-->
औचित्य महिला दिनाचे

औचित्य महिला दिनाचे

संपादकीय पान मंगळवार दि. ०८ मार्च २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
औचित्य महिला दिनाचे 
आज जागतिक महिला दिन. जगभरातील महिला आपल्या हक्कासाठी व जागतिक शांतता प्रस्थापित व्हावी याची आठवण करुन देण्यासाठी हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतात. जगात बहुतांशी देशात महिलांना समान हक्क प्रदान झाले आहेत. परंतु त्याची अंमलबजावणी होतेच असे नाही. यात आपला देशही आलाच. त्यामुळे आपल्या हक्काची जाणीव या पुरुषप्रधान संस्कृती असलेल्या देशाला व्हावी म्हणून हा दिवस पाळला जातो. तसेच जागतिक शांतता नांदावी यासाठी हा दिवस महिला पाळतात. याचे कारण म्हणजे जगात अशांतता माजली की त्याच्या पहिल्या बळी या महिला ठरतात, त्यामुळे जगात जेवढी शांतता असेल तेवढ्या महिला सुरक्षित राहातात. त्यामुळे जागतिक शांतता नांदणे महिलांच्या दृष्टीने महत्वाची असते. जागतिक महिला दिनाला शतकाहून जास्त काळाचा इतिहास आहे. २८ फेब्रुवारी १९०९ साली जागतिक महिला कामगार दिन म्हणून सर्वात प्रथम पाळण्यास सुरुवात झाली. त्यावेळी नोकरी करणार्‍या महिलाच डोळ्यापुढे होत्या. त्याकाळी महिलांची सर्वच बाबतीत पिळवणूक केली जाई, त्यामुळे महिला कामगारांच्या हक्काची जाण करुन देण्यासाठी हा दिवस पाळण्यास सुरुवात झाली. ऑक्टोबर क्रांतीनंतर कॉम्रेड लेलिन यांनी महिलांच्या हक्कासाठी ८ मार्च हा महिला दिवस म्हणून पाळण्यास सुरुवात केली आणि सरकारी सुट्टी जाहीर केली. १९७७ साली संयुक्त राष्ट्राने जागतिक महिला दिनाची घोषणा केली आणि खर्‍या अर्थाने जगात हा दिवस पाळला जाऊ लागला. आपल्याकडे स्वातंत्र्यानंतर महिलांना घटनेने समान हक्क, समान अधिकार व समान संधी दिली. स्वातंत्र्यापासून आपल्याकडे महिलांना मतदानाचा व निवडणूक लढविण्याचा अधिकार प्रदान केला गेला. जो अधिकार आता सौदी अरेबियात बहाल करण्यात आला आहे. त्यादृष्टीने पाहता आपल्याकडील महिला या भाग्यवान आहेत. आता प्रश्न आहे तो त्यांना मिळालेल्या अधिकाराची अंमलबजावणी करण्याची. स्वातंत्र्यपूर्व काळात मात्र महिलांना आपल्या अधिकारांसाठी लढावे लागले आहे. सती, बालविवाह, केशवपन, शिक्षणाचा हक्क या गोष्टींसाठी संघर्ष कारावा लागला आहे. राममोहन रॉय, इश्वरचंद्र विद्यासागर, ज्योतिबा फुले यांनी यासाठी मोलाचे काम केले आहे. त्याकाळी विधवेचा पुर्नविवाह ही बाब म्हणजे त्याकळचा कर्मठ समाजाला मानवणारी नव्हती. परंतु ब्रिटीशांनी १८५६ साली विधवा पुर्नविवाहाचा कायदाच केला. त्याअगोदर १८२९ साली सतीची प्रथा कायद्याने बंद करण्यात आली. असे असले तरीही १९८७ पासून आपल्याकडे ४० महिला सती गेल्या. त्यातील राजस्थानातली रुपकुंवरची सती हे अलिकडचे गाजलेले प्रकरण. त्यामुळे केवळ कायद्याने समाजात सुधारणा करता येत नाही तर त्यासाठी समाजाची मानसिकताही बदलण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे. स्वातंत्र्यानंतर आपल्याकडे राष्ट्रपती, पंतप्रधान, विरोधी पक्षनेत्या, गव्हर्नर, मुख्यमंत्री, मंत्री त्याचबरोबर प्रशासनात अनेक जबाबदारीच्या पदांवर महिलांनी आपली महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यात इंदिरा गांधींची पंतप्रधानपदाची १७ वर्षे ही ठसठशीत दिसणारी कामगिरी म्हटली पाहिजे. इंदिराजींच्या ध्येयधरणाबाबत टीका होऊ शकते परंतु त्यांनी एक महिला पंतप्रधान म्हणून आपली गाजविलेली कारकिर्द इतिहासात कोरली गेली आहेत. स्वातंत्र्यानंतर आता सात दशके झाली आहेत. यात आपल्याकडे महिलांसाठी बरेच कायदे झाले, त्याचून महिलांनी आपला विकास करुन घेतला. परंतु आजही ग्रामीण व शहरी भागातील महिला यांच्यात मोठा फरक दिसतो. शहरातील पुरुषाच्या मांडीला मांडी लावून काम करणारी करिअर वुमन पाहिली तर ती विकसीत देशातील महिलांच्या कामाच्या तोडीचे काम करताना दिसते. ती आपले करिअर करीत असताना संसाराचा गाडाही हाकते. आपल्याकडे असाही एक वर्ग आता निर्माण झाला आहे की, तो पुरुष आणि स्त्री मधला फरक जाणत नाही. अशा वर्गात मुलगी जन्माला आली तर कोणाला वाईटही वाटत नाही. मात्र मुलगी झाली म्हणून तीचा जीव घेणारा समाज किंवा मुलीचा जन्म होऊच नये यासाठी तिची गर्भात हत्या करणारे महाभाग आपल्याकडे आहेत व ते मोठ्या संख्येने आहेत. अशा प्रवृतींमुळेच आज हरयाणा, पंजाब, गुजरात या राज्यात मुलींचे प्रमाण घसरले आहे. यातून तेथे आता सामाजिक समस्या निर्माण झाल्या आहेत. आपल्याकडे शहरी भागातील व ग्रामीण भागातील महिलांचे प्रश्न वेगळे आहेत. उत्तरप्रदेशासारख्या मागास राज्यात मुलींना सायकली वाटल्यावर तेथे त्यांचे शिक्षणाचे प्रमाण वाढण्यास मदत झाली, तर उत्तर भारतात ऑनर किलींगसारखे नवीनच प्रकार जन्माला आले आहेत. १९६१ साली हुंडाविरोधी चळवळीने कायदा करण्यास सरकारला भाग पाडले. परंतु आजही हुंडयासाठी छळ होण्याचे प्रकार काही थांबलेले नाहीत. आजही आपल्याकडे आपल्या पत्निला मारहाण करण्यात पुरुषाला धन्यता वाटते. हे प्रकार थांबविण्यासाठी आपल्याला कायद्याच्या पुढे जाऊन लोकांचे मत परिवर्तन करण्याची आवश्यकता आहे. स्त्रीकडे एक उपभोग्य वस्तू म्हणून पाहण्याचे थांबले पाहिजे. जागतिक महिला दिन हा केवळ त्या दिवसापुरता नसून महिलांचा सन्मान हा ३६५ दिवस झाला पाहिजे.
----------------------------------------------------

0 Response to "औचित्य महिला दिनाचे "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel