-->
सोने पे सुहागा

सोने पे सुहागा

संपादकीय पान शनिवार दि. ०७ नोव्हेंेबर २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
सोने पे सुहागा
प्रत्यक्ष सोने खरेदीला उपाय म्हणून सुवर्ण रोखे योजना तर देशातील घराघरांमध्ये पडून राहिलेला सोन्याचा साठा चलनात आणण्यासाठी सुवर्ण ठेव योजना सादर करण्यात आली आहे. त्यासोबतच सरकारने अशोक चक्राचे चिन्ह असलेली नाणी सादर केली आहेत. लवकरच ही नाणी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. या तीन योजनांना सोने पे सुहागा अशी उपमा देत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सादर झालेल्या सुवर्ण योजना देशातील नागरिकांना फायदेशीर ठरतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला. देशात दरवर्षी १००० टन सोन्याची आयात केली जाते. खनिज तेलानंतर सोने आयात करण्यात येणारा दुसरा सर्वात मोठा घटक आहे. त्यामुळे आयातीवरील खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. सोन्याच्या आयातीमुळे २०१३ मध्ये भारताची वित्तीय तूट १९० अब्ज डॉलर या उच्चांकी पातळीला पोचली होती. यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने या महत्त्वाकांशी योजनेला सुरूवात केली आहे. प्रत्यक्ष सोने खरेदीला पर्याय म्हणून सरकारने आता सुवर्ण रोखे योजना सादर केली आहे. हे सुवर्ण रोखे येत्या ५ ते २० नोव्हेंबरदरम्यान प्रति ग्रॅम २,६८४ रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सरकारतर्फे हे बॉंड्‌स आणले जाणार असून, यावर ग्राहकांना २.७५ टक्के व्याज मिळणार आहे. हे रोखे २६ नोव्हेंबरला ग्राहकांना हस्तांतरित करण्यात येतील. बँका आणि टपाल खात्याच्या ठराविक कार्यालयात रोखे विक्रीसाठी ठेवले जाणार आहेत. रोख्यांची मुदत आठ वर्षांची असून, पाच वर्षांनंतर यातून गुंतवणूकदारांना बाहेर पडण्याचा पर्याय उपलब्ध आहे. आधीच्या आठवड्यातील सोन्याच्या सरासरी बाजारभावानुसार या रोख्यांची किंमत ठरविली जाणार आहे. तसेच, या रोख्यांची विक्री करतानादेखील याचप्रकारे किंमत निश्‍चित केली जाणार आहे. सोन्याच्या बॉंडवरील व्याज करपात्र असेल. सुवर्ण ठेव योजनेमुळे बँकेत सोने ठेवल्यानंतर त्यावर व्याज मिळणार आहे. देशातील सोन्याची मागणी आणि आयात आटोक्यात आणण्यासाठी ही योजना सादर करण्यात आली आहे. देशातील नागरिकांकडे विविध संस्थांकडे सुमारे ६० लाख कोटी रुपये मूल्याचा सोन्याचा साठा पडून आहे. हा साठा चलनात आणण्यासाठी सरकारने सुवर्ण ठेव योजना आणली आहे. गेल्या तीन वर्षात सोन्याच्या किंमती घसरतच आहेत. अजूनही सोने किती उतरेल याचा सध्या तरी अंदाज बांधणे कठीण असले तरीही सद्या तरी सोन्याच्या किंमती वधारणार नाहीत हे नक्की. सोन्यामध्ये दर दहा वर्षांनी किंमतींची वध-घट होत असते. परंतु गेल्या चार दशकांचा विचार करता सोन्याची सध्या झालेली घसरण ही जरा जास्तच आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमती पुढे वाढणारच नाही असे म्हणणे चुकीचे ठरेल. अर्थात आपल्याकडे सोन्याचे ग्राहक एवढे निष्ठावान आहेत की, सद्या सोन्याच्या किंमती उतरलेल्या असल्याने ग्राहकांची संख्या वाढली आहे. त्यावरुन सोन्याच्या खरेदीदारांच्या विश्‍वासाला काही तडा गेलेली नाही हे नक्की. गेल्या वर्षी लोकांनी सोने खरेदी कमी करावे यासाठी सरकारने जाणूनबूजून प्रयत्न केले. त्या प्रयत्नाला यश आलेले नाही. सोने खरेदीचे वेड आपल्याकडे पूर्वापार चालत आलेले आहे. त्यापेक्षाही सोने खरेदी ही कोणत्याही वर्गातील व्यक्तीसाठी फार सुलभ ठरतेे. यामागचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे सोन्याची खरेदी व विक्री आपण कुठेही व केव्हांही करु शकतो. म्हणजे एखाद्याला खेडेगावतही अचानक पैशाची गरज लागल्यास तो आपल्या घरातील पदरी असलेले सोने विक्रीस काढून आपली गरज भागवू शकतो. सोन्याच्या या बाजारातील तरलतेमुळे सोन्यातील गुंतवणूक ही सर्वात फायदेशीर ठरते. तसेच सोन्यातील गुंतवणुकीवर आजवर सतत लाभ वाढतच गेले आहेत. काही अपवादात्मक वर्ष वगळता दरवर्षी सोन्याच्या किंमती वाढतच गेल्याने सोन्यातील गुंतवणूक ही लाभदायक ठरते. जरी सोन्याची खरेदी आपल्या लाभासाठी करीत असलो तरीही सोने खरेदीमुळे देशाच्या तिजोरीवर मात्र भार पडत असतो. कारण सोने आपल्याला आयात करावे लागतेे. त्यामुळे देशाचे अमूल्य परकीय चलन आपल्याला खर्च करण्यशिवाय अन्य काही मार्ग शिल्लक राहात नाही. भारतातील खरेदी ही जगात सर्वाधिक असली तरीही सोन्याच्या किमती आंतरराष्ट्रीय पातळीवर म्हणजे लंडनच्या सोने-चांदी बाजारात ठरतात. त्यामुळे सोन्याच्या किमतीमागे बर्‍याचदा आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडी मोठ्या प्रमाणावर कारणीभूत असतात. सोन्याची खरेदी कमी होऊन सध्या जे सोने घरी पडून आहे त्याचा विनियोग देशातील विकास कामांसाठी व्हावा यासाठी सरकारने हे रोखे आणले आहेत. आता याला जनता कसी प्रतिसाद देते ते पहायचे.
-----------------------------------------------------------------

0 Response to "सोने पे सुहागा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel