-->
पवारांचा पुस्तकबॉम्ब

पवारांचा पुस्तकबॉम्ब

संपादकीय पान मंगळवार दि. १५ डिसेंबर २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
पवारांचा पुस्तकबॉम्ब
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा, देशाचे माजी संरक्षणमंत्री, माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी आपल्या पंच्याहत्तरीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लाईफ ऑन माय टर्म्स फ्रॉम ग्रासरुट अँड कॉरिडॉर ऑफ पॉवर हे पुस्तक लिहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते कॉँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला दिल्लीत उपस्थित होत्या. शरद पवार हे पुस्तकप्रेमी राजकारणी म्हणून ओळखले जातात. त्यांचे वाचनही अफाट आहे. आपल्या बिझी राजकीय जीवनातून ते वेळात वेळ काढून पुस्तके वाचीत असतात. ज्या प्रकारे ते आपल्या पक्षाच्या तालुकापातळीवरील कार्यकर्त्यास नावाने ओळखतात त्याप्रमाणे कोणत्या लेखकाची कोणती पुस्तके आहेत व त्या लेखकाचे वैशिष्ट्य काय हे ते सहजरित्या सांगू शकतात. त्यांच्या या पुस्तकप्रेमामुळेच त्यांना शब्द हे एखाद्या बॉम्बगोळ्यापेक्षा किती प्रभावी ठरु शकतात याची पूर्ण कल्पना आहे. अपेक्षेप्रमाणे त्यांचे हे पुस्तक बॉम्ब ठरले आहे. आपल्या ५० वर्षातील राजकीय प्रवासात २५ वर्षे राज्यात व त्यानंतरची २५ वर्षे केंद्रात त्यांनी अनेक जबाबदारीची पदे सांभाळली आहेत. अनेक राजकीय घटनांचे व पडद्याआड झालेल्या अनेक घटनांचे ते साक्षीदार आहेत. अनेकदा मूकपणे तर कधी उघडपणाने बोलून त्यांनी अनेक बाबी उघड केल्या आहेत. परंतु या पुस्तकात पवारसाहेब काही तरी नवा गॉसिपचा खजिना उघड करणार हे सर्वांनाच माहित होते आणि तसेच झाले. सध्याचे सरकार सत्तेत येण्यापूर्वी कॉँग्रसेच्या सहकार्याने असलेल्या सरकारमध्ये दहा वर्षे ते सहभागी होते. त्यावेळी त्यांनी संरक्षण, कृषी या खात्याची मंत्रीपदे भूषविली. त्यावेळी आघाडीचे सरकार असूनही पवारांचे प्रत्येक बाबतीत काही कॉँग्रेसशी जमत होते असेच नाही, हे आता काही गुपीत राहिलेले नाही. या पार्श्‍वभूमीवर त्यांनी पंतप्रधांनांपेक्षाही सोनिया गांधी या सुपर होत्या, असे म्हटले आहे. थोडक्यात म्हणजे त्यांना असे म्हणावयाचे आहे की, सोनियांच्या हाती रिमोट कंट्रोल होता. अर्थातच अशा प्रकारचे रिमोट कंट्रोल हे प्रत्येक सरकारमध्य असतातच. बाळासाहेब ठाकरे तर उघडपणाने म्हणावयाचे की, शिवसेनेच्या सरकारचा रिमोट कंट्रोल माझ्या हाती आहे. सध्याचे भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारचा रिमोट कंट्रोल हा राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आहे. सध्या तर अनेक खात्यात संघाने आपली माणसे अधिकृतरित्या पेरुन त्यांना अधिकार देऊन त्या खात्याचे कामकाज कसे चालेल हे पाहिले जात आहे. अर्थात अशा प्रकारच्या रिमोट कंट्रोलबाबत कुणी बोलत नाही त्याचे दुदैव वाटते. सोनिया गांधी यांना स्वतंत्र विचाराचा पंतप्रधान नको होता असा एक स्फोट पवारांनी या पुस्तकात केला आहे. एक बाब स्पष्टच आहे की, शरद पवार हे स्वतंत्र विचाराचे आहेत, कॉँग्रेसच्या नेतृत्वाचे प्रत्येक बाबतीत त्यांनी एैकलेही नसते. त्यामुळे अशा वेळी शरद पवारांना कॉँग्रेस अध्यक्ष पंतप्रधान करणार नव्हते, त्यामुळे पवारांनीही तशी अपेक्षा ठेवणे चुकीचे होते. पवारांनाही आपल्यामागे किती खासदार आहेत आपण किती खासदार निवडून आणू शकतो याची पूर्ण कल्पना होती. त्यामुळे एकीकडे आपल्या मर्यादा ओळखून असलेले शरद पवार आपल्या कॉँग्रेस पंतप्रधान करतील या भ्रमात नव्हते. एका अपवादात्मक परिस्थितीत देवेगौडा पंतप्रधान झाले म्हणून पवार होतीलच असे नाही. शरदरावांकडे आर्थिक पाठबळ होते, उद्योगपतींची लॉबी त्यांच्या मागे होती, वेळ पडल्यास डावे-उजवे पक्षही त्यांच्या बाजूने उभे राहू शकले असते तरीही त्यांना नशिबाने साथ न दिल्याने ते पंतप्रधान होऊ शकले नाहीत. परंतु राजकीय व्यक्तीचे काहीच सांगता येत नाही. दिल्लीत शरद पवारांची ओळख ही लंबे रेस का घोडा अशी असल्यामुळे पुढील चार वर्षानंतरही त्यांचा क्रमांक लागू शकतो. पी.व्ही. नरसिंहराव यांनी ९१ साली लोकसभेची निवडणूक लढविली नव्हती. निवडणुकीनंतर राजकारणातून निवृत होण्याचा त्यांचा विचार होता. त्यावेळी राजीव गांधींची हत्या झाली व त्यांच्याकडे पंतप्रधानपद चालत आले. काय कुणास ठाऊक पवारांकडे अशाच प्रकारे पंतप्रधानपद चालत येऊ शकते. पवारांनी आणखी एक महत्वाचा मुद्दा या पुस्तकात मांडला आहे तो म्हणजे, युपीएच्या शेवटच्या तीन वर्षात सरकार दुबळे झाले होते. हे तर खरेच आहे. सलग दहा वर्षे सत्तेत राहाण्याची संधी मिळाल्यामुळे कॉँग्रेस पक्षात व त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये एकप्रकारचे शैथील्य आले होते. सरकारवर अनेक आरोप होत होते, परंतु त्या आरोपांचे उत्तर देण्यास सरकार असमर्थ ठरत होते. पवारांच्या पुस्तकबॉम्बमध्ये अनेक वस्तुस्थिती दर्शक बाबी सांगण्यात आल्या आहेत. यातील अनेक गोष्टी सर्व पक्षांनी गृहीतच धरलेल्या आहेत. त्यामुळे पवारांच्या या बॉम्बमुळे त्यांचे फारसे भविष्यातील राजकीय नुकसान होणार नाही.
------------------------------------------------------------------------  

0 Response to "पवारांचा पुस्तकबॉम्ब"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel