-->
कोकण रेल्वेला वेग

कोकण रेल्वेला वेग

संपादकीय पान बुधवार दि. ६ जानेवारी २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
कोकण रेल्वेला वेग
नवीन वर्षाला कोकणाला चांगले दिवस येण्याची चिन्हे दिसत आहेत. कोकण रेल्वेच्या मध्य रेल्वेच्या हद्दीतील दुहेरीकरणाचे काम यंदा पूर्ण होणार असून त्यामुळे या मार्गावरील गाडयांचा वेग अधिक वाढणार आहे. मध्य रेल्वेकडून रोहापर्यंत दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. पनवेल ते रोहा या टप्प्यातील कासू ते नागोठणे दरम्यानचे काम येत्या काही दिवसांत मार्गी लागेल. तर उर्वरित नागोठणे ते रोहा या १३ किलोमीटरच्या टप्प्याचे काम या वर्षाअखेरीस पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील मेल एक्स्प्रेस गाडयांच्या वेळेत १० ते १५ मिनिटांची बचत होणार आहे. सध्या या रेल्वेमार्गावरील पॅसेंजरला दिवा ते रोहा हे अंतर पार करण्यासाठी तीन तासांहून अधिक वेळ लागतो. तर एक्स्प्रेसना दोन तास लागतात. दुहेरीकरण पूर्ण झाल्यानंतर पॅसेंजरला तीन तासांपेक्षा कमी आणि एक्स्प्रेसना पावणे दोन तासांचा वेळ लागणार आहे. कोकण रेल्वेचे संपूर्ण दुहेरीकरण पूर्ण होण्यासाठी दहा वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. कोकण रेल्वेच्या एकेरी मार्गामुळे दक्षिणेकडे जाणार्‍या गाडयांना मार्ग देण्यासाठी कोकणातील गाडयांना कायमच क्रॉसिंगसाठी थांबवण्यात येते. त्यामुळे अनेकदा प्रवाशांचा अर्धा ते एक तास खोळंबा होतो. त्यामुळे प्रवाशांमध्ये कायमच नाराजी पसरते. यात पनवेल ते दिवा स्थानकांमध्ये होणारी रखडपट्टी अधिक आहे. दिवा ते पनवेल, पनवेल ते कासू या १०१ किलोमीटर टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. तर कासू ते नागोठणे (१३ किमी) लवकरच मार्गी लागणार आहे. मात्र नागोठणे ते रोहा याचे दुपरीकरण वर्षभरात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. यामुळे पॅसेंजर ट्रेनच्या वेळेत १० तर एक्स्प्रेस गाडयांच्या वेळेत १५ मिनिटांची होणार बचत होणार आहे. माल वाहतुकीचा वेग वाढणार आहे. तर प्रवाशांची खोळंब्यातून मुक्तता होऊ शकते. तर दिवा-रोहा शटल सेवेत वाढ होऊ शकते. दर्‍याखोर्‍यातून जाणारी ही रेल्वे उभारणे म्हणजे स्वप्नवतच एकेकाळी वाटत होते. याची दखल जगातील अनेक आघाडीच्या अभियंत्यांनीही घेेतली होती. परंतु ही रेल्वे प्रत्याक्षात धावू लागल्याला आता २५ वर्षे झाली असताना आता हीचे दुपरीकरण हाती घेण्यात आले आहेे. सर्वात महत्वाचे म्हणजे एकीकडे मुंबई-गोवा महामार्गाचे दुपदरीकरण, कोकण रेल्वेचे दुपरीकरण-विद्युतीकरण तसेच मुंबई-गोवा सागरी महामार्ग पूर्ण करण्याचा केंद्रीय वाहतूकमंत्री नितिन गडकरी यांनी व्यक्त केला निर्धार व मुंबई-गोवा येथून जाणारी बंद पडलेली प्रवासी सागरी वाहतूक पुन्हा सुरु करण्यासाठी सुरु झालेले प्रयत्न पाहता संपूर्ण कोकणपट्टी ही झपाट्याने येत्या काही वर्षात विकासाच्या केंद्रभागी येणार आहे, हे नक्की. कोकण रेल्वे आता दुपदरी होणार असल्याने त्यावरील मालवाहतूक व प्रवासी वाहतूक वाढणार आहे. सध्या रेल्वेला ७५ टक्के उत्पन्न हे प्रवासी वाहतुकीतून मिळते. रो-रो सेवेमुळे तर दक्षिणेत जाणार्‍या मालवाहतुकीची मोठी सोय झाली आहे, यामुळे इंधनाची बचत तर होतेच आहे शिवाय वेळही मोठ्या प्रमाणात वाचतो. त्याचबरोबर दक्षिणेकडे जाणार्‍या प्रवाशांच्या वेळेत १२ तासाहून जास्त वेळ कोकण रेल्वेमुळे वाचला आहे. सध्या एकेरी मार्ग असूनही या मार्गावरुन तब्बल ५५ गाड्या जातात. जर दुपदरी मार्ग झाल्यास सध्यापेक्षा दुपटीहून जास्त गाड्या कोकण रेल्वेवरुन धावू शकतील. तसेच विद्युतीकरणामुळे इंधनाच्या खर्चातही मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकेल. अलिबाग हे मुंबईच्या जवळ असूनही तेथे अद्याप रेल्वे पोहोचलेली नाही. मात्र अलिबागला लवकरच रेल्वे पाहाण्याचे भाग्य अलिबागकरांच्या नशिबात आहे असेच दिसते. कारण कित्येक काळ असलेले हे स्वप्न आता पूर्ण होईल असे दिसू लागले आहे. आर.सी.एफ.च्या असलेल्या पेण ते अलिबाग या खासगी मार्गावरुन प्रवासी वाहतूक करण्यास मान्यता मिळणार आहे. ही रेल्वे कोकण रेल्वेला जोडल्यास एक मोठी सुविधा होईल. हे प्रत्यक्षात उतरल्यास अलिबागच्या पर्यटनाला तसेच औद्योगिकीकरणाला एक नवा आयाम मिळू शकेल. एकूणच पाहता कोकणचा चेहरामोहरा बदलण्यास आता खर्‍या अर्थाने सुरुवात झाली असे म्हणावे लागेल. कोकण रेल्वेचे दुपरीकरण व विद्युतीकरण हे त्यातील पहिले पाऊल ठरावे. कोकण रेल्वेच्या दुपरीकरणाला वेग आला आहे. यातून कोकणच्या विकासाला वेग मिळू शकतो.
---------------------------------------------------------

0 Response to "कोकण रेल्वेला वेग"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel