-->
चार वर्षात न्याय नाही

चार वर्षात न्याय नाही

संपादकीय पान सोमवार दि. 19 डिसेंबर 2016 च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
चार वर्षात न्याय नाही
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत मानवतेला काळीमा फासणारी घटना निर्भया बलात्कार प्रकरणाला आता चार वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र अद्यापही निर्भयाचे आई-वडिल न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. चार वर्षांपूर्वी दिल्लीत 23 वर्षांच्या या तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. या घटनेमुळे दिल्लीसह संपूर्ण देश हादरला होता. या घटनेनंतर दिल्लीमध्ये आंदोलने आणि निदर्शनेदेखील झाली होती. मात्र अद्याप निर्भया आणि तिच्या आई वडिलांना न्याय मिळालेला नाही, हे दुदैवी म्हटले पाहिजे. यावरुन आपली न्यायव्यवस्था किती सुस्त आहे याचीही कल्पना येते. चार वर्षांपूर्वी 16 डिसेंबरला रात्री एका चालत्या बसमध्ये सहा जणांनी 23 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. या तरुणीला प्रसारमाध्यमांनी निर्भया हे नाव दिले होते. दिल्लीत चार वर्षांपूर्वी रात्री धावत्या बसमध्ये एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. यानंतर बलात्कार करणार्‍या सहा तरुणांनी पीडित तरुणीला तिच्या मित्रासोबत चालत्या बसमधून फेकून दिले होते. यानंतर पीडित तरुणीला उपचारासाठी सिंगापूरच्या रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना निर्भयाचा 29 डिसेंबरला मृत्यू झाला. निर्भया बलात्कार प्रकरणात मुकेश, पवन, अक्षय आणि विजय यांना दोषी ठरवण्यात आले आहे. या चारही जणांना दंडाधिकारी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. दंडाधिकारी न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा दिल्ली उच्च न्यायालयाने 2013 मध्ये कायम ठेवली. यानंतर या प्रकरणातील आरोपींकडून सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली. या प्रकरणातील मुख्य आरोपी राम सिंह मार्च 2013 मध्ये तिहार कारागृहात मृतावस्थेत सापडला. या प्रकरणातील एक आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला तीन वर्षांसाठी बालसुधारगृहात ठेवण्यात आले. या अल्पवयीन आरोपीची गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सुटका करण्यात आली. निर्भया प्रकरणाला चार वर्ष पूर्ण होऊनही दिल्लीतील स्थिती फारशी सुधारली नसल्याबद्दल निर्भयाच्या आईने नाराजी व्यक्त केली. चार वर्षापूर्वी जे घडले, ते आजही घडते आहे. लोकांना कायद्याचा कोणताही धाक नाही, अशी प्रतिक्रिया निर्भयाच्या आईने दिली आहे. दिल्लीत गेल्या बुधवारी रात्री एका 20 वर्षीय तरुणीवर टॅक्सी चालकाने बलात्कार केला. मोती बाग परिसरात ही घटना घडली. या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर निर्भयाच्या आईने दिल्लीतील परिस्थितीत कोणताच बदल न झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे. दिल्ली असो किंवा देशातील कोणत्याही भागात आज एकटी रात्रीच्या वेळी जाणारी स्त्री सुरक्षीत राहिलेली नाही. दिल्लीसह उत्तर भारतात याबाबत स्थीती वाईटच आहे. मुंबईसारख्या महानगरात मात्र आजही स्त्रीया मध्यरात्रीही एकट्या जाऊ शकतात, मुंबई तेवढी सुरक्षित आहे. काही अपवादात्मक घटना येथे घडतात. परंतु दिल्लीसारख्या राजधानीच्या शहरात मात्र महिला सुरक्षित नाहीतच. दिल्लीतील ही बलात्कराची घटना घडली त्यावेळी केंद्रात व दिल्लीत कॉग्रेसची सत्ता होती. कॉग्रेस विरोधी राजकारण तापत होते. नुकतेच समाजसेवक अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचार, लोकपाल विधेयक यावरुन संपूर्ण देश हलवून सोडला होता. त्यामुळे कॉग्रेसविरोधी लाट अदिकच तीव्र झाली होती. दिल्लीत अरविंद केजरीवाल नावाचा भ्रष्टाचार विरोधी लढा देणार्‍या नेत्याचा उदय झाला होता. अण्णांच्या या आंदोलनाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपली सर्व रसद पुरविली होती. त्यामुळे अण्णा आपले आंदोलन कितीही बिगर राजकीय म्हणत असले तरीही त्याला राजकीय स्वरुप प्राप्त झाले होतेच. केंद्रातले कॉग्रेसचे सरकार त्यामुळे पूर्णपणे हादरले होते. अरविंद केजरिवाल यांच्या डोळ्यासमोर दिल्लीतल्या निवडणुका होत्या. त्यांच्या त्यावेळच्या सोबती किरण बेदी यांनाही या आंदोलनामुळे जणू काही क्रांतीच झाली असे वाटू लागले होते. या सर्व पार्श्‍वभूमीवर दिल्लीतला बलात्कार झाला होता. अर्थात अशा प्रकारच्या किंवा याहूनही निर्दयी घटना दिल्लीत यापूर्वी झाल्या होत्या मात्र त्याला कधीच एवढी प्रसिध्दी मिळाली नव्हती. मात्र राजधानीतील तप्त राजकीय घटना, अण्णांनी घुसळून काढलेला देश, कॉग्रेसवर झालेले भ्रष्टाचाराचे जबरदस्त आरोप, अरविंद केजरीवाल व किरण बेदी यांच्या जागृत झालेल्या राजकीय महत्वाकांक्षा या घटना ताज्या असतानाच हा बलात्कार झाल्याने कॉग्रेसच्या राज्यात महिलाही सुरक्षित नाहीत, बधा राजधानी दिल्लीतील कायदा व सुरक्षा व्यवस्थाच अस्तित्वात नाही असे आरोप करीत हे बलात्काराचे प्रकरण गाजत गेले. ही झालेली घटना दुदैवी, निषेधार्थ तर होतीच परंतु आपल्या समाजव्यवस्थेला काळीमा लावणारी होती, हे कदापी विसरता येणार नाही. परंतु आज चार वर्षानंतर काय स्थिती आहे? अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांच्याच एकेकाळच्या आंदोलनातील सहकारी किरण बेदी या पॉडेचेरीच्या उपराज्यपालपदी विराजमान झाल्या आहेत. अण्णांचे आंदोलन संपले आहे. लोकपाल विधेयक व त्यासंबंधीचा होणारा कायदा याचे काय झाले याविषयी अण्णाही बोलत नाहीत व कोणताच राजकीय पक्ष भाष्य करीत नाही. भाजपा केंद्रात सत्तेवर आला आहे. कॉग्रेस पक्ष केंद्रात व विविध राज्यात सत्तेवरुन खाली खेचला गेला. दीडशे वर्षाच्या या जुन्या पक्षाचे भवितव्य सध्या तरी अधांतरी आहे. दिल्लीतील जे बलात्कार प्रकरण गाजले त्यातील आरोपींना फाशीची शिक्षा जाहीर झाली मात्र त्याची अंमलबजावणी झाली. त्यातील बाल गुन्हेगार वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्याने सुटले आहेत. निर्भया या नावाने सरकारने बलात्कार पिडीत महिलांसाठी निधी स्थापन केला त्यातील निधी वापरला गेलेला नाही. त्याहून सर्वात महत्वाचे म्हणजे दिल्लीत बलात्काराची प्रकरणे काही थांबलेली नाहीत. मग केजरीवाल व भाजपा आता गप्प का? या प्रश्‍नांची उत्तरे गेल्या चार वषार्र्त काही सुटलेली नाहीत.
----------------------------------------------------------------------

0 Response to "चार वर्षात न्याय नाही"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel