-->
परिवर्तनाची गुढी

परिवर्तनाची गुढी

संपादकीय पान सोमवार दि. ११ एप्रिल २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
परिवर्तनाची गुढी
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शनिशिगमापूरच्या देवस्थानने महिलांना चौथर्‍यावर जाऊन पुजा करण्यास परवानगी दिल्याने गेल्या ४०० वर्षाची प्रथा अखेर मोडीत निघाली आहे. महिलांना प्रवेश द्यावा लागू नये म्हणून पुरुषांनाही शनी चौथर्‍यावर जाण्यासाठी लागू केलेली बंदी झुगारून कावडधारी भाविकांनी शनिशिंगणापुरात शनीला जलाभिषेक केला. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार लिंगभेद टाळण्यासाठी महिलांना चौथर्‍यावर प्रवेश देण्याचा निर्णय विश्वस्तांना घ्यावा लागला. राज्यभर आंब्याचे तोरण बांधून आणि मांगल्याची गुढी उभारून पाडव्याचा सण हर्षोल्हासात साजरा केला जात असतानाच शुक्रवारी शनैश्वर देवस्थानच्या वतीने विश्वस्त रागिणी लांडे यांनी महिलांना चौथरा प्रवेशाचा मार्ग खुला केल्याची खुशखबर देऊन पाडव्याचा आनंद द्विगुणित केला आहे. दरवर्षी गुढीपाडव्याला प्रवरा संगम येथून कावडीने आणलेल्या गोदावरी आणि मुळा नदीच्या पाण्याने शनिशिळेला जलाभिषेक करण्याची जुनी परंपरा आहे. मात्र महिला प्रवेशबंदीविरुद्धच्या आंदोलनाने जोर धरल्यानंतर विश्वस्तांनी पुरुषांनाही प्रवेशबंदी केली होती. स्थानिक परंपरा आणि श्रद्धेचा भाग असल्याचे सांगत कावडधार्‍यांनी बंदी झुगारून शनिशिळेचा जलाभिषेक केला त्यानंतर शनिचौथरा महिलांनाही खुला केल्याची घोषणा करण्यात आली. गेल्या वर्षी एका महिला भक्ताने महिलांच्या प्रवेशबंदीची दशकांपासून चालत आलेली परंपरा मोडीत काढत शनिचौथर्‍यावर तेल वाहिले आणि शनिचौथर्‍यावर महिला प्रवेशबंदीविरूद्धच्या आंदोलनाने जोर धरला होता. गेल्या चार महिन्यांपासून हा वाद धुमसत होता. त्यातच जेथे पुरुषांना परवानगी तेथे महिलांनाही प्रवेश दिलाच पाहिजे. मंदिरात प्रवेश हा महिलांचा मूलभूत हक्क असून त्याचे रक्षण करणे ही राज्य सरकारचे मुख्य कर्तव्य आहे, असेही मुंबई उच्च न्यायालयाने १ एप्रिल रोजी दिलेल्या निर्देशांत म्हटले होते. पुजारी वगळता एकही माणूस शनिचौथर्‍यावर चढला तर उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे महिलांनाही चौथर्‍यावर प्रवेश द्यावाच लागेल, असा इशारा आंदोलकांनी दिला होता. सरकारकडून आलेला दबाव, त्याला कावडवाल्यांनी जबरदस्तीने चौथर्‍यावर जाऊन जलाभिषेक करून दिलेली साथ यामुळे शनिचौथर्‍यावर महिलांना दर्शनासाठी जाऊ देण्याचा निर्णय देवस्थानच्या विश्वस्तांनी जाहीर केला. हा निर्णय जाहीर होताच हजारो महिला चौथर्‍यावर गेल्या व त्यांनी दर्शन घेतले. देवस्थानवर ज्यांच्या गटाचे वर्चस्व आहे, ते ज्येष्ठ नेते व माजी खासदार यशवंतराव गडाखही महिलांना चौथर्‍यावर दर्शनासाठी परवानगी देण्याच्या बाजूचे होते. देवस्थानच्या विश्वस्तांनी बैठक घेऊन महिलांना चौथर्‍यावर परवानगी देण्याचा निर्णय जाहीर केला. विशेष म्हणजे, पोलिसांनीच चौथर्‍यावर जाणार्‍या महिलांना संरक्षण दिले व त्यांचा मार्ग मोकळा करून दिला. देवस्थानने घेतलेला हा निर्णय म्हणजे समानतेच्या बाजूने पडलेले एक महत्वाचे पाऊल आहे. यासाठी बरीच चर्चा झाली, संपूर्ण राज्यात वैचारिक घुसळण झाली, मात्र याला वेगवेगळ्या भाषेत विरोध करणार्‍यांचा पराभव झाला व या पुरोगामी महाराष्ट्रात एक महत्वाचे पाऊल पडले.

0 Response to "परिवर्तनाची गुढी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel