-->
भारतीय वंशाच्या त्रिनिदाद व टोबॅगोच्या पंतप्रधान

भारतीय वंशाच्या त्रिनिदाद व टोबॅगोच्या पंतप्रधान

भारतीय वंशाच्या त्रिनिदाद व टोबॅगोच्या पंतप्रधान 
प्रसाद केरकर, मुंबई  Published on 14 Jan-2012 PRATIMA
त्रिनिदाद व टोबॅगोच्या पहिल्या महिला पंतप्रधान आणि मूळ भारतीय वंशाच्या कमला प्रसाद बिसेसर या अलीकडेच देशात झालेल्या प्रवासी भारतीय परिषदेसाठी प्रमुख पाहुण्या म्हणून देशात आल्या होत्या. कमला प्रसाद या जुन्या कागदपत्रावरून बिहारची कन्या असल्याचे आढळले आहे. या वेळच्या भारत भेटीत त्यांनी आपल्या मागच्या पिढीतील लोकांच्या येथील वास्तव्याचा आढावा घेतला. त्यांनी भारताशी आपले असलेले नाते जाणून घेण्यासाठी त्रिनिदादचे पुरातत्त्व संशोधक शम्सुद्दिन यांची खास नियुक्ती केली होती. कमला प्रसाद या बिहारमधील बक्सर जिल्ह्यातील भेलूपूर गावचे रहिवासी असलेल्या रामलखन मिर्शा यांच्या वंशज आहेत. मिर्शा हे 1889 मध्ये जहाजामार्गे त्रिनिदादला रोजगारासाठी रवाना झाले होते. त्याकाळी ब्रिटिशांच्या आमदानीत त्रिनिदाद व मॉरिशस येथे अनेक लोकांची रवानगी रोजगारासाठी करण्यात आली होती. कमला प्रसाद यांचे वडील कोलकात्यामधून ‘खुला वोल्गा’ या जहाजातून तीन महिने प्रवास केल्यावर ते त्रिनिदादला पोहोचले. तेथेच त्यांनी विवाह केला आणि कमला प्रसाद यांचा 22 एप्रिल 1952 मध्ये जन्म झाला. शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी वेस्ट इंडीज विद्यापीठातून पदवी संपादन केली. बी.ए. ऑनर्स केल्यावर त्यांनी कायद्याचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी व्यवस्थापनातील प्रशासनाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. शिक्षण पूर्ण झाल्यावर कमला प्रसाद यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला. शिक्षण घेत असताना त्यांनी चर्च ऑफ इंग्लंड चिल्ड्रेन सोसायटी ऑफ लंडन येथे सामाजिक काम केले. याच काळात त्यांचा विवाह झाला आणि एक मुलगाही झाला. वेस्ट इंडीज विद्यापीठात त्यांनी लेक्चरर म्हणून काम करीत असताना कमला प्रसाद यांनी जमेका कॉलेज ऑफ इन्शुरन्समध्येही लेक्चर्स दिली. सहा वर्षे येथे काम केल्यावर त्यांची पूर्णवेळ अँटर्नी म्हणून नियुक्ती झाली. 1995 मध्ये त्या अँटर्नी जनरलपदी नियुक्त झाल्या. 1995 मध्येच त्यांची सर्वात प्रथम लोकसभेवर निवड झाली. तेव्हापासून त्या सिपारिया मतदारसंघातून सतत निवडून येत आहेत. त्यांचा युनायटेड नॅशनल कॉँग्रेस पक्ष 2000 मध्ये सत्तेत आला आणि सर्वात प्रथम कमला प्रसाद यांची शिक्षण मंत्री म्हणून नियुक्ती झाली. त्यांच्या सरकारचा पराभव झाल्यानंतर त्यांनी 2006 मध्ये विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर पुढच्या चार वर्षातच त्यांची युनायटेड नॅशनल कॉँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. 2010 मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांचा पक्ष पुन्हा सत्तेवर आला आणि कमला प्रसाद या देशाच्या पहिल्या पंतप्रधान झाल्या. त्या पंतप्रधान झाल्यावर त्रिनिदाद मध्ये भरलेल्या कॉमनवेल्थ देशाच्या परिषदेचे त्यांनी उत्तम नेतृत्व केले. तेथे त्यांच्या नेतृत्वाची जगाला पहिल्यांदा ओळख झाली. अलीकडेच जयपूर येथे पार पडलेल्या प्रवासी भारत परिषदेत त्यांची प्रमुख पाहुणे म्हणून असलेली उपस्थिती लक्षणीय होती. 
prasadkerkar73@gmail.com 

0 Response to "भारतीय वंशाच्या त्रिनिदाद व टोबॅगोच्या पंतप्रधान"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel