-->
महागाईचा भडका

महागाईचा भडका

संपादकीय पान शुक्रवार दि. १८ मार्च २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
महागाईचा भडका
देशात एकीकडे राष्ट्रप्रेम कसे व्यक्त करायचे याबाबतीत उमाळा व्यक्त व्यक्त होत असताना जनतेच्या एका जिव्हाळ्याच्या प्रश्‍नावर काणाडोळा झाला आहे व तो प्रश्‍न म्हणजे देशात उडालेला महागाईचा भडका. सर्वसामान्य जनतेला मात्र या महागाईच्या ज्वाळांनी हैराण केले आहे. एकीकडे दुष्काळामुळे पाण्याची टंचाई व त्यातच मार्च महिन्यातच उन्हाने पारा वर चढू लागला असताना भाजेपाल्या कडाडल्या आहेत. त्यातच सरकारने आता पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत वाढ करुन या महागाईला आणखी हातभार लावला आहे. नरेंद्र मोदी सरकारने अच्छे दिन यएा देशात आणण्याचा वादा केला होता. मात्र अच्छे दिन काही लवकर बघायला मिळणार नाहीत हे नक्की. सध्याच्या महागाईचा वाढता वेग पाहता या सरकारला महागाईला नियंत्रणात आणणे काही जमत नाही असेच दिसते. महागाई जोपर्यंत नियंत्रणात येत नाही तोपर्यंत अच्छे दिन काही या देशातील जनतेला दिसणार नाहीत हे नक्की. गेल्या काही दिवसांपासून वाशी या राज्यातील मोठ्या बाजारपेठेत भाज्यांची आवाक कमी झाली आहे. त्यामुळे भेंडी, फरसबी, टोमॅटो, वांगी, ढोबळी मिरची या भाज्यांचे दर ६० ते ८० रुपये किलोपर्यंत महागले आहेत. यंदा मे महिन्यात महागाई होईल असा अंदाज होता. कारण पावसाने दगा दिल्यामुळे पाण्याची तीव्र टंचाई आहे व शेतीलाही पाणी कमीच मिळण्याची अपेक्षा आहे. जूनमध्ये एकदा काही पहिला पाऊस झाला की सर्वांनाच दिलासा मिळेल. परंतु अजून त्यासाठी तीन महिने आहेत. मे महिन्यात त्यामुळे उन्हाचा भर असताना पाणी टंचाईमुळे भाज्या महाग होणेे आपण समजू शकतो परंतु आत्तापासूनच म्हणजे मार्च महिन्यापासूनच भाज्या महागल्याने सर्वांसाठी हा चिंतेचा विषय आहे. या भाज्या नेमक्या कशामुळे महागल्या? केवळ कमी भाज्या बाजारात आल्यामुळे महागल्या की त्यामागे दलालांचे काही रॅकेट आहे? याची चौकशी होण्याची गरज आहे. कारण घाऊक बाजारात आठ ते दहा रुपयांच्या दरात विकल्या जाणारा फ्लॉवर व कोबी या भाज्या प्रत्यक्षात स्वयंपाकघरात येईपर्यंत ४० ते ४५ रुपये किलो दराने विकल्या जात आहेत. थंडी संपून जरा कुठे उन्हाच्या झळा लागण्यास सुरुवात होताच फ्लॉवर, कोबी, टोमॅटो, भेंडी, वांगी अशा सर्वच भाज्यांचे घाऊक आणि किरकोळ दर दुपटीने वाढले आहेत. विशेष म्हणजे, किरकोळ बाजारात गवार, फरसबी, वाटाणा आणि घेवडयासारख्या भाज्यांनी तर किलोमागे शंभरी गाठली आहे. दरवर्षी साधारणपणे एप्रिल, मे व जून महिन्यात पाऊस पडेपर्यंत भाज्यांचे दर महागतात. याचे कारण म्हणजे पाणी टंचाई हेच असते. परंतु यंदा मार्च महिन्यातच दर वधारण्यास सुरुवात झाल्याने शंकेला वाव निर्माण झाला आहे. त्यातच सरकारने जगात कुठे थोड्याफार प्रमाणात खनिज तेलाच्या किंमती वाढल्याने लगेचच देशात पेट्रोल ३ रुपयांनी व डिझेल २ रुपयांनी महाग केले आहे. खरे तर गेल्या दोन वर्षात जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या किंमती या १३० डॉलर प्रति बॅरलवरुन ३० डॉलरवर खाली घसरल्या आहेत. एवढ्या प्रमाणात किंमत घसरली असताना आपल्याकडे जेमतेच २० टक्क्यांनीच किंमती उतरल्या. सरकार जर आन्तरराष्ट्रीय बाजाराशी लिंक खनिज तेलाच्या किंमती आहेत असे सांगत असेल तर त्या प्रमाणात किंमती उतरावयास पाहिजे होत्या. परंतु सरकारच्या महसुलात त्यामुळे कमी झाली असती. त्यामुळे सरकारने किरकोळ प्रमाणात खनिज तेलाच्या किंमती उतरविल्या. तर दुसरीकडे आयात कमी झाल्याने देशाच्या तिजोरीवर आयातीचा ताण कमी झाला. अशा प्रकारे दुहेरी फायदा ग्राहकांना मिळाला पाहिजे होता परंतु मोदी सरकारने यातील कोणताही लाभ ग्राहकांना दिला नाही. खरे तर अशा प्रकारे डिझेलच्या किंमती न कमी करुन सरकारने प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे महागाईला चालना दिली आहे. मार्च महिन्यात जर भाज्या किंमतीची शंभरी गाठत आहेत तर पुढील काळात भाज्या कितीवर जातील याची कल्पनाच न केलेली बरे. सध्याच्या भाज्यांच्या किंमती पाहता सर्वसामान्य जनता, कष्टकरी या भाज्या खरेदी करुच शकत नाहीत. जनतेच्या या मूलभूत गरजांकडे सरकारने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. कारण लोकांना स्वस्तात भाजीपाला मिळणे गरजेचे आहे व त्यात व्यापारी, सट्टेबाज किंमती कृत्रिमरित्या वाढवित नाहीत ना, त्याची खबरदारी सरकारने घेण्याची आवश्यकता आहे. सध्याचे राज्यकर्ते आपण निवडणुकीपूर्वी दिलेली अनेक आश्‍वासने विसरत आहेत. परंतु जनतेच्या दृष्टीने मात्र महागाई हा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे व भाजपा-शिवसेनेने यासंबंधी दिलेली आश्‍वासने जनता काही विसरलेली नाही. अन्यथा आगामी निवडणुकीत जनतेला विरोधी मत नोंदवून त्यांच्या आश्‍वासनांची माहीती करुन द्यावी लागेल.
-------------------------------------------------------------------

0 Response to "महागाईचा भडका"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel