-->
लढाऊ शेतकरी नेता

लढाऊ शेतकरी नेता

संपादकीय पान सोमवार दि. १४ डिसेंबर २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
लढाऊ शेतकरी नेता
शेतकर्‍यांच्या हक्कांसाठी संपूर्ण आयुष्य वेचणारे शेतकरी संघटनेचे संस्थापक व नेते शरद जोशी यांचे शनिवारी सकाळी पुण्यातील राहत्या घरी ८१व्या वर्षी निधन झाले. ८०च्या दशकातील शेतकर्‍यांची आंदोलने म्हटली म्हणजे शरद जोशी त्यांची शेतकरी संघटना व त्यांच्या आंदोलनाचा दरारा डोळ्यापुढे येतो. त्यापूर्वी शेतकर्‍यांच्या चळवळी अनेक झाल्या. शेतकर्‍यांना चांगली दरवाढ मिळावी यासाठी अनेक आंदोलने केली. मात्र शरद जोशी यांनी शेतकर्‍यांची चळवळ मोठ्या जोमाने उभारली आणि बहुतांशी यशस्वीदेखील केली. कांदा हा नेहमीच उत्पादकाच्या व खरेदीदाराच्या डोळ्यात पाणी आणतो. परंतु त्यांना योग्य दर मिळावा व हा शेतकरी सुखी व्हावा यासाठी त्यांनी मोठे आंदोलन उभारले. त्यासाठी त्यांना योग्य वेळ निवडली. परिणामी त्यांचे कांदा शेतकर्‍यांचे आंदोलन यशस्वी झाले. यातून त्यांनी कापूस, ऊस या व अन्य शेतकर्‍यांना संघटीत करण्यास प्रारंभ केला. शेतकर्‍यांना योग्य दर मिळाला पाहिजे, अन्यथा तो देशोधडीला लागेल अशी त्यांनी त्यावेळी भूमीका घेतली व संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढला. आज त्यांच्या आंदोलनाला तीन दशकाहून जास्त काळ लोटला असला तरी शेतकर्‍यांना रास्त भाव मिळण्याचा प्रश्‍न काही सुटलेला नाही. त्यामुळे त्याकाळी शरद जोशी यांनी शेतकर्‍यांच्या या प्रश्‍नाचा अभ्यास करुन जे आंदोलन उभारले ते प्रश्‍न आजही जीवंत राहावेत याचे आश्‍चर्य वाटते. शेतकर्‍यांसाठी दोन दशके आंदोलने केल्यावर त्यांना जाणवू लागले की, खर्‍या अर्थाने जर शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवायचे असतील तर त्यासाठी राजकीय मार्ग अवलंबिला पाहिजे. शेतकरी संघटनेच्या स्थापनेपासून अखेरपर्यंत त्यांनी शेतकर्‍यांचा आर्थिक विकास व्हावा, त्यांना हक्क मिळावा यासाठी विविध आंदोलनांच्या माध्यमातून राज्यकर्त्यांना दखल घ्यायला वारंवार भाग पाडले होते. परंतु त्यांनी नंतर स्वतंत्र भारत पक्ष या राजकीय पक्षाची स्थापना केली. २००४ ते २०१० या कालावधीमध्ये राज्यसभेवर खासदार म्हणून त्यांची वर्णी लागली. त्या काळातही सातत्याने शेतकर्‍यांच्या प्रश्नांना तोंड फोडण्याचे काम केले. संसदेत शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर आवाज उठविला. सातार्‍यासारख्या एक लहान शहरात १९३५ साली जन्मलेल्या शरद जोशींनी आपले करिअर विविध क्षेत्रात गाजविले हे एक त्यांचे वैशिष्ट्य. शरद जोशी यांचे प्राथमिक शिक्षण बेळगावात तर माध्यमिक शिक्षण मुंबईत विलेपार्ले येथे झाले. १९५५ मध्ये मुंबईतून त्यांनी बी.कॉम ची पदवी मिळविल्यावर १९५७ मध्ये एम कॉम पूर्ण केले. बँकिंग विषयासाठी त्यांना त्याकाळचे प्रतिष्ठीत असणारे सी रँडी सुवर्णपदकही मिळाले होते. १९५८ मध्ये त्यांनी भारतीय टपाल सेवेची परीक्षाही उत्तीर्ण केली होती. एम. कॉम पूर्ण केल्यानंतर त्यांनी कॉमर्स कॉलेज, कोल्हापूर येथे अर्थशास्त्र व संख्याशास्त्र विषयाचे व्याख्याता म्हणून काम केले. त्यांनंतर भारतीय टपाल सेवेमध्ये सुमारे दहा वर्षे ते पहिल्या दर्जाचे अधिकारी म्हणून कार्यरत होते. पण हे सर्व करत असताना शेतकर्‍यांचे प्रश्न त्यांना खुणावू लागले होते. सुरुवातीला त्यांनी शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर लिखाण करण्यास सुरुवात केली. विविध वर्तमानपत्रांमधून ते शेतकर्यांच्या समस्यांवर स्तंभलेखन करायचे. पण एवढ्याने भागणार नाही, हे लक्षात आल्याने त्यांनी १९७९ मध्ये शेतकरी संघटनेची स्थापना केली. ९ ऑगस्ट रोजी चाकणमध्ये त्यांनी संघटनेचे कामकाज सुरू केले. संघटना सुरू झाल्यापासून शेतमालास रास्त भाव या एक कलमी कार्यक्रमासाठी कांदा,उस, तंबाखू, दूध, भात, कापूस, इत्यादी पिकांच्या शेतकरी आंदोलनाचे नेत्वृत्व त्यांनी केले. त्यासाठी त्यांना वारंवार उपोषणे, तुरुंगवास, मेळावे, प्रशिक्षण शिबिरे, अधिवेशने करावी लागली. एक लढवय्ये शेतकरी नेते म्हणून ते ८० ते ९०च्या दशकात पुढे आले. त्याकाळी लढावू कामगार नेते म्हणून डॉ. दत्ता सामंत हे शहरी भागात गाजत होते तर ग्रामीण भागात शेतकर्‍यांचे नेते म्हणून शरद जोशी अग्रक्रमाने होते. त्यांच्या शेतकर्‍यांना रास्त भाव मिळवून देण्याचे आंदोलन यशस्वी झाल्याने त्यांची किर्ती देशभर पसरली. महाराष्ट्रासह पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, गुजराथ, राजस्थान, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, इत्यादी राज्यात शेतकरी आंदोलने सुरू केली. संघटनेचे काम राज्यापुरते मर्यादीत न ठेवता देशभरात त्याचा विस्तार करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी देशभरातील शेतकर्‍यांच्या अ-राजकीय संघटनांच्या समन्वय समितीची स्थापना केली. मात्र काळाच्या ओघात राजकारण नको म्हणणारे शरद जोशी हे राजकारणात ओढले गेलेच. मात्र त्यामुळे त्यांच्या लढाऊ नेतृत्वाची धार कमी झाली. त्यानंतर त्यांच्या आंदोलनालाही ओहटी लागली. मात्र शेतकर्‍यांचे लढाऊ नेते ही त्यांची प्रतिमा कायम राहिली ती शेवटपर्यंत.
-----------------------------------------------------------

0 Response to "लढाऊ शेतकरी नेता"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel