-->
संपादकीय पान शनिवार दि. १० मे २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------
कमी पावसाचे संकट
--------------------------------------------
निवडणुकीचा आता शेवटचा टप्पा फक्त शिल्लक आहे. त्यानंतर १६ मे रोजी निकाल लागतील व नवीन सरकार सत्तेवर येईल. नव्याची नवलाई संपुष्टात येऊन आल्याआल्या लगेचच नवीन सरकारपुढे यावर्षी कमी पावसाचे संकट उभे ठाकणार आहे. या वर्षी एप्रिल महिन्यात अनेक ठिकाणी उष्णतेचा पारा बराच चढला आहे. त्यामुळे मे महिन्यात उच्चांकी तापमान नोंदवले जाण्याची शक्यता आहे. दुसर्‍या बाजुला पाणीटंचाईचे सावट निर्माण होण्याचीही शक्यता आहे. खरे तर गेल्या वर्षी राज्याच्या बहुतांश भागात पावसाने बर्‍यापैकी हजेरी लावली. त्या अगोदरच राज्याने मागील दोन वर्ष सलग दुष्काळ अनुभवला आहे. त्यातून गेल्या वर्षीच्या समाधानकारक पावसाने दिलासा दिला असला तरी अलीकडेच झालेल्या गारपिटीने शेतकरीवर्गाला पुन्हा नुकसानीला तोंड द्यावे लागले आहे. अजुनही अधूनमधून गारपीट होतच आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामासाठी लागवड करण्यात आलेली पिके अडचणीत येत आहेत. त्यात असह्य उन्हाळा आणि पाणीटंचाईच्या सावटाची शक्यता यामुळे शेतकरीवर्ग पुरता हवालदिल झाला आहे. यावेळच्या पावसाच्या अंदाजानुसार दक्षिण आशियाच्या निम्म्याहून अधिक भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामध्ये पश्‍चिम, मध्य आणि नैऋत्य भागाचा समावेश आहे. यात संपूर्ण मध्य भारत, पश्‍चिम भारत, दक्षिण भारत आणि उत्तर भारत या भागांचा समावेश होतो. उरलेल्या भागात सरासरीइतका पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. मात्र, संपूर्ण दक्षिण आशियात कोठेही सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता नसल्याचे या अंदाजावरून स्पष्ट होत आहे. अलीकडे जागतिक तापमानवाढ, हवामानबदल याचेही दुष्परिणाम सातत्याने समोर येऊ लागले आहेत.घटते पर्ज्यन्यमान हा याचाच परिणाम असावा का असाही प्रश्‍न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. त्याचबरोबर आणखी एक बाब म्हणजे पाऊस वेळेवर सुरू झाला तरी तो किती टिकेल, अपेक्षित वेळेत त्या त्या ठिकाणी होेईल का हे ही प्रश्‍न सार्‍यांना सतावत असतात. यावेळी जवळपास सर्वच भागात उन्हाचा जोरदार तडाखा जाणवत आहे. मे महिन्यात तर मोठी कठीण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. वाढते तापमान माणसांसाठी असह्य ठरतेच परंतु पशू-पक्षी, वन्य जीव यांनाही असह्य तापमानाचा बराच त्रास होतो. त्यात पाणीटंचाई असेल तर बिचारी तहानेने व्याकुळ होऊन, तडङ्गडत प्राण सोडतात. अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आतापासूनच पावले टाकावी लागणार आहेत. आणखी एक बाब म्हणजे तापमान वाढेल तेवढा बाष्पीभवनाचा वेगही वाढणार आहे. त्यामुळे विविध पाटबंधारे प्रकल्पांमधील पाणीसाठा वेगाने कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाल्यास पाणीटंचाईचे सावट आणखी गंभीर होईल. याचा विचार करून आतापासूनच बाष्पीभवनाचा वेग रोखण्यासाठी किंवा बाष्पीभवनामुळे पाणीसाठा मोठ्या प्रमाणावर कमी होऊ नये यासाठी उपायोजना कराव्या लागणार आहेत. या सार्‍या बाबींचा विचार करता काही निश्‍चित धोरणे आखली आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी झाली तर अपुर्‍या पावसाच्या संकटावर मात करणे शक्य होईल. भारतीय अर्थव्यवस्थेत शेती उत्पादन क्षेत्र आणि रोजगार या दोन्ही गोष्टी आजही महत्त्वाच्या आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात बर्‍यापैकी प्रयत्न केल्यामुळे शेतीचे किमान क्षेत्र  ३५ ते ४० टक्क्यांपर्यंत वाढले. परंतु आजही  ६० टक्के शेती पर्ज्यन्यकोषित आहे. म्हणजेच मान्सूनच्या लहरीवर, पाऊस कमी-जास्त होण्याबरोबर ६० टक्के शेतीचे उत्पादन अनिश्‍चित अथवा अस्थिर होते. या पार्श्‍वभूमीवर साधारणपणे या काळात हवामान खात्याकडून, येणार्‍या वर्षासाठी पाऊसपाण्याचे अंदाज व्यक्त केले जातात. त्याचे महत्त्व अर्थकारण, राजकारण आणि समाजजीवन या सर्वांसाठी मोठे असते. ते लक्षात घेता यावेळी भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) नुकतेच प्रसिध्द केलेले हवामानाचे अंदाज सर्वसामान्य नागरिकाच्या मनात भीतीची भावना निर्माण करणारे आहेत. या अंदाजाप्रमाणे या वर्षी दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण पाच टक्क्यांनी कमी राहणार आहे. म्हणजेच यावर्षी ९५ टक्के पाऊस  पडेल असा अंदाज आहे. सामान्यत: हवामानखात्याच्या शास्त्राप्रमाणे दीर्घकालीन सरासरीच्या ११० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस पडतो तेव्हा तो अतरिक्त मानला जातो आणि त्याची शक्यता ङ्गक्त एक टक्का असते. हेच प्रमाण १०४ ते ११० टक्के असते तेव्हा त्याला सरासरीपेक्षा अधिक पाऊस असे म्हटले जाते आणि याची शक्यता आठ टक्के असते. दीर्घकालीन सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस झाल्यास त्याला सर्वसाधारण पाऊसमान म्हटले जाते आणि त्याची शक्यता ३५ टक्के असते.९६ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्यास सरासरीपेक्षा कमी मानला जातो आणि त्याची शक्यता ३३ टक्के असते. ९० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडल्यास त्याला तुटीचा पाऊसकाळ असे म्हटले जाते. या पार्श्‍वभूमीवर भारतीय हवामान खात्याच्या यंदाच्या अंदाजाप्रमाणे सर्वसाधारण सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता ३३ टक्के तर तुटीचा पाऊस पडण्याची शक्यता २३ टक्के आहे.साधारण पाऊस पडण्याची शक्यता ३५ टक्के आहे. थोडक्यात, येत्या हंगामात गरजेपेक्षा कमी पाऊस पडणार असे विधान करता येईल. नेहमीच्या अनुभवाप्रमाणे जून ते सप्टेंबरच्या काळात भारतातील सरासरी पाऊस परिस्थिती ८९ सेंटीमीटर असते. त्यामध्ये घट होण्याची शक्यता वाटते. त्यामुळे आता निवडणुकीचा हंगाम संपताच अनेक संकटांचा मुकाबला करण्याची तयारी शेतकर्‍यांनी व शहरी भागातील जनतेने ठेवली पाहिजे.
--------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel