-->
रेल्वेमंत्र्यांचा दिलासा

रेल्वेमंत्र्यांचा दिलासा

संपादकीय पान सोमवार दि. २३ मे २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
रेल्वेमंत्र्यांचा दिलासा
प्रवासी सुरक्षेचे कारण देऊन नेरळ-माथेरान ही सेवा रेल्वेने बंद केल्यानंतर उमटलेल्या तीव्र निषेधाची दखल घेत आता किमान अमन लॉज ते माथेरान ही सेवा चालू ठेवण्याचा निर्णय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी घेतला. त्याबद्दल त्यांचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत. ब्रिटीशांनी स्थापन केलेली ही रेल्वे माथेरानचे आकर्षण आहे व ही या पर्यटनस्थाळाची शान आहे. ही गाडी अपघाताचे कारण देऊन बंद करण्याचे कारस्थान रचले जात होता. त्याबद्दल माथेरानची गाडी चालूच ठेवावी, अशी मागणी करण्यासाठी माथेरानमधून एक शिष्टमंडळ रेल्वेमंत्र्यांच्या भेटीला गेले होते. या भेटी दरम्यान रेल्वेमंत्र्यांनी हा निर्णय घेत त्याची अंमलबजावणी लवकर करावी, अशा सूचनाही मध्य रेल्वेला केल्या आहेत. नेरळ-माथेरान सेवा ही अत्यंत जुनी सेवा असून त्याचे तंत्रज्ञान कालबाह्य झाले आहे. त्यामुळे प्रवासी सुरक्षेला धोका असल्याचे कारण देत गेल्या पंधरवडयात मध्य रेल्वेने ही सेवा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला. या मार्गावर अमन लॉजदरम्यान गाडीचे डबे दोन वेळा घसरल्याचे निमित्त झाल्याने हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र या निर्णयाला स्थानिकांनी कडाडून विरोध केला होता. ही रेल्वे कोणत्याही परिस्थितीत बंद पडू देणार नाही, अशी ग्वाही रेल्वेमंत्री प्रभू यांनी देत तातडीने अमन लॉज ते माथेरान यांदरम्यानची सेवा सुरू करण्याचे आदेश मध्य रेल्वेला दिले आहेत. आता या दरम्यान एका ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याचे काम मध्य रेल्वे हाती घेणार आहे. ही भिंत ६५० मीटर लांबीची असेल. त्याचप्रमाणे या दोन स्थानकांदरम्यान गाडी चालवण्यासाठी मध्य रेल्वे तीन इंजिने आणि दहा डबे यांचीही तयारी मध्य रेल्वे करत आहे. त्यानंतर लवकरात लवकर ही गाडी सुरू करण्यात येईल, असे मध्य रेल्वेतर्फे स्पष्ट करण्यात आले. रायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या या पर्यटन ठिकाणाचा शोध ब्रिटीशांनी लावला व तेथे त्यांनी ज्याण्यासाठी रेल्वे उभारली. अनेकदा पावसात या रेल्वेचे रुळ वाहूनही गेले आहेत. मात्र ते दुरुस्त करुन पुन्हा सुरु करण्यात रेल्वेला यश आले आहे. आता मात्र येथे रोपवे उभारण्याचे घटत आहे त्यामुळे रेल्वे बंद करण्याच्या हालचाली होत आहेत, असे उघड झाले होते. येथे रोपवे जरुर उभारावा. त्याला विरोध करण्याचे कारण नाही. मात्र येथील शान असलेली रेल्वे बंद करणे चुकीचे आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ही रेल्वे सुरु करण्याचे दिलेल्या आश्‍वासनानंतर अनेकांना हायसे वाटले आहे. माथेरानचा श्‍वास ही रेल्वे आहे, व तो श्‍वास दाबण्याचा केलेला प्रयत्न रेल्वेमंत्र्यानी उडवून लावल्याबद्दल त्यांचे अभिनंदन.
-----------------------------------------------------------------

0 Response to "रेल्वेमंत्र्यांचा दिलासा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel