-->
स्वाभिमानी चंद्राबाबू

स्वाभिमानी चंद्राबाबू

शुक्रवार दि. 09 मार्च 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
स्वाभिमानी चंद्राबाबू
आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याबाबत केंद्र सरकारने नकारघंटा दर्शवताच तेलुगू देशम पक्षाने (टी.डी.पी.) राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एन.डी.ए.) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि टी.डी.पी.चे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू यांनी आपला तेलगू स्वाभिमान जाहीर करीत हे पाऊल उचलले आहे. गेली चार वर्षे चंद्राबाबू भाजपाच्या आघाडीत होते. ते अशा प्रकारे टोकाचे पाऊल उचलतील अशी अपे7ा भाजपालाही नसावी. अर्थात ते बाहेर पडल्यामुळे केंद्रातील भाजपाच्या सरकारला कोणाताही धोका नसला तरीही त्यंचा सहकारी पक्ष बाहेर पडतो, ही बाब लक्षणीय ठरते. आपल्याकडील शिवसेना फक्त राजीनामे खिशात घालून फिरत असल्याचा केवळ बनावच करते, सत्तेत राहून भाजपावर टीका करण्याचे काम फक्त शिवसेना करते, परंतु सत्ता सोडण्याचे धारिष्ट्य काही दाखवित नाही. शिवसेनेने चंद्राबाबूंकडून धडा घेणे महत्वाचे आहे. चंद्राबाबूंनी हे पाऊल उचलले यामागे त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्‍न होता. कारण गेल्या चार वर्षात भाजपाबरोबर केंद्रात सत्ता उपभोगूनही राज्याला फारसे काही हाती लागलेले नाही. त्याबद्दल जनतेत नाराजी आहे. चंद्राबाबू नायडू पत्रकार परिषदेत म्हणाले की, पूर्वीच्या आंध्र प्रदेश राज्याचे विभाजन होऊन तेलंगणा हे नवे राज्य अस्तित्वात आले. त्यामुळे राज्याला विशेष राज्याचा दर्जा मिळणे हा आमचा अधिकार आहे. यासाठी आम्ही अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाल्यापासून केंद्र सरकारकडे आंध्रला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी लावून धरली होती. मात्र, याकडे सरकारने  दुर्लक्ष केले. आम्ही गेल्या चार वर्षांपासून संयम दाखवला. सर्व प्रकारे आम्ही केंद्र सरकारला समजावण्याचा प्रयत्न केला मात्र, त्याचा फायदा झाला नाही. मी एक जबाबदार वरिष्ठ नेता असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्यासाठी दिल्लीतही गेलो. मात्र, त्यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे एकूणच सरकार आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यास उत्सुक नसल्याचे आमच्या लक्षात आले आहे. नक्की माझी काय चूक झाली हे मला कळलेले नाही. केंद्र सरकार उगाचच इतर गोष्टी आम्हाला का सांगत आहेत, असे सांगत नायडू यांनी अखेर आपण एन.डी.ए.तून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले. भाजपा आपल्या सहकारी पक्षांबाबत किती बेफिर आहे हे दखील यावरुन समजते. चंद्राबाबू नायडू यांना आता भाजपाबरोबर राहणे म्हणजे आपण आपला पराभव करुन घेण्यासारखे आहे, असे वाटू लागले असावे. त्यामुळे त्यांनी निवडणुकीला जेमतेम वर्षाहून कमी काळ असताना बरोबर भाजपाच्या आघाडीला रामराम केला आहे. यामुळे चंद्राबाबूंची राज्यातली पत वाढली आहे व भाजपाच्या आघाडीला रामराम करुन ते अन्य कोणत्याही आघाडीत सामिल होण्यासाठी मोकळे झाले आहेत. सध्या प्रादेशिक पक्षांना एकत्र आणून भाजपाला समर्थ पर्याय देण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. चंद्राबाबूंना त्या आघाडीत बहुदा रस असावा, असे दिसते. कॉग्रेसने चंद्राबाबूंवर त्यातूनच टीका केली आहे. भाजपच्या वाढत्या प्रभावाला शह देण्याच्या दृष्टीने काँग्रेस तसेच भाजप या दोन्ही पक्षांना बाजूला ठेवून नवी आघाडी करण्याचा विचार सुरु झाल्याचेे दिसते. तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी या कामी पुढाकार घेऊला आहे. प्रादेशिक पक्षांना एकत्र करुन त्यांची अस्मिता टिकावी यासाठी हे प्रयत्न आहेत. त्यातूनच प्रादेशिक पक्षांच्या फेडरल आघाडीची कल्पना पुढे आली आहे. आजवर काँग्रेस तसेच भाजपला बाजूला ठेवून तिसरी आघाडी करण्याचे प्रयत्न यापूर्वी झालेले आहेत. परंतु त्याला फारसे यश आलेले नाही. संबंधित राज्यातील प्रादेशिक पक्षांचे महत्त्व अबाधित राखून देशातील दोन प्रमुख पक्षांविरोधात उभे राहणे, ही नवी संकल्पना चंद्रशेखर राव मांडत आहेत. यातून एक नवे राजकीय व्यासपीठ उभे राहाण्याची शक्याता आहे. पण त्यांची विचारसरणी किंवा कार्यक्रमाचा पायाभूत आधार कोणता, हा महत्वाचा प्रश्‍न ठरणार आहे. तसेच याचे नेतृत्व कोण करणार हा सर्वात मोठा सवालही आहे. राव यांच्या कल्पनेचे पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वागत केले आहे. राव यांनी स्वत:च शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच द्रमुकचे ज्येष्ठ नेते एम. करुणानिधी यांचे चिरंजीव स्टॅलिन यांच्याशी संपर्क साधण्याचा मनोदयही जाहीर केला आहे. अर्थात यातून राव यांची राष्ट्रीय नेतृत्व करण्याची मनिषा देखील असावी.  राव यांनी ही भूमिका मांडण्याआधीच तिकडे उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पक्ष एकमेकांना सहकार्य करण्यास तयार झाले आहेत. उत्तरेतील राजकारणातील ही दोन दशकातील महत्वाची राजकीय घटना असल्याचे बोलले जाते.बसपाच्या सुप्रीमो मायावती यांनी स्वत:च राज्यसभेच्या एका जागेच्या बदल्यात गोरखपूर तसेच फूलपूर या दोन मतदारसंघांतील लोकसभा पोटनिवडणुकीत समाजवादी पार्टीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधी मते या दोन पक्षांत विभागल्याने भाजपला मोठे बहुमत मिळाले. त्यांनी आपली समाजवादी पक्षाशी आघाडी झालेली नसून, जो कोणी आणि जेथे कोठे भाजपचा पराभव करण्याची शक्यता असेल, तेथे त्यास सहकार्य करण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस हा देखील एक प्रादेशिक पक्ष आहे. या पक्षाचे नेते शरद पवार यांनी मात्र काँग्रेसबरोबर जाण्याचे स्पष्ट केले आहे. अजून तरी या सर्व संकल्पना कागदावर आहेत. परंतु भाजपाविरोधी आघाडी उभारण्याच्या हालचाली सुरु झाल्या एवढे मात्र नक्की. त्याचे रणशिंग चंद्राबाबूंनी फुकले आहे.
---------------------------------------------

0 Response to "स्वाभिमानी चंद्राबाबू"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel