-->
विजय मल्या गोत्यात

विजय मल्या गोत्यात

संपादकीय पान गुरुवार दि. १० मार्च २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
विजय मल्या गोत्यात
किंगफिशर एअरलाइन्सचे सर्वेसर्वा माजी खासदार, उद्योगपती विजय मल्या हे कर्जबुडीत प्रकरणी गोत्यात आले असून यांना देश सोडून जाण्यापासून रोखण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इतर बँकांनी ही याचिका केली आहे. एसबीआयने याचिकेत विजय मल्या यांचा पासपोर्ट जप्त करण्याची व त्यांची संपत्ती जाहीर करण्याची मागणी केली आहे. मल्या यांच्या किंगफिशर एअरलाईन्ससाठी स्टेट बँकेसह १७ बँकांनी कर्ज दिले होते. या सर्व बँकांचे मिळून तब्बल ७ हजार करोड रुपये किंगफिशर एअरलाईन्सने थकवले आहेत. त्याशिवाय कर्मचार्‍यांचे पगार व अन्य देणी वेगळी आहेत. सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर तात्काळ सुनावणी करण्यास संमती दर्शवली आहे. विजय मल्या देश सोडून गेल्यास त्यांना पुन्हा पकडणे कठीण होईल असं ऍटर्नी जनरल यांनी न्यायालयात सांगितले आहे. विजय मल्या यांनी आपली मद्यनिर्मिती कंपनी यु.बी. ब्रुवरेज ही दियाजियोला विकल्यात जमा आहे. दियाजियोकडून ५१५ कोटींची डील झाल्यानंतर विजय माल्या यांनी युकेमध्ये स्थायिक होण्याचे संकेत दिले आहेत. सक्तवसुली संचालनालयाने यापूर्वीच मल्यांविरोधात आर्थिक अफरातफरीचा गुन्हा दाखल केला आहे. बँकांकडून कर्ज म्हणून घेण्यात आलेला पैसा विदेशामध्ये धाडण्यात आला का या अंगाने सक्तवसुली संचालनालय चौकशी करण्याची शक्यता आहे. बंद झालेली किंगफिशर एअरलाइन्स आणि युनायटेड स्पिरिट्स या आघाडीच्या मद्यनिर्मिती कंपनीच्या नावे सार्वजनिक बँकांकडून हजारो कोटी रुपयांची कर्जे घेऊन ती चुकती न करण्यामुळे उद्योगपती विजय माल्या यांना सोमवारी स्वतंत्र प्रकरणांत दोन दणके मिळाले. गेल्या महिन्यात लंडनमधील दियाजियो उद्योगसमुहासोबत झालेल्या समझोत्यानुसार माल्यांना मिळणार असलेल्या रकमेवर बेंगळुरु येथील कर्ज वसुली न्यायाधिकरणाने तात्पुरती टाच आणली. तर दुसरीकडे आयडीबीआय बँकेचे सुमारे ९०० कोटी रुपयांचे कर्ज बुजविल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) माल्या यांच्याविरुद्ध मनी लॉड्रिंगचा खटला दाखल केला. कारण असा आरोप केला जात आहे की, मल्या यांनी कर्ज म्हणून घेतलेला पैसा कंपन्यासाठी न वापरता विदेशात हस्तांतरीत केला. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी मिळून किंगफिशर एअरलाइन्सला दिलेले ७,८०० कोटी रुपयांचे कर्ज जानेवारी २०१२ पासून थकित आहे. माल्या यांना कर्जबुडवे म्हणून जाहीर केल्यानंतर या कर्जाच्या वसुलीसाठी स्टेट बँकेने गेल्या महिन्यात दावाही दाखल केला होता. खरे तर ही कारवाई बँकांनी उशीरा सुरु केली आहे. माल्या यांची युनायटेड स्पिरिट्‌स ही कंपनी आता ब्रिटनच्या दियाजिया उद्योगसमुहाने ताब्यात घेतली आहे. त्यासंदर्भात दियाजियासोबत झालेल्या समझोत्यानुसार माल्या यांनी युनायटेड स्पिरिट्‌स कंपनीच्या चेअरमन पदावरून पायउतार व्हायचे व त्याबदल्यात दियाजियोने त्यांना ७५ दशलक्ष डॉलर द्यायचे असे ठरले होते. आमच्या बुडित कर्जाचे प्रकरण मिटेपर्यंत माल्यांना दिएगोकडून ही रक्कम मिळणे रोखावे, असा अर्ज स्टेट बँकेने केला होता. त्यावर कर्ज वसुली न्यायाधिकरणाने मल्यांना पैसे देण्यास दियाजियाला तात्पुरती मनाई केली व पुढील सुनावणी २८ मार्च रोजी ठेवली. दुसर्‍या प्रकरणात आयडीबीआय बँकेकडून घेतलेले ९०० कोटी रुपयांचे कर्ज बुडविल्याच्या संदर्भात सक्तवसुली संचालनालयाने मद्यसम्राट विजय माल्या आणि इतरांविरुद्ध मनी लॉंड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने गेल्या वर्षी कर्ज थकविल्याच्या आरोपात एफआयआर दाखल केला होता. आता त्याच एफआयआरच्या आधारावर ईडीने माल्या व इतरांविरुद्ध मनी लॉंडरिंग प्रतिबंधात्मक कायद्याअंतर्गत नुकताच गुन्हा दाखल केला. ईडीच्या मुंबईतील क्षेत्रीय कार्यालयाने हा गुन्हा दाखल केलेला असला तरी सीबीआयचे अधिकारी बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाईन्सच्या आर्थिक संरचनेचा तपास करीत आहेत तसेच विदेश चलन कायद्याचे उल्लंघन केल्याच्या संदर्भातही स्वतंत्र चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. यासाठी माल्या आणि त्यांच्या कंपनीच्या अधिकार्‍यांना चौकशीसाठी बोलावण्यात येईल. अर्थात विजय मल्यांसारखे अनेक सुटाबुटातले चोर आपल्या समाजात वावरत आहेत. मात्र त्यांना राजकीय अभय लाभत असल्यानेच त्यंना कर्जेही मिळतात व त्यांची कर्जबुडविण्याची हिंमत होते. विजय मल्यांची एैश खुलेआम चालताना दिसते मात्र कर्जाचा हाप्ता ते फडण्यासाठी टाळाटाळ करतात त्यामुळे त्यांच्या विरोधात जनमत तयार झाले. हे मल्यामहाशय तर राज्यसभेचे खासदारही होते. त्यामुळे ते केवळ उद्योगपतीच नाहीत तर ते लोकप्रतिनिधी म्हणूनही मिरविण्यात धन्यता पावतात. अशा लोकांनी खरे तर आपल्या कर्जांची परफेड करताना तत्परता दाखविली पाहिजे. परंतु मल्या हे नेमके उलटे वागत आहेत. अशांना जेलची हवा दाखविणे ही सरकारची जबाबदारीच आहे.
----------------------------------------------------------------------------

0 Response to "विजय मल्या गोत्यात"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel