-->
‘ऑटो’ ग्राफ

‘ऑटो’ ग्राफ

‘ऑटो’ ग्राफ

 (14/01/12) FOR RASIK

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दिल्ली थंडीने गारठली असताना वाहन उद्योगाच्या अनोख्या जत्रेत नवनवीन वाहनांचे ‘कॅटवॉक’ झाले. जगातील आघाडीच्या वाहन कंपन्यांनी येथे लावलेल्या उपस्थितीमुळे भारत हे आता जगाचे ‘डेट्रॉइट’ (अमेरिकी वाहननिर्मिती उद्योगाचे प्रमुख केंद्र) होत असल्यावरच जणू शिक्कामोर्तब झाले. गेल्या पाच वर्षांपासून दिल्लीत भरणा-या या ‘ऑटो एक्स्पो’कडे यंदा सा-या जगाचे लक्ष लागले होते. यामागचे कारणही तसेच आहे. एक तर वाहन खरेदीदारांची मोठी बाजारपेठ आपल्याकडे आहे आणि दुसरे म्हणजे, जगातील अनेक कंपन्यांचे येथे स्थिरावलेले उत्पादन प्रकल्प. म्हणूनच, सध्या ‘टॉप गिअर’मध्ये असलेला देशातील वाहन उद्योग आशिया खंडातील महत्त्वाचे उत्पादन केंद्र म्हणून नजीकच्या काळात नावारूपाला आल्यास कुणाला आश्चर्य वाटणार नाही.
गेल्या पाच दशकांत आपल्याकडील वाहन उद्योगाचा ‘ऑटो’ग्राफ हा सतत विक्रीची नवनवीन शिखरे गाठत आहे. मुंबईच्या रस्त्यावरून पहिली मोटार धावली त्या घटनेला आता 122 वर्षे लोटली. 1898 मध्ये देशात पहिली आयात केलेली मोटार आली. 1930पर्यंत मोटारी या थेट आयात केल्या जायच्या. 1940 मध्ये महिंद्रा अँड महिंद्राने जीप्सच्या सुट्या भागांची जोडणी करून त्याची विक्री करण्यास प्रारंभ केला. हळूहळू कंपनीने व्यापारी वाहने व ट्रॅक्टरचे उत्पादन सुरू केले. एका अर्थाने देशाच्या वाहन उत्पादनाची पायाभरणी झाली. आज 72 वर्षांनंतर भारताचा वाहन उद्योगातील उत्पादनात जगात सहावा क्रमांक लागतो. ‘ऑटो एक्स्पो’च्या निमित्ताने मागे वळून पाहताना हा वाहन उद्योगाचा इतिहास भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीच्याही इतिहासाचा साक्ष ठरला आहे.
1947 मध्ये स्वातंत्र्यानंतर सरकारने वाहन उद्योगाच्या प्रोत्साहनासाठी विविध योजना आखल्या तरीही या उद्योगाची वाढ ही फर्स्ट गिअरवर असल्यासारखी होती. याच काळात बजाज ऑटोने दुचाकी वाहनांच्या निर्मितीसाठी इटलीच्या व्हेस्पा कंपनीशी सहकार्य करार केला आणि देशात त्यांचे उत्पादन सुरू झाले. स्वातंत्र्यानंतर पहिली तीन दशके म्हणजे 1970पर्यंत वाहन उद्योगाची प्रगती धिम्या गतीनेच होती. चारचाकी वाहनांत प्रीमियर पद्मिनी आणि अम्बॅसिडर हे दोनच ब्रँड आपल्याकडे होते. यातील ‘अम्बॅसिडर’ हे वाहन शासकीय कामासाठी प्रामुख्याने वापरले जायचे, तर लोकांसाठी प्रीमियर हा एकमेव पर्याय होता. त्या काळी मुळातच मोटार वापरणे हे मध्यमवर्गीयांच्याही आवाक्यात नव्हते. अन्य जनता तर केवळ स्वप्नातच मोटारीची खरेदी करू शकत होती. मोटार ही श्रीमंतांनीच वापरण्याची वस्तू आहे, अशी ठाम समजूत होती आणि ती खरीही होती. कारण त्या काळी मध्यमवर्गीयांच्या हातात आतासारखा मुबलक पैसा खुळखुळत नव्हता. 1970पासून वाहन उद्योगाला थोडी उभारी येऊ लागली. वाहतुकीची व्यापारी वाहने, हरित क्रांतीनंतर ट्रॅक्टर आणि दुचाकी वाहनांचा खप वाढू लागला. दुचाकी वाहनांत ‘बजाज आॅटो’ची मक्तेदारीच होती आणि त्यांना हे वाहन मिळण्यासाठी पाच ते सात वर्षांची प्रतीक्षा करावी लागे. आताच्या पिढीला मोटार व दुचाकी वाहनांचे एवढे मुबलक पर्याय उपलब्ध आहेत, हे पाहता त्यांना जर स्कूटरसाठी पाच वर्षांची प्रतीक्षा करण्याचाही एक काळ होता असे सांगितले, तर खरेही वाटणार नाही.
संजय गांधींच्या कल्पनेतून आकारास आलेल्या ‘मारुती’चा भारतीय बाजारपेठेतला प्रवेश हा वाहन उद्योगासाठी ख-या अर्थाने टर्निंग पॉइंट ठरावा. कारण ‘मारुती’मुळे सर्वात प्रथम मध्यमवर्गीयांचे मोटार खरेदीचे स्वप्न खरे होणार होते. इंदिरा गांधी यांचे धाकटे पुत्र संजय गांधी यांनी सर्वसामान्य मध्यमवर्गीयांना परवडेल अशी केवळ 25 हजारांची मोटार बाजारात आणण्याचे 70च्या दशकात ठरवले होते; परंतु आणीबाणी, त्यानंतर सत्तेत आलेल्या जनता पार्टीच्या पहिल्या बिगरकाँग्रेस सरकारने गांधी कुटुंबाच्या मागे लावलेला चौकशीचा ससेमिरा, त्यानंतर इंदिरा गांधींचा दणकून झालेला विजय, संजय गांधींचा झालेला अपघाती मृत्यू या एकूण सर्वच प्रवासात ‘मारुती’च्या गाडीला चांगली-वाईट अशी दोन्ही प्रकारची बरीच प्रसिद्धी मिळाली होती. मारुतीचे पहिले मॉडेल ‘मारुती 800’ हे अल्पावधीत लोकप्रिय होण्यामागे अनेक कारणे होती.
त्यातले सर्वात महत्त्वाचे कारण होते ते म्हणजे, जे कुणी त्या काळचे वाहन खरेदी करणारे ग्राहक होते ते प्रीमियर किंवा अम्बॅसिडर या दोन्ही वाहनांना कंटाळले होते. या दोन्ही मॉडेलची देशातील वाहन उद्योगात मक्तेदारी असल्यासारखी स्थिती असल्याने त्यांना आपल्यात सुधारणा करण्याची काही गरज वाटत नव्हती. लोकांना यातून पहिल्यांदाच पर्याय आला तो सुझुकीच्या ‘मारुती’ मोटारीच्या रूपाने. त्याच वेळी मध्यमवर्गीय समाज विस्तारू लागला होता. अशा वेळी मोटार आपल्या दाराशी असावी, हे त्यांचे स्वप्न ‘मारुती’ पूर्ण करणार होते.
मध्यमवर्गाच्या उदयाबरोबरच ‘मारुती’च्या विक्रीने जोर धरला आणि प्रीमियर-अम्बॅसिडर यांची मक्तेदारी संपुष्टात आली. परिणामी, वर्षानुवर्षे भारतीय वाहन उद्योगावर आपले अधिराज्य असलेले हे दोन्ही ब्रँड काळाच्या ओघात लुप्त पावणार की काय, अशी स्थिती निर्माण झाली. प्रीमियर आणि अम्बॅसिडर यांनी विक्रीत ‘रिव्हर्स गिअर’   गाठला असतानाच 1991 मध्ये आर्थिक उदारीकरणाचे युग सुरू झाले आणि एकूणच कॉर्पोरेट क्षेत्र घुसळून निघाले. यात आॅटो क्षेत्राचाही अपवाद नव्हता. इथूनच देशातील आॅटो उद्योगाने एक नवी झेप घेतली. उदारीकरणाच्या पहिल्या टप्प्यात थेट विदेशी गुंतवणुकीसाठी वाहन उद्योग खुला करण्यात आला आणि जगातील वाहन कंपन्यांनी हळूहळू आपला मोर्चा इकडे वळवण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर देशातील वाहन कंपन्यांनी आपल्याला आता जगातील कंपन्यांशी स्पर्धा करावी लागणार हे गृहीत धरून नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी जगातील कंपन्या ताब्यात घेण्यास सुरुवात केली. टाटा मोटर्स, महिंद्रा यांनी या दृष्टीने पावले टाकली. टाटांनी ‘जग्वार’, ‘लँड रोव्हर’ हे ब्रँड ताब्यात घेणे ही एक महत्त्वाची घटना म्हटली पाहिजे. भारतीय कंपन्यांचे हे धोरण यशस्वी झाले. अन्यथा जागतिक पातळीवरील कंपन्यांशी स्पर्धा करणे त्यांना निश्चितच जड गेले असते. ‘मारुती सुझुकी’ ही एकेकाळी सरकारी व जपानी सुझुकीच्या साहाय्याने स्थापन झालेल्या कंपनीतील भांडवल भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने सुझुकीलाच विकले आणि ही कंपनी आता पूर्णत: सुझुकीच्या मालकीची झाली. त्यामुळे ‘मारुती’ ही आता ख-या अर्थाने विदेशीच कंपनी झाली आहे. त्याशिवाय जनरल मोटर्स, ह्युंदाई, होंडा, रेनॉल्ड, मर्सिडीज बेन्झ, शेवरले, फोक्सवॅगन, फोर्ड, फियाट, टोयोटा या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी देशात उत्पादन प्रकल्प थाटले. आजच्या घडीला जवळजवळ आघाडीच्या प्रत्येक बहुराष्ट्रीय वाहन कंपनीचा प्रकल्प भारतात आहे. यामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या सुमारे दहा लाखांहून जास्त लोकांना रोजगार मिळाला आहे. दिल्लीजवळील गुरगाव, महाराष्ट्रात चाकण व पुण्याजवळ पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, दक्षिणेत चेन्नई ही वाहन उद्योगाची काही महत्त्वाची उत्पादन केंद्रे निर्माण झाली आहेत. आता यात गुजरातमधील साणंदचीही भर पडली आहे.
गेल्या दोन दशकांत मोटारींच्या बाजारपेठेने जसा आपल्यावर ठसा उमटवला, तसा दुचाकी वाहनांनीही जगात सर्वाधिक उत्पादन करून आपले नाव जगात कमावले आहे. सुरुवातीला दुचाकी बाजारपेठेत फक्त ‘बजाज’चीच मक्तेदारी होती; परंतु त्यांच्या या मक्तेदारीला होंडा, टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांनी आव्हान दिले ते उदारीकरणानंतर. मात्र, असे असले तरी बजाजने आपले स्थान या क्षेत्रात बळकट केले आहे. सुरुवातीला स्कूटर सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय होती; परंतु स्कूटरची जागा हळूहळू बाईकने घेतली. आता पुन्हा एकदा स्कूटरची बाजारपेठ डोके वर काढू लागली आहे. पूर्वी बजाजची स्कूटर तिरपी करून किक मारून स्टार्ट करावी लागत असे. तो काळ जाऊन आता बटन दाबल्यावर झटक्यात सुरू होणाºया बाइक, स्कूटर आल्या. लोकांच्या सोयीसाठी दुचाकी वाहनात बदल होत गेले. या घटकेला भारत हा लहान आकाराच्या मोटारींचे जगात सर्वाधिक उत्पादन करतो, तसेच याची सर्वात मोठी बाजारपेठही आपल्याकडेच आहे. सुझुकीच्या ‘अल्टो’ या मध्यम आकारातील मोटारीचा खप आपल्याच देशात सर्वाधिक आहे. टाटांच्या नॅनोने एक लाख रुपयांत मोटार आणण्याचे स्वप्न दाखवले खरे; परंतु त्याचा हा फंडा काही विशेष क्लिक झाला नाही. टाटांना दुचाकी वाहनांचा ग्राहक नॅनोच्या रूपाने आपल्याकडे खेचायचा होता; परंतु त्यात त्यांना फारसे यश आले नाही. आता ‘बजाज’च्या रिक्षाला पर्याय म्हणून तयार करण्यात आलेल्या चारचाकी मोटारीचीही अशीच कसोटी लागणार आहे. छोट्या व मध्यम आकारातील मोटारींची जशी मोठी बाजारपेठ आपल्याकडे आहे, तसाच लक्झरी गाड्यांचाही खप आपल्याकडे वाढत चालला आहे. उदारीकरणानंतर नव्याने जन्माला आलेला उच्च मध्यमवर्गीय, नवश्रीमंत, श्रीमंत शेतकरी हे लक्झरी गाड्यांचे ग्राहक आहेत. त्यामुळे आपल्याकडे एक लाखाच्या मोटारीपासून एक-दोन कोटी रुपयांच्या मोटारींचेही मुबलक ग्राहक आहेत. एकूणच आपल्याकडे वाहन उद्योगाचा चढत असलेला हा ग्राफ विकसित देशांनाही मागे टाकण्याच्या क्षमतेचा आहे.
भारतात रस्ते चांगले नसताना वाहन उद्योगाचा कसा विकास होईल, असा विचार हे क्षेत्र विदेशी गुंतवणुकीसाठी खुले करताना मांडला होता; परंतु गेल्या दोन दशकांत झपाट्याने वाढलेला मध्यमवर्गीय तसेच नवश्रीमंतांनी वाहनांची संपूर्ण बाजारपेठ फुलवली आहे. त्यातच आपल्याकडे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा आणि एकूणच नागरी नियोजनाचा बोजवारा उडाल्यामुळे अप्रत्यक्षरीत्या वाहनांच्या विक्रीला हातभार लागला आहे. गेल्या वर्षी देशात तीस लाख वाहनांचे उत्पादन झाले. वाहनांच्या निर्यातीतही आपला जगात तिसरा क्रमांक लागतो. ही सर्व आकडेवारी पाहता, गेल्या तीन दशकांत आपल्याकडे वाहन उद्योग अर्थव्यवस्थेबरोबर झपाट्याने वाढत गेला, त्याचे द्योतक ठरला आहे. ऑटो उद्योगाचा हा ग्राफ असाच चढता राहील यात शंका नाही.prasadkerkar73@gmail.com

0 Response to "‘ऑटो’ ग्राफ"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel