-->
अखरेचा लाल सलाम

अखरेचा लाल सलाम

संपादकीय पान सोमवार दि. ४ जानेवारी २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
अखरेचा लाल सलाम
--------------------------------------------------------
कॉ. ए.बी. बर्धन यांच्या जाण्याने कामगार चळवळीचा एक खंदा नेता, कम्युनिस्ट विचारांची पक्की राजकीय बैठक असलेला व समाजवादी, लोकशाहीवर जबरदस्त निष्ठा असलेला एक देशव्यापी नेता आपण गमावला आहे. त्यामुळे त्यांच्या जाण्याने केवळ भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नुकसान झाले नाही तर संपूर्ण डाव्या चळवळीची एक मोठी हानी झाली आहे. विद्यार्थी देशपासून ते डाव्या चळवळीत ओढले गेले ते शेवटपर्यंत. तरुणपणात त्यांनी खांद्यावर घेतलेला लाल बावटा अखेरच्या श्वासापर्यंत जपला. त्यावरची निष्ठा कधी ढळू दिली नाही. एक विद्यार्थी नेता ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सर्वेच्च पद असलेले सरचिटणीस असा त्यांचा प्रवास झाला असला तरी ते शेवटपर्यंत ते एक साय कार्यकर्तेच राहिले. ८६ साली त्यांच्या पत्नीच्या निधनानंतर ते पक्षाच्या दिल्लीतील मुख्यालयात एका सर्वसामान्य कार्यकर्त्याप्रमाणे दोन रुममध्ये राहिले. साधेपणा त्यांच्या रक्तात मुरलेला होता. ९०च्या दशकात देशात खिचडी राजकारणाचे प्रयोग सुरु असताना त्यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व आले. त्यावेळी पक्षाचे नेतृत्व करणे ही सोपी बाब नव्हती. अनेक आव्हाने होती. मात्र ती आव्हाने त्यांनी सहजरित्या पेलली. सर्वपक्षात त्यांचे मैत्रीचे संबंध होते. मात्र पक्षाच्या धोरणाच्या किंवा हिताच्या आड ही मैत्री कधी येणार नाही याची त्यांनी नेहमीच खबरदारी बाळगली. खुद्द त्यांच्या भगिनी सुमतीताई सुकळीकर या संघाच्या कार्यकर्त्या होत्या. प्रत्येक व्यक्तीला त्याने कोणता विचार घ्यावयाचा याचे स्वातंत्र्य त्यांच्या घरात होते. यातून दोघे भावंडे परस्पर विचारांचे असले तरीही त्यांच्या नात्यात कधीच दुरावा आला नाही. अगदी परस्परांनी विरोधात निवडणूकही लढविली होती, परंतु त्यांनी आपले विचार व नाते संबंध हे स्वतंत्र्यपणाने जपले. सध्याच्या काळात विचार संपविण्यासाठी खून करण्याच्या प्रवृत्ती वाढल्या आहेत. त्या मंडळींनी यातून बोध घेण्याची गरज आहे. असो. बर्धनांचे एक वैशिष्ट्‌य म्हणजे ते सर्वसामान्य कार्यकर्त्यात ज्याप्रकारे मिसळून काम करीत, कामगार-शेतमजुरांच्या मेळाव्यात सोप्या भाषेत बोलत तसेच ते जागतिक पातळीवरील एखाद्या मुद्यावर वैचारिक पातळीवर विद्वानांशी वादही घालीत. तीक्ष्ण बुध्दीमत्ता, स्मरणशक्ती ही त्यांची आणखी वैशिष्ट्‌ये म्हणता येतील. धर्म-संस्कृती-समाजकारण यावर त्यांचा गाढा अभ्यास होता. याला ते मार्क्सवादाची जोड देत त्यामुळे त्यांचे विचार आणखीनच प्रगल्भ होत असत. निष्कलंक व्यकतीमत्व असल्यामुळे त्यांनी आपल्या राजकीय जीवनात कसलाही डाग लावू दिला नाही. त्यांची जन्माची भाषा बंगाली होती. कारण त्यांचा जन्म सध्याच्या बांगला देशातला. त्याचबरोबर त्यांचे हिंदी व इंग्रजी भाषेवर प्रभूत्व होते. त्याचबरोबर पक्षात ते प्रचंड लोकप्रिय होते. त्यामुळेच त्यांच्यासाठी पक्षाने आपल्या सरचिटणीसांच्या कालावधीत बदल करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला होता. सरचिटणीस या पदावर एखादी व्यक्ती केवळ दोन टर्म राहू शकते असा असलेला नियम त्यांच्यासाठी बदलून तीन टर्म करण्यात आला होता. कारण त्यावेळी अशीच परिस्थिती होती की, पक्षात अनेक नेते असले तरीही बर्धन यांची नेतृत्वपदी राहावे असा अनेकांचा आग्रह होता. सहसा असे कम्युनिस्ट पक्षात होत नाही. व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा असतो परंतु त्यांच्यासाठी हा नियम बदलण्यात आला. एक प्रभावी वकृत्व त्यांच्याकडे होते. श्रमजीवी वर्गाला ते जसे एका जागी आपल्या वाणीने बांधून ठेवीत तसेच उच्चभ्रू वर्गातही त्यांचे भाषण एकणारे होते. पक्षात कामगार-कष्टकर्‍यांबरोबर प्रत्येक क्षेत्रातील लोक यावेत असा त्यांचा आग्रह होता. यासाठी त्यांनी पक्षात विविध पातळ्यांवर आघाड्याही उभारल्या. यात त्यांनी काही मर्यादीत प्रमाणात यश आले. त्यांचा जन्म बंगालचा असला तरीही त्यांची सुरुवातीपासून कर्मभूमी ही नागपूर ठरली. त्यांच्या प्रभावामुळे नागपूर हे त्याकाळी डाव्या चळवळीचे एक प्रमुख केंद्र झाले. ते प्रथम आमदार म्हणून निवडूनही नागपूरमधूनच आले. मात्र ८०च्या दशकानंतर त्यांचे काम देशव्यापी पातळीवर सुरु झाले आणि पक्षात केंद्रीय समितीत आल्यावर त्यांचा मुक्काम हा दिल्लीतच असे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या विचाराचे नसले तरीही बर्धन यांना ते जबरदस्त मानीत असत. अशा प्रकारे त्यांनी डाव्या विचारांच्याबरोबरीने अन्य पक्षात आपले मित्र जोडले. बर्धन यांच्या जाण्याने देशातले एक महत्वाचे राजकीय नेतृत्व आपण गमावले आहे. असे एक नेतृत्व की ज्यांचा आदर्श पुढील पिढीनेही नेहमीच ठेवावा. स्वातंत्र्यचळवळीपासून ते आत्तापर्यंतचा एक मोठा कालखंड त्यांनी अनुभवला. स्वातंत्र्यचळवळीत असलेल्या नेत्यांची पिढी आता काळाच्या पडद्याआड जात आहे. बर्धन हे त्यातील एक महत्वाचे राजकीय नेते होते. त्यांच्यासारखे नेते आताच्या पिढीत सापडणे कठीण आहे. परंतु बर्धन हे पुढील पिढीसाठी आदर्श ठेवून गेले आहेत. कॉम्रेड बर्धन यांना अखेरचा लाल सलाम.
--------------------------------------------------------------

0 Response to "अखरेचा लाल सलाम"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel