-->
विदर्भाचे गालबोट

विदर्भाचे गालबोट

संपादकीय पान मंगळवार दि. ०३ मे २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
विदर्भाचे गालबोट 
महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनाचा जल्लोश सर्वत्र होत असताना संयुक्त माहाराष्ट्राच्या स्थापनेसाठी आपल्या जीवाची आहुती देणार्‍या १०५ हुतात्मांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या स्मारकावर साधी रोषणाई केली नसल्याने सर्वत्र संताप व्यक्त होणे स्वाभाविक होते. यावर प्रतिक्रिया देताना या नालायक भाजपावाल्यांपेक्षा कॉँग्रेसवाले परवडे अशा परखड शब्दात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली. राज ठाकरे यांची ही प्रतिक्रिया अतिशय बोलकी आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी आपण हुतात्मा दिनी २१ नोव्हेंबर रोजी हुतात्मा स्मारकाला रोषणाई करतो असे म्हटले आहे. मात्र १ मे रोजी अशी सजावट का केली जात नाही? हा प्रश्‍न देखील आहेच. एकीकडे हुतात्मा स्मारकाविषयी वाद रंगला असताना दुसरीकडे विदर्भात स्वतंत्र विदर्भाचा नारा श्रीहरी अणे यांच्या मार्फत देण्यात आला. खरे तर या समारंभासाठी जेमतेम ५० डोकी होती. त्यावरुन स्वतंत्र विदर्भाच्या मागणीस किती लोकांचा पाठिंबा आहे, हे स्पष्टच दिसते. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला भाजपा छुपा व राष्ट्रीय स्वंयंसेवक संघाचा उघडच पाठिंबा आहे. यामुळेच सध्या अणे आणि कंपनीला जोर चढला आहे. संघाच्या धोरणानुसार त्यांना महाराष्ट्राचे चार तुकडे करावयाचे आहेत. परंतु सध्या त्यांच्या अजेंडावर विदर्भ आहे. स्वतंत्र विदर्भाचे राज्य करण्यामागे एक सतत घोष केला जातो तो म्हणजे, विदर्भावर अन्याय झाला, अनुशेष भरुन काढला गेला नाही. खरे तर विदर्भवाद्यांची ही टीका म्हणजे मगरीचे अश्र्रु आहेत. कारण विदर्भाला प्रदीर्घ काळ मुख्यमंत्रीपद मिळाले आहे. मग असे असतानाही विदर्भाला अनुशेष का भरुन काढला आला नाही? हीच स्थिती मराठवाड्याचीही आहे. कारण मराठवाड्यालाही प्रदीर्घ काळ मुख्यमंत्रीपद लाभले आहे. विलासराव देशमुख तर तीन वेळा मुख्यमंत्री होते. अशा वेळी अनुशेष जर या दोन विभागांचा राहीला असेलच तर तो दोष येथील नेत्यांचाच आहे. समजा विदर्भ स्वतंत्र झाला तरी त्याच्याकडे कोळसा, वीज व सध्या असलेले काही उद्योग या व्यतिरिक्त उत्पन्नाचे साधन आहे कुठे? त्यामुळे विदर्भ वेगळा झाला तर तेथील प्रश्‍न चुटकीसराशी संपतील असे नाही. आज झारखंड, उत्तराखंड या भाजपाच्या मागच्या सत्ता कालावधीत स्थापन झालेल्या राज्याने अशी कुठे मोठी नेत्रदीपक प्रगती केली आहे.? राज्य छोटे असेल तर उलट राजकीय अस्थैर्य जास्त असते व राजकीय स्थैर्य जर नसले तर त्या राज्याची प्रगती होऊच शकत नाही. गोवा हे छोटे राज्य आहे परंतु तेथे उत्पन्नाचे चांगले साधन पर्यटनाच्या माध्यमातून असल्यामुळे या राज्याचा निभाव लागला आहे. त्यामुळे स्वतंत्र विदर्भ असो किंवा मराठवाडा यांचे राज्य झाल्यास तेथील जनतेचे प्रश्‍न सुटणार नाहीत तर अधिकच गंभीर होणार आहेत. याची या नेत्यांना कल्पना नाही असे म्हणता येणार नाही. परंतु सध्या केवळ संघाचा अजेंडा पूर्ण करण्याचे काम देशात चालू आहे. त्यामुळे श्रीहरी अणे यांना सध्या वेगळ्या विदर्भाचे बळ आले आहे. म्हणऊनच राज्याच्या स्थापनेच्या दिवशी विदर्भाचे फुटीरतेचे गालबोट लागले.

Related Posts

0 Response to "विदर्भाचे गालबोट "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel