-->
घातक शीतपेये

घातक शीतपेये

संपादकीय पान सोमवार दि. ०२ मे २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
घातक शीतपेये
आपल्याकडे शीतपेय पिण्याकडे अनेकांचा वाढता कल आहे. प्रामुख्याने सध्याच्या उकाड्यात शीतपेय पिऊन अंगाची होणारी लाही-लाही थांबविण्याचा आपण प्रयत्न करीत असतो. परंतु ही शीतपेय फार धोकादायक असतात. यासंबंधीचा एक अहवाल नुकताच सेंटर फॉर सायन्स इन दी पब्लिक इंटरेस्ट (सीएसपीआय) या केंद्राने प्रसिद्ध केला असून तो धक्कादायक आहे. कृत्रिम शीतपेयांमध्ये फॉस्फरिक ऍसिड, कॅफीन, घातक कृत्रिम रंग, कार्बन डायऑक्साईड, ऍल्युमिनियम आदींचा वापर प्रामुख्याने केलेला असतो. फॉस्फरिक ऍसिडमुळे शरीरातील पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम यांचे प्रमाण बिघडते. हाडातील कॅल्शियम रक्तात येऊन बाहेर जात असल्याने आर्थरायटिस, मूतखडा, रक्तवाहिन्या कठीण होणे आदी विकार जडण्याची शक्यता तज्ज्ञांनी वारंवार व्यक्त केली आहे. याचबरोबर दात, मणके, कमरेची हाडे ठिसूळ होणे हे दुष्परिणाम तर होतात. जर सातत्याने शीतपेयाचे सेवन केले तर त्यात असलेल्या साखरेच्या अतिप्रमाणामुळे मधुमेहासारखा गंभीर आजार जडू शकतो. एवढेच नव्हे तर शीतपेय माणसाच्या यकृताला आणि मूत्रपिंडाला हानी पोहोचविते आणि कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराला आमंत्रण देते. आपल्या देशात हे वास्तव अनेकदा विविध संस्थांनी उघड केलेले आहे, परंतु आपण शीतपेयांच्या जाहीरातींना एवढे बळी पडतो की, आपण त्याचे दुष्परिणाम विसरुन जातो व जाहीरांतींमध्ये दाखविल्यासारखी घटाघटा शीतपेये पितो.  कोकाकोला आणि पेप्सीसारख्या शीतपेयांच्या उत्पादन करणार्‍या बहुराष्ट्रीय कंपन्या मध्यमवर्गीय आणि कमी उत्पन्न असलेल्या विकसनशील देशांमध्ये प्रचंड गुंतवणूक करीत आहोत. कारण या देशांतील अफाट लोकसंख्येमुळे प्रचंड बाजारपेठ आहे आणि शीतपेयांच्या दुष्परिणामांची गंभीरताही लोकांकडून दुर्लक्षित केली जाते. याचा फायदा उत्पादक उठवित आहेत. आपल्या देशात मधुमेहाचे प्रमाण गेल्या काही वर्षात झपाट्याने वाढले आहे. येत्या दशकात कदाचित जगात आपल्या देशात मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण असतील. मधुमेहाप्रमाणे स्थूलत्व, ह्दयरोग हे रोग देखील आपल्याकडे बदलत्या जीवनशौलीमुळे वाढत चालले आहेत. शीतपेय या रोगांसाठी कारमीभूत ठरीत आहे. भारतातील शीतपेयांची बाजारपेठ १० अब्ज डॉलर्स आहे. ती प्रतिवर्षी सहा ते सात टक्यांनी वाढते आहे. सर्वात वाईट बाब म्हणजे या शीतपेयाच्या कंपन्या लहान मुलांना टार्गेट करुन जाहीराती तयार करतात. यामुळे ही शीतपेये पिण्यासाठी मुले आपल्या पालकांकडे हट्ट करतात आणि हा हट्ट मोडणे पालकांना कठीण जाते. अशा वेळी आपण मुलांचा हट्ट पुरवित असताना त्यांच्या प्रकृतीवर हल्ला करीत असतो याचे भान कुणाला राहात नाही. मात्र आता यासंबंधी जनजागृती होण्याची आवश्यकता आहे.
--------------------------------------------------

Related Posts

0 Response to "घातक शीतपेये"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel