-->
पुन्हा आय.पी.एल.चा धुराळा

पुन्हा आय.पी.एल.चा धुराळा

संपादकीय पान सोमवार दि. ११ एप्रिल २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
पुन्हा आय.पी.एल.चा धुराळा
आय.पी.एल. च्या नवव्या वर्षातील पहिला हंगाम आता सुरु झाला आहे. यंदा दुष्काळाची छाया असल्याने महाराष्ट्राबाहेर बहुतांशी सामने भरविण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आयसीसी टी-२० वर्ल्डकपच्या धुमाळीनंतर आयपीएलद्वारे टी-२० सामन्यांचा तडका पुन्हा एकदा क्रिकेटचाहत्यांना अनुभवायला मिळणार आहे. आयपीएलचे हे नववे वर्ष. आठ वर्षात एकूण १३ संघ खेळले. मैदानावरील कामगिरीचा विचार करता चेन्नई सुपर किंग्ज, कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्सने प्रत्येकी दोनदा जेतेपद पटकावले आहे. डेक्कन चार्जर्स आणि राजस्थान रॉयल्सला प्रत्येकी एकदा आयपीएलची ट्रॉफी जिंकता आलेली आहे. आठ हंगामात एकूण १३ संघ खेळले. म्हणजेच आठ संघांना अद्याप जेतेपदाचा आनंद अनुभवता आलेला नाही. नवव्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघाची   अनुपस्थिती सर्वाना जाणवेल. त्यामुळे आठ वर्षे एकत्र खेळलेले धोनी, रैना, अश्विन आणि जडेजा आता वेगळे झालेत. धोनी आणि अश्विन पुणेकर झाले आहेत. आयपीएलमध्ये आजवर कुठल्याही संघाला विक्रमी तीनदा ट्रॉफी जिंकता आलेली नाही. चेन्नई आणि राजस्थान संघ बंदीमुळे यंदा सहभागी झालेले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीत रोहित शर्माच्या मुंबई आणि गौतम गंभीरच्या कोलकात्याला तिसर्‍यांदा आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरण्याची संधी आहे. कितीही वाद झाले आणि अडचणी आल्या तरी बीसीसीआय आयपीएलच्या रूपाने आपला स्वार्थ साधून घेणार आहे. त्यामुळे पुढील दोन महिने चाहते पुन्हा एकदा टी-२० क्रिकेटमध्ये न्हाऊन निघालेले पाहायला मिळतील. येत्या काही दिवसांत या सामन्यांमुळे किक्रेटमय व त्याचबरोबर मनोरंजनाचे वातावरण असेल. मुंबईत राज्यातील इतर भागासारखी पाणीटंचाई जाणवत नाही. पण असलेले पाणी पाऊस पडेपर्यंत त्यांना नियोजनबद्ध पद्धतीने वापरावे लागेल. राज्यातील दुष्काळाची परिस्थिती हाताळण्यास सरकारला अपयश आलेले आहे. अशा परिस्थितीत आयपीएलच्या सामन्यांचे आयोजन करताना राज्यातील दुष्काळाचा दाह किती भयानक आहे, याबाबतची खरीखुरी माहिती सरकारने आयोजकांना देणे आवश्यक आहे. आय.पी.एल. ने अनेकवेळा विविध वादविविद उभे केले. त्यातील मुख्य वाद हा मॅच फिक्सिंगचा. एक महत्वाचा भाग म्हणजे आय.पी.एल. मधील क्रिकेटचे सामने हे फारसे कुणी गंभीरतेने घेत नाहीत. त्यातील क्रिकेटसह मनोरंजन हा महत्वाचे भाग आहे. त्यामुळे यात सट्टा देखील अधिकृत केल्यास सरकारचे उत्पन्न वाढू शकते. परंतु तसे करण्याचा निर्णय सरकार घेऊ शकेलच असे नाही. भविष्यात कदाचित हा निर्णय घेतलाही जाईल. परंतु आता पुन्हा एकदा आय.पी.एल.चा धुराळा सुरु झाला आहे. त्यातील मनोरंजन अनुभवणे हे महत्वाचे.
-----------------------------------------------------------

0 Response to "पुन्हा आय.पी.एल.चा धुराळा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel