-->
बिघडलेले समाज-मन

बिघडलेले समाज-मन

संपादकीय पान बुधवार दि. ०२ मार्च २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
बिघडलेले समाज-मन
ठाण्यातील कासारवडली या घोडबंदर येथील भागात एकाच व्यक्तीने आपल्या नात्यातील १४ जणांती हत्या करुन स्वत: आत्महत्या केल्याची घटणा जीवाचा थरकाप उडविणारी आहे. आई-वडिल, पत्नी, दोन लहानग्या मुली, तीन बहिणी, सहा लहानगे भाचे अशा १४ जणांचे हत्याकांड हस्नेल अन्वर वरेकर या ३५ वर्षीय तरुणाने केले आणि त्यानंतर स्वत:चा जीवही संपविला. या हत्याकांडातून त्याची एक बहिणी बचावली आहे. ही सर्व घटना मन सुन्न करणारी आहे. अशा प्रकारे एखादा माणूस आपल्याच नातेसंबंधातील लोकांना यदमासाला पाठवितो. खरे तर त्याने त्यांना आदल्या दिवशी जेवायला बोलवून दावत दिली होती. त्यानंतर त्यांचेच जीव घेतो हे सर्व आकलन होण्याच्या पलिकडचे आहे. अशाच प्रकारे या कुटुंबियांना विषबाधा यापूर्वी झाली होती. परंतु हे प्रकरण फारसे वाढू नये म्हणून घरापर्यंतच ठेवण्यात आले. कदाचित अशा प्रकारे त्याचवेळी हत्या करण्याचा इरादा असावा, परंतु त्यावेळी शक्य झाले नसावे. हस्नेल हा तरुण फारसा कुणात न मिसळणारा होता व त्याचा अल्लावर फार विश्‍वास होता. तासनतास तो मशिदीत बसलेला असायचा, असे त्याच्या शेजारचे लोक सांगत. परंतु अशा प्रकारे भाविक असलेला माणूस अशा प्रकारचे कृत्य करेल का, असाही सवाल आहे. घराबाहेर शांत असलेला हस्नेल मात्र घरात शीघ्रकोपी असायचा. कधी कधी तो घरातल्यांना मै तुम सबको खल्लास तर दुंगा अशी धमकीही घ्यायचा. पोलिसांनाही या सर्व प्रकरणाचा अजून योग्य छडा लागलेला नाही. पोलीस गुन्हेगारीचा तपास ज्या पध्दतीने करातात त्या   सुत्रानुसार करीत आहेत. संपत्तीच्या वादातून हे घडले आहे का त्याची पोलिस तपासणी करीत आहेत. परंतु या घरात संपत्तीविषयी काही वाद असल्याचे चर्चेत नव्हते असे शेजार्‍यांकडून पोलिसांना समजले आहे. त्यामुळे हा मुद्दा निकालात निघाला आहे. कारण कोणतेही असो अशा प्रकारे संपूर्ण कुटुंबच जवळपास संपविण्याचे धारिष्ट एखादा करतो त्यामागे काही तरी ठोस कारण किंवा आरोपीचे अस्वस्थ मन हे कारण असू शकते. मानसशास्त्राचा विचार करता अशा प्रकारचे गुन्हेगार हे स्किझोफेनियाचे रुग्ण असतात. या रोगाने पछाडलेले लोक हे संशयी असतात व सतत आपल्या विरोधात कोणतरी कार्य करीत आहे आहे त्यांना वाटत असते. असे लोक हे कधीही हिंसक होऊन त्यांच्या हातून कोणताही गुन्हा होऊ शकतो. गेल्या काही वर्षात आपल्याकडे अशा प्रकारच्या गुन्ह्यांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. मध्यंतरी पुण्यात एका एस.टी. चालकाने विरुध्द दिशेने बस चालवून अनेकांचे जीव घेतले होते. आपले कुटुंब संपवून नंतर आत्महत्या करण्याचे प्रकारही गेल्या काही वर्षात वाढले आहेत. तसेच एखाद्या शिक्षकाने मुलांना टोकाची शिक्षा देणे, सुट्टी दिली नाही म्हणून बॉसचा जीव घेणे, प्राध्यापकासारख्या एका उच्चशिक्षिताने आपल्या पत्नीची हत्या करणे, मुलाने आपल्या जन्मदात्या आईलाच रस्त्यावर सोडून पसार होणे या घटना आपल्याला अस्वस्थ करीत असतात. परंतु अशी कृत्ये करणार्‍यांच्या संवेदना संपल्या आहेत की, काय असे वाटते. आपल्याकडे वाढदिवस, लग्न, मुंजी, साखरपुडासारखे उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करतो. त्यासाठी आपल्या भोवतींच्या मंडळींना, नातेवाईकांना, मित्रमंडळीना बोलावतो. अशा मंगल प्रसंगी आपण उत्साहात असतो. परंतु एखाद्या शुल्लक गोष्टीवरुन झटकन नैराश्य आपल्याला वेढा घेते व त्यातून दुसरे टोक गाठले जाऊन हत्या केल्या जातात. या सर्व घटना पाहता आपल्या समाजात काही खदखदते आहे व त्याचा स्फोट अचानकपणे होतो असे दिसते. आपण वयाने वाढतो परंतु वाढत्या वयाबरोबर आपण आपल्या मनाची उंची काही वाढवित नाही. आपले मन कमकुवत, दुबळे राहते व   त्यामुळे अनेक प्रश्‍न निर्माण होतात. केवळ पैसा आहे म्हणून माणूस सुखी होतो असे नव्हे. पैसा असलेल्यांचे प्रश्‍न वेगळे असतात. मग पैशाच्या जोरावर गुन्हा करुन तो मोकळा झाला की तो त्यापासून दूर जाऊन पैशाच्या जोरावर गुन्हा लपविण्याचा प्रयत्न करतो. शीना बोरा हत्याकांडात असेच घडलेले दिसते. गुन्हेगार्‍ह्याला कोणताच जात-धर्म-समाज-पैसा-गरीब-श्रीमंत असा भेदभाव नसतो, एकदा त्याच्या मनाने गुन्हा करण्याचा ठाव घेतला की, माणूस हा माणूस म्हणून न राहाता तो पशू होतो व पशू प्रमाणे वागतो. कदाचित त्याच्यातील ही मानसिकता अगोदर लक्षात आली तर त्यावर काही उपाय करुन त्यावर मात करता यऊ शकते. अर्थात अशा प्रकारची गुन्हेगारी ही अमेरिकेसारख्या प्रगत देशातही आढळते. तेथेही गोळ्या झाडणारे माथेफिरु आपल्याला दिसतात. एकूणच आपल्या समाजाच्या मनाची प्रकृती काही ठिक नाही असेच यावरुन दिसते. हे बिघडलेले समाज-मन ताळ्यावर आणणे ही काही सोपी बाब नाही.
----------------------------------------------------------------------------

Related Posts

0 Response to "बिघडलेले समाज-मन"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel