाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. या साथीच्या आजाराने मुंबई, ठाण्यासह अख्खा महाराष्ट्र तापला आहे. यानुसार, ठाणे शहरासह मीरा-भार्‌इंदर, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली मनपाचा काही भाग, भिवंडी तालुक्यातील खारबाव परिसर तर मुरबाड आणि शहापूर तालुक्यांतील काही नागरी भागांस अतिसंवेदनशील म्हणून घोषित केले आहे. अशा प्रकारे एकीकडे विविध रोगांनी घर केले असताना रायगड जिल्ह्यातील ५२ गावांमध्ये दुषित पाणीपुरवठा होत असल्याचे आढळले आहे. अनेक साथींच्या रोगांचे हे मूळ आहे. मात्र आपल्याकडे स्वच्छ पाणी पुरविण्यासाठी विशेष प्रयत्न होताना दिसत नाहीत. अनेक ग्रामपंचायती आपल्या गावात स्वच्छ पाणी मिळावे यासाठी विश्ष प्रयत्न करताना दिसत नाहीत. सुमारे ६५ टक्के ग्रामपंचायती ब्लिचिंग पावडर खरेदी करीत नाहीत किंवा त्यांच्यापर्यंत ते पोहोचत नाही असेही आढळले आहे. ज्या गग्रामपंचायतींना एम.आय.डी.सी.कडून पाणीपुरवठा होतो त्या विभागात चांगले पाणी पोहोचत असेलही. मात्र अनेक ग्रामपंचायतींना स्वच्छ पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळेच रोगराई वाढण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे केवळ स्वच्छ भारत अभियानाचा दिखावा करण्यापेक्षा स्वच्छता व स्वच्छ पाणी पुरविण्याकडे लक्ष दिले पाहिजे. स्वच्छता ही प्रत्येक माणसांच्या आंगात भिनली पाहिजे. अन्यथा आजारी महाराष्ट्र साथींच्या रोगांच्या विळख्यातून बाहेर पडणार नाही.
-------------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel