-->
सुरक्षिततेचे धिंडवडे

सुरक्षिततेचे धिंडवडे

संपादकीय पान गुरुवार दि. ७ जानेवारी २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
सुरक्षिततेचे धिंडवडे
पठाणकोट येथील हवाई तळावर पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी केलेला हल्ला पाहता व या हल्याचा मुकाबला करण्याच्या मोहिमेत ज्या उणिवा राहून गेल्या ते पहता देशाच्या सुरक्षिततेचे धिंडवडे निघाले आहेत. अर्थात याची कबुली संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनीही दिली आहे. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे कौतुक करावयास हरकत नाही परंतु असा प्रकारच्या उणीवा देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने हिताच्या नाहीत. या हल्यात सहा दहशतवादी मारले गेले तर सात जवान शहीद झाले. या हल्यात दहशतवाद्यांनी पाकिस्तानी बनावटीची शस्त्रे व उपकरणे वापरली आहेत. अजून एका दिवसात येथील शोधमोहिम पूर्ण होईल व हे ऑपरेशन पूर्ण होईल. सर्वात महत्वाचे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पााकिस्तानला भेट देऊन जेमतेम पंधरवडा होत नाही तोच हा हल्ला झाला आहे. या हल्यानंतर पंतप्रधानांनी थेट पाकचे पंतप्रधान नवाझ शरिफ यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला. त्यावर त्यांनी या हल्याचा निषेध केल्याचे सांगण्यात आले. अर्थात पाकिस्तानची ही चाल काही नवीन नाही. मुंबई हल्याबाबतही पाकने नेहमीच निषेध केला आहे, मात्र दुसरीकडे या अतिरेक्यांना आपली भूमी प्रशिक्षणासाठी नेहमीच उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे पाकची ही दटप्पी भूमीका नेहमीचीच आहे. पठाणकोट येथील हवाईतळावर अतिरेक्यांनी कसा प्रवेश केला ही बाब सर्वात महत्वाची आहे. किमान २४ कि. मी. चा परिघ असलेल्या २००० एकराच्या हवाईतळावर दहशतवादी आत कसे येऊ शकले? याबाबत सरकारने खुलासा करण्याची गरज आहे. मोदी-शरीफ यांच्या भेटीतून एक नवे वारे दोन देशात सुरु होतील अशी अपेक्षा ठेवणे आता चुकीचे आहे. पठाणकोट येथील हवाई तळावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जो हल्ला केला त्यात दोन्ही बाजूच्या अमली पदार्थ टोळ्यांनी मदत केली असण्याची शक्यता आहे. शिवाय, दहशतवाद्यांनी वापरलेली शस्त्रास्त्रे ही हल्ल्याच्या आधीच पाठवण्यात आली होती असे समजते. सुरक्षा संस्थांच्या संशयानुसार दहशतवाद्यांनी पंजाबमध्ये आंतरराष्ट्रीय सीमा पार केली त्यात खोटे भारतीय चलन, शस्त्रास्त्रे व अमली पदार्थ यांचा व्यापार करणार्‍या टोळ्यांची मदत असावी. तस्करी करणार्‍या टोळ्यांशी सुरक्षा कर्मचार्‍यांपैकी कुणाचा संबंध असल्याची शक्यता नाकारता येत नाही. या टोळ्यांमधील काही जणांचे जाबजबाब घेतले तर या कटाचा पर्दाफाश होऊ शकतो. शस्त्रास्त्रे व दारूगोळा हा पाकिस्तानातून आंतरराष्ट्रीय सीमेवरून आधीच पाठवण्यात आला होता. तस्कर ज्या मार्गाने येतात त्याच मार्गाने दहशतवादी आले, त्यामुळे पंजाबमधील अमली पदार्थ तस्करी करणार्‍या टोळ्यांची कसून चौकशी करण्याची आवश्यकता आहे. गेल्या २५ वर्षांत भारत-पाक संबंधांमध्ये केवळ दोन्ही देशांचे पंतप्रधान किंवा लष्करे महत्त्वाची भूमिका बजावत नाहीत तर त्यामध्ये पाकस्थित दहशतवादी गट, त्यांना आर्थिक रसद पुरवणार्‍या धार्मिक संघटना व काही पाश्चिमात्य राष्ट्रे दबाव आणण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे शरीफ-मोदी यांनी कितीही मैत्रीपूर्ण हस्तांदोलन केले तरी दहशतवादी हल्ले करण्याचे थांबतील अशा भ्रमात कोणी राहण्याचे कारण नाही. दहशतवादी हल्ल्‌यांचे स्वरूप बदलू शकते व त्याची ठिकाणे, लक्ष्ये बदलू शकतात. दहशतवादी हल्ल्‌यांची मॉडेल बदलू शकतात. पंजाबमधील पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर केलेला दहशतवादी हल्ला हा नि:संशय भारत-पाक संबंधांमध्ये पुन्हा मोठी दरी व संशय निर्माण करण्याचा प्रयत्न होता. आजपर्यंत पाकस्थित दहशतवादी गटांनी भारताच्या लष्करी तळांवर अशा प्रकारचे हल्ले केले नव्हते. पाकिस्तानमधील रावळपिंडी किंवा कराची येथील लष्करी तळांवर तालिबानी दहशतवाद्यांकडून असे हल्ले याअगोदर झाले होते. पठाणकोटमधील हल्ला हा सुनियोजित राजकीय कट होता. दहशतवादी गटांनी पंजाबला पुन्हा लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या २५ वर्षांत पंजाब हा शांत होता. त्यापूर्वी पंजाबमध्ये अतिरेक्यांनी धुमाकूळ घातला होता व त्याला पाकची सीमेपलिकडून साथ होती. गेल्या दहा वर्षांत अमली पदार्थांच्या मोठ्या प्रमाणातील तस्करीने पंजाबचे सामाजिक व आर्थिक जीवन पुरते पोखरले गेले आहे. बेरोजगारी व स्थलांतर या समस्यांनी त्यात भर घातली आहे. शिवाय पाकिस्तान सीमेलगत असलेली पंजाबची सीमा ही विस्तीर्ण आहे. त्यात नद्या व शेतीमुळे पठाणकोट-गुरुदासपूर सीमाप्रदेश दहशतवाद्यांना घुसखोरीसाठी उपयुक्त ठरत आहेत, तर सुरक्षा दलांना सुरक्षेच्या दृष्टीने कठीण ठरत आहेत. पंजाबमधील अमली पदार्थांच्या तस्करीत काही दहशतवादी गटही उतरल्याने परिस्थिती चिंताजनक आहे. या हल्याला आपण उत्तर दिले असले तरीही यात ज्या अनेक गफलती झाल्या यातून आपल्याला बोध घ्यावा लागेल. देशाच्या सुरक्षिततेशी कोणत्याही स्थीतीत समझोता करता येणार नाही.
------------------------------------------------------------------

0 Response to "सुरक्षिततेचे धिंडवडे"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel