-->
ढासळती पाण्याची पातळी

ढासळती पाण्याची पातळी

संपादकीय पान मंगळवार दि. १९ एप्रिल २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
ढासळती पाण्याची पातळी
आपल्याला कोकणात राहाणार्‍यांना दुष्काळाचे गांभीर्य अजून समजलेले नाही. परंतु सध्या पाण्यासाठी दाही दिशा वणवण करावी लागणार्‍या मराठवाडा व विदर्भातील लोकांना आज पाण्याची महती समजली आहे. आपल्याकडेही कोकणात अजून तरी दुष्काळाचा नामोनिशाणा नसला तरी आपण आजचे पाणी आज जपून वापरले नाही तर इथेही मराठवाड्यासारखी स्थिती यायला वेळ लागणार नाही. कारण आजपासून दहा वर्षापूर्वी लातूर शहरात पाण्याची सुबत्ता होती. मात्र पाण्याचा अवास्तव उपसा केल्याने लातूर शहराला आज बाहेरुन पाणी रेल्वेने आणण्याची पाळी आली आहे. नुकतीच लातूरला पाच लाख लिटर्स पाणी घेऊन रेल्वेची पोहोचली. परंतु असे किती काळ चालणार, हा सवाल आहे. संपूर्ण मराठवाडा व विदर्भात अशा प्रकारे पाणी फार काळ पोहोचविले जाऊ शकत नाही. अशा प्रकारे पाणी पोहोचविण्यावरही मर्यादा आहेत. त्याचबरोबर नद्यांचे प्रवाह बदलण्याचे ठरविले तरीही ते फार मोठे खर्चीक काम आहे. त्याचबरोबर त्याला होणारा राजकीय विरोध वेगळाच. आपल्या देशात जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी १८ टक्के लोकसंख्या आहे. मात्र जगाच्या पाण्याच्या साठ्यापैकी केवळ ४ टक्केच पाण्याचा साठा आज आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यावरुन आपण पाणी किती जपून वापरले पाहिजे त्याचा अंदाज येतो. आपल्याकडे प्रति माणशी पाण्याची उपलब्धता १९४७ साली ६,०४२ क्युबिक मीटर्स होती. २००१ साली ती उपलब्धता १,८१६ क्युबिक मीटर्सवर खाली आली व २०११ साली ही उपलब्धता १,५४५ क्युबिक मीटर्सवर घसरली. याच गतीने ही उपलब्धता घसरत गेल्यास पाण्याची उपलब्धता १,३४० क्युबिक मीटर्सपर्यंत खाली घसरण्याचा धोका होता. लातूरची पाण्याची पातळी आता एवढी घसरली आहे की, राजस्थान, दिल्ली, पंजाब, हरयाणा या राज्यातील पातळीवर आली आहे. या राज्यांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी जमीनीतील उपसा केला जातो. या व अनेक भागात सध्या जमीनीत असलेल्या पाण्याच्या उपलब्धतेपेक्षा जास्त उपसा करण्याचा प्रयत्न केला जातो. मराठवाडा, विदर्भ व सध्या लातूरची स्थिती ही याचमुळे उद्दभवली आहे. दिल्ली शहराला प्रामुख्याने पाण्याचा पुरवठा हा हरयाणातून होतो. अलिकडच्या जाट आंदोलनात पाण्याचे पाईप तोडल्यामुळे दिल्लीवरही पाणीबाणी आली होती. उत्तरेतील अनेक राज्यात कृषी क्षेत्रासाठी पाण्याचा अवास्तव उपसा करण्यात आला. खरे तर गरजेपेक्षा जास्त पाणी वापरणे हा सामाजिक गुन्हाच आहे. परंतु आपल्याकडे पाण्याचे दुभिक्ष होईपर्यत कोणालाच पाण्याचे महत्व समजले नाही. महाराष्ट्रातील सध्याच्या दुष्काळातून जर कोणी धडा घेतला नाही तर देशातील स्थिती धोकादायक होऊ शकते, ही माहिती केंद्रीय जल मंत्रालयाने आपल्या ताज्या अहवालात दिली आहे. सध्या मराठवाडा व विदर्भातील समाजमन पूर्णपणे ढवळून निघाले आहे. शिर्डीचे साईबाबा हे राज्यातील जनतेचे लाडके दैवत. दरवर्षी शिर्डीला पायी मजल दल मजल करीत दीडशे पालख्या रामनवमीला येतात. परंतु यंदा केवळ शंभरच पालख्या आल्या. अर्थातच पालख्यांची ही संख्या दुष्काळामुळे कमी झाली आहे. लोकांची श्रध्दा कमी झालेली नाही तर अगतीकतेमुळे पालख्या आयोजित करता आलेल्या नाहीत, हे वास्तव आहे. दुष्काळाच्या निर्मुलनासाठी सरकारसह प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे.

0 Response to "ढासळती पाण्याची पातळी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel