-->
देशातले तालीबानी

देशातले तालीबानी

रविवार दि. 11 मार्च 2018 च्या अंकासाठी चिंतन- 
------------------------------------------------
देशातले तालीबानी
-----------------------------------
एन्ट्रो- आज ज्यांनी लेनिनचा पुतळा तोडला त्यांनीच महात्मा गांधींना गोळ्या घातल्या होत्या आणि आज गांधींचे नाव घेतल्यशिवाय त्यांचे पान हलत नाही. लेनिनचा पुतळा पाडला ते एका अर्थाने खूप बरे झाले, कारण लोकांना लेनिन आता पुस्तकांत वाचावा लागेल. आणि पुस्तकातला लेनिन हा पुतळ्यातल्या लेनिनपेक्षा जास्त प्रेरणादायी आणि विचार करायला भाग पाडणारा आहे. आता लेनिनच नाही तर गांधी, भगतसिंग, आंबेडकर, नेहरू, शिवाजी, पटेल या सगळ्यांचे पुतळे पाडायला सुरुवात करा... शिवाजी महाराजांचे पुतळे उभारून जितके शिवाजी महाराज लोकांना कळले नाहीत तितके पानसरेंच्या, मा.म.देशमुखांच्या पुस्तकांनी लोकांना कळले आहेत. अरबी समुद्रातल्या शिवाजींच्या होऊ घातलेल्या पुतळ्यापेक्षा संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघाच्या लोकांनी पुस्तकांतून लिहिलेला शिवाजी जास्त परिणामकारक आहे. गांधींच्या पुतळ्यांपेक्षा लगे रहो मुन्नाभाई मध्ये गांधीगिरी करून गेलेला गांधी जास्त लोकांपर्यंत सहजपणे पोचला आणि एका रात्रीत गांधींना परत लोकांच्यामध्ये स्थापन करून गेला. त्यामुळे ज्यांना पुतळे पाडायचे आहेत त्यांनी जरुर पाडावे, त्यातून विचार संपणार नाही...
--------------------------------------------- 
त्रिपुरातील माकपच्या नेतृत्वाखालील सरकारचा पराभव झाल्यावर तेथे माकपची कार्यालये व कार्यकर्त्यांच्या घरावर हल्ले करीत कॉम्रेड लेनिन यांचा पुतलाही उखडून टाकण्यात आला, ही घटना देशातील लोकशाही रचनेला धोकादायक ठरणारी आहे. सोव्हिएत युनियनचे क्रांतीकारक नेते व मार्क्सच्या तत्वज्ञानावर आधारीत जगातील पहिली कामगारवर्गाची सत्ता स्थापन करणारे कॉ. लेनिन हे कोण होते? त्यांचे तत्वज्ञान काय होते? त्यांचे भारताविषयी काय मत होते? त्यांची जागतिक राजकारणात कोणती महत्वाची भूमिका होती? याची कोणतीही माहिती नसणार्‍यांनी त्यांचा पुतळा पाडावा हे एक तालीबानीच कृत्य म्हणावे लागेल. अफगाणिस्तानातील बुध्दाचे ऐतिहासिक पुतळे अशाच प्रकारे तालिबान्यांनी पाडले होते, त्याची यावेळी आठवण आल्याशिवाय राहात नाही. कोणत्याही विचारांचा मुकाबला हा विचारानेच केला पाहिजे, त्यासाठी जर शस्त्र ताब्यात घेतले तर विचारांचा पराभव होत नाही, हे आजवर आपल्या देशातील उजव्या शक्तींना काही सांगून समजत नाही. त्रिपुरातील डाव्या विचारांच्या माकपच्या सरकारचा पराभव हा लोकशाही मार्गाने झालेला आहे, हा पराभव त्यांनी स्वीकारलेला असताना भाजपाच्या कार्यकर्त्यांनी लेनिनचा पुतळा उखडून टाकण्यची वृत्ती ही झुंडगिरीच म्हटली पाहिजे. आता लेनिनचे पुतळे हे जगात त्यांच्या विचारांच्या सरकारचा पराभव झाल्यावर उखडून टाकले गेले,असा एक युक्तीवाद भाजपाकडून मांडला जातो. परंतु एक लक्षात ठेवले पाहिजे की, ज्या देशात हे पाडले गेले तेथे आज जी नवीन सरकार सत्तेवर आली त्यातून जनतेचे भले झालेले नाही. उलट तेते अस्थिरताच माजली आहे. त्यामुळे लेनिनचे पुतळे उखडून टाकून जनतेचे प्रश्‍न सुटलेले नाहीत. लेनिन हे जगातील एका त्यावेळच्या महासत्तेचे नेते होते, त्यांनी केलेल्या क्रांतीमुळे जगातील भांडवलशाहीला देखील अनेक बाबतीत मुरड घालावी लागली, पिळलेल्या जनतेचे ते नेते होते, त्यांनी केलेली क्रांती ही तब्बल 70 वर्षे टिकली ही त्यांची जमेची बाजू आहे. ज्यावेळी लेनिनच्या नेतृत्वाखाली रशियात क्रांती झाली त्यावेळी लोकमान्य टिळकांनी केसरीत अग्रलेख लिहून तिचे स्वागत केले होते. आपले क्रांतीकारी स्वातंत्र्यसेनानी भगतसिंग यांनी फसावर लटकले जात असताना शेवटच्या तासात लेनिनचेच पुस्तक वाचत होते, याची माहिती हा पुतळा पाडणार्‍यांना नाही. त्यांच्या डोक्यात केवळ कम्युनिस्ट विरोध आहे व तो विरोध देखील काही भंपक कल्पनातून निर्माण झालेला आहे. आज डाव्यांचा पराभव झाला, म्हणून ते सत्तेत यापढे कधीच येणार नाही, हे म्हणणे लोकशाहीला आव्हान देण्यासारखे आहे. सध्या देशात सर्वाधिक राज्यात भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे, त्यांना देखील दर पाच वर्षांनी जनतेला सामोरे जायचे आहे व दरवेळी जनता त्यांच्या मागे राहिलच असे सांगता येत नाही. आता आपल्याकडे सत्तांतर झाल्यावर ज्या विचारांचे सरकार येते त्यांच्या विरोधी मत असणार्‍यां नेत्यांचे पुतळे पाडले जाणार हे आता आपण गृहीतच धरावयाचे काय? ज्या लेनिन यांनी क्रांती करुन रशिया घडविला त्या देशाने आपल्याला अनेक संदर्भात स्वातंत्र्यानंतर मोलाची मदत केली आहे. लेनिन जरी आपल्या स्वातंत्र्याच्या काळात जिवंत नसले तरी त्यांनी स्थापन केलेल्या रशियाने आपल्याला जी मदत केली आहे, ती आपण एका रात्रीत विसरायची का, हा प्रश्‍न आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर आपल्याकडे मुबलक संसाधने नव्हती, शिक्षण नव्हते, त्यावेळी आपल्याला उद्योग उभारणीसाठी मुख्यतः संरक्षण, अणुविज्ञान, आणि अवकाश संशोधन यामध्ये लेनिनच्या रशियाने मदत दिली. इतकेच नाही तर तंत्रज्ञान देखील दिले. उद्योग उभारणीसाठी आपल्याला कमी किंमतीमधील कर्जे रशियाने उपलब्ध करून दिली जी आपण नंतर रुपयामध्ये फेडली. शेतीसाठी खते, अणुभट्ट्या निर्मितीसाठी रशियाने आपल्याला महत्वपूर्ण मदत दिली. रशियाने भारतीय हवाई सेनेला मिग, सुखोई ही विमाने दिली तसेच ब्राह्मोस क्षेपणास्त्र निर्मितीमध्ये मदत दिली. भारतीय सैन्याला आजपर्यंत अनेकदा उत्तम, विश्‍वासू आणि परवडणारे संरक्षण क्षेत्रातील उत्पादने ही रशियानेच पुरविली आहेत. भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट लेनिनच्या रशियाने त्यांच्याच देशातून, त्यांच्याच रॉकेट लाँचरने पाठवला, भारताचा पहिला अंतराळवीर राकेश शर्मा सोयुझ 11 हा रशियाच्या यानातूूनच अवकाशात गेला होता. आज ज्यांनी लेनिनचा पुतळा तोडला त्यांनीच महात्मा गांधींना गोळ्या घातल्या होत्या आणि आज गांधींचे नाव घेतल्यशिवाय त्यांचे पान हलत नाही. लेनिनचा पुतळा पाडला ते एका अर्थाने खूप बरे झाले, कारण लोकांना लेनिन आता पुस्तकांत वाचावा लागेल. आणि पुस्तकातला लेनिन हा पुतळ्यातल्या लेनिनपेक्षा जास्त प्रेरणादायी आणि विचार करायला भाग पाडणारा आहे. आता लेनिनच नाही तर गांधी, भगतसिंग, आंबेडकर, नेहरू, शिवाजी, पटेल या सगळ्यांचे पुतळे पाडायला सुरुवात करा. शिवाजी महाराजांचे पुतळे उभारून जितके शिवाजी महाराज लोकांना कळले नाहीत तितके पानसरेंच्या, मा.म.देशमुखांच्या पुस्तकांनी लोकांना कळले आहेत. गोब्राम्हणप्रतिपालक शिवाजी फक्त पुस्तकांमुळे कुळवाडीभूषण झाले अवघ्या 20-30 वर्षात. अरबी समुद्रातल्या शिवाजींच्या होऊ घातलेल्या पुतळ्यापेक्षा संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघाच्या लोकांनी पुस्तकांतून लिहिलेला शिवाजी जास्त परिणामकारक आहे. गांधींच्या पुतळ्यांपेक्षा लगे रहो मुन्नाभाई मध्ये गांधीगिरी करून गेलेला गांधी जास्त लोकांपर्यंत सहजपणे पोचला आणि एका रात्रीत गांधींना परत लोकांच्यामध्ये स्थापन करून गेला. त्यामुळे ज्यांना पुतळे पाडायचे आहेत त्यांनी जरुर पाडावे, त्यातून विचार संपणार नाही.
त्यामुळे आता पुतळे पाडूया व लढा आता पुस्तकांनी लढू या.
----------------------------------------------------------

0 Response to "देशातले तालीबानी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel