-->
बदलते हवामान

बदलते हवामान

संपादकीय पान गुरुवार दि. २८ मे २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
बदलते हवामान
देशातील केंद्र सरकारने एक वर्ष पूर्ण केले असताना राजकीय गरमागरमी असताना प्रत्यक्षात उष्णेतेचा पाराही जोरदार चढला आहे. देशाच्या बहुतांशी राज्यात उष्णतेची लाट पसरली असून आतापर्यंत उष्माघाताने ८५२ जणांचा बळी गेला आहे. मंगळवारी एकाच दिवसात २०७ जणांचा मृत्यू झाला आहे. विशेषत: आंध्र प्रदेश, तेलंगणला या उष्णतेच्या लाटेचा मोठा फटका बसला आहे. तेलंगण, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, हरियाणा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, ओदिशा, पश्चिम बंगाल आदी राज्यांमध्ये तापमानाचा पारा ४५ अंशाबाहेर गेला आहे. स्कायमेट या हवामानाचा अंदाज वर्तवणार्‍या खासगी संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ओदिशात सरासरी ४७ अंश, चंद्रापूर व वर्धा ४६.६ व ४६.५ अंश तापमान नोंदवले गेले. आंध्र प्रदेशात सोमवारपासून १४९ बळी गेले असून मृतांचा एकूण आकडा ५५१वर पोहोचला आहे. गुंटूर जिल्ह्यात १०४ बळी गेले आहेत, अशी माहिती आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे विशेष आयुक्त तुलसी राणी यांनी दिली. पूर्व गोदावरी जिल्ह्यात ९०, विझीनगारम ८४, विशाखापट्टणम ६१, प्रकासम ५७ बळी गेले आहेत. तेलंगणात एकाच दिवसात ५१ जणांचा बळी गेला असून मृतांची संख्या २६६वर गेली आहे. येते काही दिवस ही उष्णतेची लाट राज्यात राहणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. पाऊस आता अगदी जवळ येऊन ठेपला असताना देशातील प्रत्येक जिल्ह्यात लोकांची आंगाची लाहीलाही होत आहे. कधी एकदा पाऊस पडतो व हवेत थंडावा येतो असे प्रत्येकास वाटत आहे. समुद्रकिनारी असलेल्या भागात तर उष्मा अधिक वाढला आहे. उष्म्याची ही लाट अजून आठवडाभर चालेल असा अंदाज आहे. अंदमानात मान्सून दाखल झाला असताना श्रीलंकेत येऊन थांबला आहे. मान्सूनला पुढे ढकलण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण झालेली आहे मात्र अजूनही प्रत्यक्षात मान्सून यायला दोन तरी दिवस जातील. अंदमानात यंदा वेळेत मान्सून दाखल झालेला असला तरीही श्रीलंका त्याने पूर्णपणे व्यापलेली नाही. यंदा मान्सून केरळात ३० जूनलाच दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दक्षिण भारतात मान्सून दाखल झाल्यावर पुढच्या आठवड्याभरातच मुंबई व तिच्या आजूबाजूच्या किनारपट्टीवर पोहोचेल. त्यामुळे यंदा सात ते दहा जूनच्या दरम्यान मुंबईत पाऊस पोहोचेल असा अंदाज आहे. प्रत्यक्षात जोरात मान्सून सुरु व्हायला जून अखेर उजाडेल. तोपर्यंत पहिला पाऊस पडला तरीही मोठ्या प्रमाणात उष्मा जाणवेल. नेमका मान्सून सुरु होऊन स्थिरावे पर्यंत मान्सून किती लोकांचा जीव घेईल ते सांगणे कठीण आहे. एक मात्र बाब नक्की आहे की, गेल्या काही वर्षात निर्सगाचे हे चक्र बदलले आहे हे मात्र नक्की. गेल्या शंभर वर्षांचा इतिहास पाहिल्यास २०१४ हे गेले वर्ष सर्वात जास्त उष्म्याचे होते. पृथ्वीचे तापमान दरवर्षी धीम्या गतीने वाढत चालले आहे. गेल्या २० वर्षांपूर्वी ही बाब शास्त्रज्ञांच्या नजरेस आली होती. त्यावर मात करण्यासाठी त्यांनी अनेक उपाय सुचविलेही होते. परंतु त्याकडे वेळोवेळी दुर्लक्ष केल्याने आता ही भयानक परिस्थिती ओढावली आहे. गेले वर्ष हे शतकातील सर्वात उष्म्याचे वर्ष म्हणून ओळखले गेले असले तरी गेल्या वर्षांचा हा उचांक यंदा मोडला जाण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने शहरातील उष्मा सातत्याने वाढत असून भविष्यात सध्याच्या काळात शहरांमध्ये राहणे कठीण होत जाईल. गेल्या काही वर्षात आपल्याकडे औद्योगिकीकरण झपाट्याने वाढले त्याचबरोबर वृक्षतोड आपण मोठ्या प्रमाणात करतो. शहरात तर वृक्ष तोड करणे व नव्याने वृक्षलागवड न करणे ही बाब सर्रास झाल्याने त्याचे परिणाम वाढत्या उष्म्याच्या रुपाने भोगावे लागत आहेत. त्यामुळे भविष्यात या उष्माघातापासून वाचण्यासाठी शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर जलसाठ्याचे प्रमाण कसे वाढले याकडे लक्ष देणे, शहरातील इमारतींवर काचा व धातूंचा वापर कमीत कमी करणे हे काही उपाय करता येऊ शकतात. गेल्या काही वर्षातील वाढलेला उष्मा हा केवळ मोठ्या शहरातच नाही तर लहान व मध्यम आकाराच्या शहरातील स्थिती काही वेगळी नाही. याचे कारण म्हणजे आपला कल निसर्गाची संपत्ती फक्त लुटण्याकडे असतो. निसर्गाचे संवर्ध करण्यासाठी आपल्याकडे फारसा कुणी विचारच करीत नाही ही सर्वात मोठी दुदैवी बाब आहे. आता आपल्याला ओढ आहे ती पावसाची. मात्र पाऊस तोंडावर आलेला असताना आपण पावसाळ्याची तयारी काही पूर्ण केलेली नाही. अनेक रस्ते दरवर्षीप्रमाणे यंदाही खड्डेमय होतील. त्यातून ये-जा करताना अनेक व अपघात होतील. अशा रस्त्यंामुळे दरवर्षी अपघात होतात तसेच अनेकांच्या पाठीचे दुखणे जडते. परंतु या सरकारला व प्रशासनाला त्याचे काहीच देणेघेणे नाही. यावेळी मुंबई उच्च न्यायलयाने तर सरकारला चांगले रस्ते असणे हा नागरिकांचा हक्कच असल्याचे म्हटले आहे. परंतु या निकालावर सरकार विचार करुन कारवाई करेल का? व यंदातरी रस्ते चांगले पहायला मिळतील अशी अपेक्षा व्यक्त करु या. निसर्गाचे बदलते हवामान हा जसा चिंतेचा विषय आहे तसेच हे प्रशासन कधी जागे होणार हे देखील न सुटणारे कोडेच आहे.
-----------------------------------------------  

0 Response to "बदलते हवामान"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel