-->
शून्यातून विश्‍व उभारणारे भाई

शून्यातून विश्‍व उभारणारे भाई

संपादकीय पान मंगळवार दि. ५ जानेवारी २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
शून्यातून विश्‍व उभारणारे भाई
शेकापचे ज्येष्ठ नेते, उद्योगपती, माजी आमदार भाई सावंत यांच्या निधनामुळे राज्यातील एक सच्चे, प्रामाणिक नेतृत्व संपले आहे. गरीबीची कधीही तमा न बाळगता त्यांनी शून्यातून आपले विश्‍व उभे केले. एक उद्योजक म्हणून ते यशस्वी झाले. एक राजकारणी म्हणून त्यांनी सर्व राजकारण्यांसमोर एक आदर्श ठेवला, एकत्रित कुटुंब ठेवून समाजापुढे एक नवा आलेख मांडला. स्वातंत्र्यपूर्व काळातील ज्या नेतृत्वाने देशाला समाजासाठी करण्याची सतत धडपड दाखविली त्यात भाईंचे नाव अगक्रमाने राहिल. उद्योगधंद्यात त्यांनी नाव कमविले व आपला स्वतंत्र उद्योग-व्यवसाय उभारुन त्याकाळीही मराठी माणूस उद्योग क्षेत्रात आपली पताका फडकवू शकतो हे दाखवून दिले. आपल्या उद्योगाचे लावलेले रोपटे त्यांनी वटवृक्षात उभे राहिलेले पाहिले. ३३ वर्षापूर्वी शेकापचे नेते दत्ता पाटील, प्रभाकर पाटील यांनी त्यांना राजकारणात येण्याची गळ घातली व त्यांना राजकारण करुन आपण समाजसेवा कशी करु शकतो हे पटवून सांगितले. अर्थातच त्यांचा पिंड समाजसेवेचा असल्याने त्यांना त्यांचे विचार पटले व त्यांनी शेकापमध्ये प्रवेश केला. शेवटच्या श्‍वासापर्यंत ते शेकापतच राहिले. शेकापने आपल्याला आमदार केले व याचा उपयोग समाजाच्या सेवेसाठी झाला पाहिजे हे त्यांच्या रक्तात भिनले होते. त्यादृष्टीने त्यांनी आपल्या मतदारसंगात अनेक कामे केली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ते सक्रिय सहभागी होते. गिरगावात त्यांच्याच पुढाकाराने संयुक्त महाराष्ट्र समितीचे कार्यालय सुरु करण्यात आले होते. महाराष्ट्राची स्थापना झाल्यावर त्यांनी सामाजिक चळवळीत स्वत: झोकून दिले. हुंडाबळी जारी व्हावी यासाठी त्यांनी १९७१ साली लोणोरे येथे मराठा समाज परिषेद आयोजित केली होती. घरातील प्रत्येकी किमान एक व्यक्ती शिक्षित झाली पाहिजे, त्यात महिला शिक्षित झाली पाहिजे यासाठी त्यांनी प्रचार व प्रसार केला. हा महाराष्ट्र पुररोगामी विचारांचा राहिला पाहिजे असा त्यांचा नेहमी आग्रह असे. उद्योगक्षेत्रात त्यांनी नाव कमविले आणि त्यांच्या उद्योगातील कार्याची शंतनुराव किर्लोस्कर यांनी वाहावा केली होती. किर्लोस्कर समूहाची पंपांची ऑर्डर त्यांना मिळाली होती ती त्यांनी विक्रमी वेळेत पूर्ण केल्याने शंतनुरावांशी त्यांची जवळीक वाढली. एकीकडे उद्योग क्षेत्रात नाव कमविले असताना त्यांनी शेकापमध्ये प्रवेश केला आणि राजकारणात पाऊल टाकले. खरे तर त्यांच्या घरात कॉँग्रेसची पार्श्‍वभूमी होती. असे असले तरी त्यांनी शेकापमध्ये प्रवेश केला व शेवटपर्यंत ते याच पक्षात राहिले. शेतकर्‍यांच्या अनेक लढ्यात ते सक्रिय राहिले. माणगाव तालुक्यातील जमीनी सरकारने ताब्यात घेतल्या होत्या मात्र शेतकर्‍यांना सरकारने वार्‍यावर सोडले होते. त्यांच्या या सहभागामुळे काळ प्रकल्पाच्या शेतकर्‍यांना न्याय मिळाला. नागोठणे येथे आयपीसीएलचा प्रकल्प आला होता. तेथील शेतकर्‍यांनाही सरकारने न्या दिला नव्हता. भाईंनी त्याविरोधात मोर्चा काढून व्यवस्थापनाला प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यास भाग पाडले. माणगाव येथील अंबार्ले येथील प्रकल्पग्रस्तांच्या लढ्याचे नेतृत्व भाईंनी केले होते. भाई आमदार असताना रोह्यात दंगल झाली होती. त्यावेळी एका मुस्लिम युवकाची हत्या झाली होती. त्यामुळे तणाव होता. मात्र भाईंनी त्या मुलाच्या अंत्यविधीला जाऊन तणाव निवळण्याचा प्रयत्न केला. शेवटी भाईंच्या हस्तक्षेपामुळे ही दंगल आटोक्यात आली. भाईंचा कोणत्याही नव्या प्रकल्पास कधीच विरोध नव्हता मात्र विकासाच्या नावाखाली शेतकर्‍यांना देशोधडीला लावू नये असा त्यांचा आग्रह होता. यातून त्यांनी विविध लढे अभारले व अनेक शेतकर्‍यांना न्याय मिळवून दिला. त्याचबरोबर भाईंनी क्रीडा क्षेत्राच्या विकासाठी अनेकदा मोलाची कामगिरी केली. ग्रामीण भागातून खेळाडूंना संधी मिळावी यासाटी त्यांनी लोणारे येथे क्रीडा महाोत्सव भरविला. त्यांनी या कामी पुढाकार घेतल्यावर त्यानंतर अनेकांनी असे महोत्सव भरविण्यास सुरुवात केली. शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी त्यांनी जे.बी. सावंत विज्ञान महाविद्यालय सुरु केले. माणगाव व त्या परिसरात माध्यमिक शाळा सुरु केल्या. ते ज्या समाजात जन्माला आले त्या समाजात सुधारणा व्हाव्यात व आपला समाज आधुनिक व्हावा यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. मराठी माणसांना अभिमान वाटावा अशी दादर येथे शिवाजी मंदिर ही संस्था त्यांनी नावारुपाला आणली. त्यांच्या नेतृत्वाखालील पॅनल शिवाजी मंदिरावर निवडून आले मात्र त्यांनी येथे कधीच पद स्वीकारले नाही. शिवाजी मंदीर स्वत:च्या पायावर कसे उभे राहिले त्यादृष्टीने आपले व्यावसायिक कौशल्य पणाला लावले. समाजसेवेची कामे करीत असताना त्यांनी आपले कुटुंब कधीच विभक्त होऊ दिले नाही हे त्यांचे एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. आजही त्यांच्या सावंत कुटुंबामध्ये दीडशे सदस्य आहेत. कोकणातील एक अनोखे कुटुंब ठरावे. आपला उद्योग त्यांनी शून्यातून उभारला, मात्र समाजासाठी आपण देणेे लागतो हे भाई कधीच विसरले नाहीत. भाई सावंत यांच्यासारखा चतुरस्त्र नेता पुन्हा होणे कठीण आहे.
------------------------------------------------------

0 Response to "शून्यातून विश्‍व उभारणारे भाई"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel