-->
सोशल नेटवर्क आणि तरुणाई

सोशल नेटवर्क आणि तरुणाई

संपादकीय पान सोमवार दि. २१ डिसेंबर २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
सोशल नेटवर्क आणि तरुणाई
सध्या युरोपातील काही देश १३ वर्षाखालील मुलांसाठी सोशल नेटवर्किंगवर बंदी घालण्याचा गांभीर्याने विचार करीत आहे. युरोपासारख्या मुक्त विचारांच्या व व्यक्तीस्वातंत्र्याचा पुरस्कार करणार्‍या देशात सोशल मिडीया हे १३ वर्षाखालील मुलांसाठी नाही असे वाटत असेल तर त्याचा जगानेही विचार केला पाहिजे. इंटरनेट हे एक मायाजाल आहे. त्याच्या माध्यमातून जग एका बोटाच्या अंतरावर आले असले तरी त्याचे जसे फायदे आहेत तसेच त्याचे वाईट परिणामही तेवढेच गंभीर आहेत. जगातील नवीन पिढी या मायाजालात अडकून जर आपले आयुष्य खराब करुन घेणार असेल तर त्यावर निश्‍चितच विचार झाला पाहिजे. आपल्याकडे गेल्या पाच वर्षात इंटरनेटचा प्रचार व प्रसार झपाट्याने झाला. प्रामुख्याने स्मार्ट फोन आल्यावर इंटरनेट हे मोबाईलमधूनच आपल्या घरात आले. तरुण पिढी या नवीन तंत्रज्ञानाकडे आकर्षित होणे स्वाभाविकच होते. काही दिवसांपूर्वी इंटेल सिक्युरिटीने जगभरातील ८ ते १६ वर्षे वयोगटांतील ९०१७ मुलांमध्ये हे सर्वेक्षण केले होते. हे सर्वेक्षण अमेरिका, कॅनडा, ब्राझिल, इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, स्पेन, जपान, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर आणि भारत या देशांत करण्यात आले. यातील निरिक्षणांनुसार भारतातील अर्ध्याहून अधिक मुलांनी हे मान्य केले की ऑनलाईन भेटलेल्या अनोळखी व्यक्तीला ते भेटलेले आहेत किंवा भेटण्याची तयारी करत आहेत. अर्थातच ही गोष्ट कोणत्याही पालकांसाठी धक्कादायक आहे. कॉलेजवयीन कुमारांमध्ये अनोळखी व्यक्तींशी ओळख करून घेण्याची प्रवृत्ती स्वाभाविकपणे जास्त असते. हे वयच नवथर असते. नवनवीन लोकांना भेटण्याची उत्सुकता मनात असते. अशावेळी आपल्या फेसबुक किंवा ट्विटर अकाऊंटवर असणारी व्यक्ती सलगीने वागतेय पण तिला आपण प्रत्यक्ष ओळखतो का याची फारशी चिंता तरुण-तरुणी करत नाहीत. खरं तर सोशल मीडियावरील कोणत्याही अकाऊंटमध्ये आपण ज्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटलेलो नाहीत अशा व्यक्तीला सामील करून घेणं हे धोकादायक असते. ८ ते १६ वर्षे वयोगटांतील ८१ टक्के मुले सोशल मीडिया नेटवर्कवर ऍक्टिव्ह आहेत.
७७ टक्के मुलांनी वयाची १३ वर्षे पूर्ण होण्याआधीच आपले फेसबुक अकाऊंट तयार केले आहे. सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असलेल्या मुलांपैकी ६९ टक्के मुलांनी फोटो लावले आहेत, ५८ टक्के मुलांनी आपला ईमेल आयडी दिला आहे, ४९ टक्के मुलांनी त्यांच्या शैक्षणिक संस्थेचं नावं दिलं आहे तर ४६ टक्के मुलांनी त्यांची पूर्ण जन्मतारीख तसेच ४२ टक्के मुलांनी आपला फोन नंबर दिला आहे. विदेशातील ९१ टक्के पालकांनी त्यांच्या मुलांना सोशल मीडिया आणि त्याचबरोबर अनोळखी व्यक्तींबरोबर संभाषण करण्यातले धोके याविषयी पुरेशी माहिती दिलेली असतेे. मात्र आपल्या देशात हे प्रमाण खूपच कमी आहे. याबाबत मुले व पालक या दोघांमध्ये अधिक चांगला संवाद होण्याची गरज आहे. संवादाचा केवळ वेळ वाढणे गरजेचे नाही तर उभयतात सकारात्मक चर्चा होण्याची आवश्यक आहे. मुलांना इंटरनेटविषयी चांगले नियम सांगण्याची, इंटरनेट हे कामाला येऊ शकतं मात्र वेळप्रसंगी कसे फसवे असू शकते हे सांगण्याची गरज आहे. तरुणांमधले बरेचसे गुन्हे हे फेसबुकच्या माध्यमातून व अनोळखी व्यक्तींच्या संपर्कातून झाले आहेत. अशा तरुणांच्या वाहवत जाण्याला इंटरनेटच कारणीभूत ठरतं. स्मार्टफोन्स, टॅब्लेट आणि लॅपटॉप यांसारखी उपकरणे उपलब्ध असल्याने वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर पसरण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. किंबहुना तरुणांमध्ये खाजगीपणा जपण्याचे भान हरवू लागले आहेत. वैयक्तिक आणि खाजगी यातील सीमारेषा अनेक तरुणांसाठी धूसर आहेत. अशा तरुणांनी इंटरनेटचा काळजीपूर्वक वापर करणं आवश्यक आहे. सोशल मिडिया हे एक प्रभावी माध्यम आहे, हे आपण ओळखतोच. जगाला याची तशी ओळख झाली आहे. माहितीचे मायाजाल यातून एका बोटाच्या कळीव्दारे उपलब्ध झाले आहे. यामुळे आपण आपला ज्ञानाचा साठा वाढवू शकतो. परंतु त्याचे अनेक वाईट परिणाही आपल्याला दिसतात. अनपेक्षितरित्या तरुण पिढी यात ओढली जाते व त्यातून वाईट मार्गाला लागते. अनेक वाईट संगती यातून लागतात. यातून गुन्हेगारीकडे तरुणाई वळण्याचा धोका असतो. त्यएामुळेच युरोपसारख्या देशांनी १३ वर्षाखालील मुलांसाठी सोशल नेटवर्किंवर बंदी घालण्याचा विचार सुरु केला आहे. आपल्याकडेही सध्याची गुन्हेगारी पाहता अशाच प्रकारचा विचार करावा लागणार आहे. कोणत्याही बंदीने प्रश्‍न सुटत नाही हे वास्तवही आपण नाकारु शकत नसताना पालकांनी यासंबंधी तरुणाईला आपल्या विश्‍वासात घेऊन याबाबत जागृती करण्याची वेळ आता आली आहे.
---------------------------------------------------------------------

0 Response to "सोशल नेटवर्क आणि तरुणाई"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel