-->
मेक इन इंडियाची शोबाजी

मेक इन इंडियाची शोबाजी

संपादकीय पान सोमवार दि. २२ फेब्रुवारी २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
मेक इन इंडियाची शोबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप हे कोणत्याही गोष्टीचा इव्हेंट करुन त्याचा गाजावाजा करण्यात माहीर आहेत. निवडणुकीचाही ते अशा प्रकारे इव्हेंट करतात व लोकांना भुरळ पाडून मते पदरात टाकतात. अर्थात, लोकसभा निवडणुकीला त्यांना हे साध्य झाले, मात्र त्यापुढील निवडणुकीत जनतेने त्यांची ही शोबाजी ओळखल्याने अपयश आले. आतादेखील नुकतीच अशीच एक जागतिक पातळीवरील शोबाजी पार पाडली. बहुचर्चित ङ्गमेक इन इंडियाफचा आठवडा अखेर चांगल्यारितीने पार पडला. चांगला यासाठी की, याच्या सुरुवातीच्या पहिल्याच दिवशी झालेल्या रंगारंग कार्यक्रमात मोठी आग लागली होती व त्यात चौपाटी येथील स्टेज आगीच्या भक्ष्यस्थानी गेले होते. सुदैवाने यात कसलीही मनुष्यहानी झाली नाही. मात्र, बदनामी पुरती झाली होती. या प्रदर्शनास १०२ देशांतील सुमारे नऊ लाख लोकांनी भेटी दिल्या होत्या. यासाठी जगातील विविध देशांचे २० मंत्रीमहोदय, दोन पंतप्रधान व एक उपपंतप्रधान उपस्थित होते. यात देशातील १७ राज्ये व आठ मुख्यमंत्री सहभागी होते. अर्थातच ही भाजपप्रणित सरकार असलेली राज्येच होती. यात नऊ हजार भारतीय कंपन्या व दोन हजार विदेशी कंपन्या सहभागी होत्या. त्याहून सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सुमारे १५.२ लाख कोटी रुपयांचे गुंतवणुकीचे प्रस्ताव यात सादर झाले. महाराष्ट्रासाठी सर्वात अभिमानाची गोष्ट म्हणजे, त्यापैकी आठ लाख कोटी रुपयांचे प्रस्ताव महाराष्ट्रातील आहेत व त्यापैकी ३.३ लाख कोटी रुपयांचे प्रस्ताव कोकण विभागासाठी आहेत. विदर्भ व मराठवाडा या दुष्काळी मागास भागासाठी १.५ लाख कोटी रुपयांचे प्रस्ताव आले. पश्‍चिम महाराष्ट्र व खानदेशासाठी अनुक्रमे ५० हजार कोटी रुपये व २५ हजार कोटी रुपयांचे प्रस्ताव आले आहेत. यातून केवळ महाराष्ट्रातच ३० लाख रोजगार निर्माण होतील, असा आशावाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. सरकारने सहकार्य करार केलेली सर्वच्या सर्व गुंतवणूक यावी, कारण त्यातून या देशाचे व महाराष्ट्राचेच भले होणार आहे. परंतु, केवळ शोबाजी करणे व प्रत्यक्षात ते उतरविणे त्यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. निदान यापूर्वीचा अनुभव तरी तसाच आहे. २००९ साली गुजरात सरकारने अशाच प्रकारचा इव्हेंट मुख्यमंत्रीपदी नरेंद्र मोदी असताना भरविण्यात आला होता. त्यावेळीदेखील १२ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव दाखल झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात यातील गुंतवणूक केवळ पाच टक्केच झाली. आत्ताच्या प्रदर्शनातही असे अनेक सहकार्य करार तोट्यात असलेल्या कंपन्यांनी केले आहेत. या कंपन्यांची खरोखरीच गुंतवणूक करण्याची क्षमता नजीकच्या काळात आहे का, हा सवाल आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास, उत्तम ग्लावा स्टील या कंपनीचा तोटा ४०० कोटी रुपयांहून जास्त आहे. कंपनीवर सुमारे तीन हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. अशा स्थितीत ही कंपनी ३७५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव सादर करते, खरोखरीच ही कंपनी प्रकल्प पूर्ण करील का, असा सवाल उपस्थित होतो. वेदांत लि. या कंपनीच्या बाबतीततही असेच आहे. या कंपनीला सुमारे १२ हजार कोटी रुपयांचा तोटा आहे व त्यांच्यावरील कर्जाचा बोजा ७२ हजार कोटी रुपयांचा आहे. या कंपनीने सुमारे ६० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावावर सह्या केल्या आहेत. या कंपनीला सध्यातरी ही गुंतवणूक करणे शक्य नाही, हे सांगावयास कोणत्या अर्थतज्ज्ञाची गरज नाही. भारत हे गुंतवणुकीचे सध्याचे तरी उत्तम डेस्टिनेशन आहे, यात काही शंका नाही. त्यातच बहुतांशी गुंतवणूकदारांनी महाराष्ट्राला पसंती दिली आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, आपल्या राज्यात उत्तम पायाभूत सुविधा आहेत, चांगले बंदर आहे व मुंबईसारखे आर्थिक केंद्र याची राजधानी आहे. कोणत्याही गुंतवणूकदारास चांगली पायाभूत सुविधा पुरविल्यास तो गुंतवणूक करण्यास तयार असतो. महाराष्ट्रात विजेचा तुटवडा असला तरीही अन्य जमेच्या बाजू आहेत. एकेकाळी चीनकडे जगातील गुंतवणूकदार यासाठीच आकर्षित झाले होते. मात्र, गेल्या काही वर्षात तेथे मजुरी वाढली व चीन हे गुंतवणुकीच्या दृष्टीने दुय्यम स्थानावर आले. आपल्याकडे असलेले इंग्रजीचे ज्ञान, चांगले प्रशिक्षित मनुष्यबळ, स्वस्त मजूर, बंदर असल्यामुळे मालाची आयात-निर्यात सुलभ होते, अत्याधुनिक शेअर बाजार या सर्व बाबी असल्यामुळे आपल्या देशात जागतिक गुंतवणूकदार उपलब्ध होतो. मात्र, आजही आपल्याकडे लाल फितीचा कारभार मोठ्या प्रमाणात आहे व त्याचबरोबर भ्रष्टाचारही आहे. त्यामुळे विदेशी गुंतवणूकदार कचरतो. त्यावर मात केल्यास आपल्याला कोणतीही शोबाजी न करताही गुंतणूक येऊ शकते. खरे तर, मोदींनी गुंतवणूकदारांची शोबाजी करण्यापेक्षा आपल्याकडील नकारात्मक बाबींवर उपाय शोधल्यास मोठी गुंतवणूक जास्त होईल.
------------------------------------------------------------------

Related Posts

0 Response to "मेक इन इंडियाची शोबाजी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel