-->
बारावीत मुलींची बाजी!

बारावीत मुलींची बाजी!

संपादकीय पान शुक्रवार दि. २९ मे २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
बारावीत मुलींची बाजी!
बारावी हे वर्ष करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असते. या निकालानंतर अनेकांना आपल्या भविष्यातील करिअरची दिशा ठरवायची असते. त्यामुळे विद्याथ्यार्ंच्या जीवनात बारावीच्या निकालावर अनेक पुढील स्वप्नांचे इमले बांधावयाचे असतात. गेल्या काही वर्षात दहावी व बारावीच्या निकालावर मुलींचे वर्चस्व प्रस्थापित झालेले प्रकर्षाने जाणवते. यंदाही त्याहून काही वेगळी स्थिती नाही. परिक्षेला बसलेल्या १२ लाख ३७ हजार विद्यार्थ्यांपैकी ९१.२६ टक्के मुले पास झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात सव्वा टक्का वाढ झाली आहे. तसेच आजवरचा हा सर्वोच्च निकाल ठरला आहे. विशेष श्रेणी आणि प्रथम श्रेणीतील विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले असून मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९४.२९ टक्के आहे, तर मुलांचे प्रमाण ८८.८० टक्के आहे. सलग चौथ्या वर्षी कोकण विभाग अव्वल ठरला आहे. अपंग विद्यार्थ्यांचा निकाल ९१.३५ टक्के तर रात्र महाविद्यालयांत शिकणार्‍या विद्यार्थ्यांचा निकाल ६५.०२ टक्के लागला आहे. राज्यातील ९४६ महाविद्यालयांचा शंभर टक्के निकाल लागला व शून्य टक्के निकाल लागलेली ११ महाविद्यालये आहेत. एकूण १६१ विषयांपैकी १४ विषयांचा निकाल शंभर टक्के लागला असून त्यात पर्यायी भाषा आणि कला विषय आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत विज्ञान आणि वाणिज्य शाखेचा निकाल साधारण दोन टक्क्यांनी वाढला. विज्ञान शाखेतील गणित, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र यांबरोबरच परीक्षा कठीण असल्याची ओरड झालेल्या रसायनशास्त्र विषयाचा निकालही साधारण २ ते अडीच टक्क्यांनी वाढला आहे. राज्याच्या बारावीच्या घसघशीत निकालामुळे आता प्रवेशासाठी मोठी चुरस असणार आहे. या वर्षी प्रथम श्रेणी आणि विशेष श्रेणीतील विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढल्यामुळे अभियांत्रिकी शाखा आणि पारंपरिक अभ्यासक्रमाच्या नावाजलेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची स्पर्धा शिगेला पोहोचण्याची शक्यता आहे. विशेष श्रेणीतील म्हणजे ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास २० हजारांनी वाढल्यामुळे या वर्षी अभियांत्रिकी शाखेच्या प्रवेशासाठी स्पर्धा वाढणार आहे. मात्र, बारावीला चांगले गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यामुळे आता प्रवेशासाठी जेईईचा निकालच निर्णायक ठरेल. गेल्या वर्षी बारावीला साधारण ७० टक्के गुण मिळालेला विद्यार्थी हा अभियांत्रिकी प्रवेशाच्या सूत्रानुसार ९० पर्सेटाईलच्या जवळापास होता. या वर्षी ७५ ते ८० टक्के गुण मिळालेले विद्यार्थी हे ९० पर्सेटाईलपर्यंत पोहोचू शकतील, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. अंतर्गत मूल्यमापनासाठी असलेल्या २० गुणांचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना मिळतोे. त्यामुळे गेली दोन वर्षे निकाल फगल्यासारखा दिसतो आहे. त्या पाश्वभूमीवर उत्तीर्ण होण्यासाठी लेखी परीक्षेतही किमान ३५ टक्के गुण मिळणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, यावर्षीपासून हा निर्णय नववी आणि अकरावीला लागू होणार आहे. त्यामुळे येत्या वर्षीही दहावी निकाल विक्रमीच लागण्याची शक्यता आहे. अर्थात या विक्रमी निकालामुळे पुढे महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी झुंबड उडणार आहे व अनेक मुलांना त्यांंना अपेक्षित असलेले शिक्षण घेणे शक्य होणार नाही. आपल्याकडे जसे पास झालेल्या मुलांपुढे आता कोणत्या महाविद्यालयात जाऊन नेमके करिअर स्वीकारायचे हे प्रश्‍नचिन्ह उभे असते तसेच नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी नेमके काय करावयाचे याची आखणी नसते. विद्यार्थी नापास झाला म्हणजे तो संपला आता त्याचे भवितव्य शून्यच आहे असे अनेकांना वाटत असते. परंतु नापास झालेल्या विद्यार्थ्यांनाही उकृष्ट भवितव्य असते. मात्र त्यासाठी त्यांच्यातली बुध्दीमत्ता ओळखून त्यांना योग्य मागदर्शन करण्याची गरज असते. नापास झालेल्यांसाठी अनेक पर्याय खुले असतात. डॉक्टर, इंजिनिअर, वकिल हेच फक्त करिअर असे समजण्याचे दिवस आता संपले आहेत. मात्र यासंबंधी जनजागृती नसल्याने विद्यार्थ्यांवर ताण येतो व त्यातून आत्महत्येसारखे प्रकार घडतात. परिक्षेत गुण कमी मिळणे म्हणजे काही तरी गुन्हा आहे किंवा कमी गुण मिळाल्याने त्या मुलाचे भविष्य अंधारात आहे असे समजण्याची आवश्यकता नाही. उलट करिअरमध्ये यशस्वी होणार्‍यांनाही नापासाच्या दिव्यातून जावे लागलेले असते. मुलींच्या शिक्षणात गेल्या काही वर्षात झपाट्याने प्रगती झाली आहे. त्यात कोकणात मुली आघाडीवर आहेत. एकेकाळी मुलींचे शिक्षणाचे प्रमाण कमी होते. मात्र आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. मुलींना चांगले शिक्षण देण्याकडे पालकांचा कल असतो. त्यामुळे मुलींचे केवळ शहरात नव्हे तर ग्रामीण भागातले प्रमाण वाढले आहे व समाधानाची बाब म्हटली पाहिजे. आजवर आपण शिक्षण घेताना केवळ नोकरी मिळविण्यासाठी शिक्षण घेणे असा अनेकांचे मत असे. मात्र आता शिक्षण हे केवळ नोकरी मिळविण्यासाठी नव्हे तर स्वयं: रोजगार सुरु करुन स्वत:च्या पायावर उभे राहाण्यासाठी घेतले पाहिजे ही संकल्पना तरुण पिढीला पटू लागली आहे. गेल्या काही वर्षात झालेला हा बदल फार मोठा आहे व स्वागतार्ह ठरवा, अशी स्थिती आहे. बारावीचा निकाल हा विद्यार्थ्याच्या आयुष्यातील एक महत्वाची पायरी असते व त्यातूनच पायाभरणी केली जाते. जे विद्यार्थी चांगल्या मार्कांनी यशस्वी झाले आहेत त्यांच्यासाठी शुभेच्छा देत असताना ज्यांना अपयश पदरी आले असेल त्यांनी निराश होता कामा नये. अपयश ही यशाची पहिली पायरी असे समजून त्यातून पुढील वाटचाल खंबीरपणे करावी.
--------------------------------------------------------

0 Response to "बारावीत मुलींची बाजी!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel