-->
पाच राज्यातील लढाई

पाच राज्यातील लढाई

संपादकीय पान सोमवार दि. ०७ मार्च २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
पाच राज्यातील लढाई
पश्‍चिम बंगाल, तामीळनाडू, केरळ, आसाम व पॉँडेचेरी या पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. १४ एप्रिल ते १६ मे या दरम्यान या निवडणुका होतील व त्याचे निकाल १९ मे रोजी जाहीर होतील. देशातील सत्ताधार्‍यांची परीक्षा ठरणारी पाच राज्यातील निवडणूक असेल. त्याचबरोबर विरोधकांची जूट कशी होते त्यावर त्यांचे यश अवलंबून राहिल. सर्वात महत्वाचे म्हणजे डाव्या पक्षांसाठी केरळ व पश्‍चिम बंगाल या दोन राज्यातील निवडणूक ही फार मोठी कसोटीचा काळ ठरविणारी असेल. यातील चार मोठ्या राज्यांपैकी तीन राज्यात मुस्लिम मतांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. तामीळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता, द्रमुकचे सर्वेसर्वा करुणानिधी व त्यांचे वारसदार एम. के. स्टालीन, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगई, केरळचे मुख्यमंत्री ओमान चेंडी यांचे राजकीय भवितव्य या निवडणुकांनंतर समजेल. त्यामुळे त्यांच्यादृष्टीने ही निवडणूक महत्वाची ठरेल. यापैकी तरुण गोगई व करुणानिधी यांचे राजकीय करिअर वयाचा हिशेब करता संपत आलेले आहे. मात्र त्यांचा पक्ष जिंकतो किंवा नाही ते महत्वाचे ठरणार आहे. त्याचबरोबर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी पक्षाची सुत्रे स्वीकारल्यापासून लढविली जाणारी ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाचीही कसोटी लागेल. माकप यावेळी बहुदा कॉँग्रेसशी आघाडी करुन पश्‍चिम बंगालमध्ये ममता बँनर्जींच्या तृणमूल कॉँग्रेसशी लढत देईल असे दिसते. ही आघाडी जर यशस्वी ठरली तर देशात एक वेगळे चित्र उभे राहू शकते. पश्‍चिम बंगालमध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्था ममतादीदींच्या ताब्यात आहेत. असे असले तरीही माकपची ताकद सत्ता गेली असली तरी नगण्य नाही. ममतांचे हे सत्ताचक्र माकप यावेळी भेदून आपली यापूर्वीची ३३ वर्षांची सत्ता पुन्हा कमावेल का, असा प्रश्‍न आहे. गेल्या पाच वर्षात पश्‍चिम बंगालमध्ये लोकांना सत्तेत बदल पाहिला. मात्र फारसे काही विकासाचे चित्र पाहिलेले नाही. त्यामुळे लोकांना ममता दिदींपेक्षा आपले डावे पक्षच बरे असे वाटू लागण्याची शक्यता काही नाकारता येत नाही. कॉँग्रेस या एकेकाळच्या शत्रूसोबत आता भागीदारी करण्यास माकपला भाग पडले आहे. काळाचा महिमा म्हणावा लागेल. मात्र ही युती कशी यशस्वी होते त्यावर देशाचे राजकीय चित्र पलटू शकते. या राज्यात मोदी व त्यांच्या भाजपाला कधी नव्हे ती १७ टक्के मते पडली होती. राज्यातील २९ टक्के मुस्लिम मतदार तृणमूलच्या मागे राहतो की कॉँग्रेस-माकपबरोबर येतो हे पाहण्यासारखे असेल. तामीळनाडूत खरी लढत ही सत्ताधारी अण्णाद्रमूक व द्रमूक यांच्यात होईल. यावेळी अण्णाद्रमूकच्या बाजूने बहुदा भाजपा जाईल असे दिसते. तर कॉँग्रेला द्रमूकची साथ सध्या सोडणे काही शक्य होणार नाही. विद्यमान मुख्यमंत्री जे. जयललिता यांची लोकप्रियता कायम असली तरीही या राज्यात सलग सत्ता टिकविली जाण्याचा प्रसंग जवळपास घडलेला नाही. एकदा द्रमूक तर दुसर्‍यांदा अण्णाद्रमूक असेच आलटून पालटून सत्तेवर येतात असा अनुभव आहे. यावेळी काय होते ते पहायचे. केरळातही असेच चित्र आपल्याला पहायला मिळते. एकदा कॉँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी व दुसर्‍यांदा माकपच्या नेतृत्वाखालील आघाडी सत्तेवर येते असा अनुभव आहे. मात्र पश्‍चिम बंगालमध्ये माकप-कॉँग्रसे एकत्र आल्यास केरळात ते विरोधात लढणार का असाहा प्रश्‍न पडतो. केरळात काही लहान प्रमाणात का होईना भाजपाने प्रवेश केला आहे. त्यांचा हा प्रवेश आत्तापासूनच रोखून धरण्यासाठी कॉँग्रेस-माकप यांची व्यापक आघाडी होईल का, असाही प्रश्‍न आहे. अर्थात ही बाब अशक्य वाटते परंतु होऊही शकते. सध्या केरळात सत्तेत असलेल्या कॉँग्रसेच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारच्या मुख्यमंत्र्यापासून ते अनेक मंत्र्यांवर भष्टाचाराचे आरोप आहेत. त्यामुळे हे सरकार पूर्णपणे बदनाम झालेले आहे. अशा स्थितीत माकपच्या सध्याच्या आघाडीला सत्तेत येण्यासाठी चांगला वाव आहे. परंतु सत्तेची गणिते कशी जुळतात ते अजून काही स्पष्ट झालेले नाही. आसाम या कॉँग्रेसची सत्ता असणार्‍या राज्यात ही सत्ता राखण्यात कॉँग्रेसला यश येईल का, असा सवाल आहे. कारण राज्यात सलग तीन वेळा कॉँग्रेस सत्तेत आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात वातावरण असण्याचा धोका जास्त आहे. त्यातच भाजपाने काही जणांना फोडून आपल्या पदरात घेतले आहे. त्यशिवाय काही स्थानिक पक्षांशी आघाडी करुन आपली ताकद वाढविण्याचा प्रय्तन केला आहे. अत्तरांचा सम्राट बद्रुद्दीन अजमल यांचा पक्ष सध्या राज्यात दुसरा मोठा आहे आणि त्यांची कॉँग्रेसशी आघाडी झाल्यास कॉँग्रेसची ताकद वाढेल. एकूणच पाच राज्यातील निवडणुकीचा बिगुल फंकला गेला आहे. पहायचे काय होते ते.
-------------------------------------------------------------------------  

0 Response to "पाच राज्यातील लढाई"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel