-->
जाट नेता अजितसिंग: पुन्हा एकदा सत्तेच्या वतरुळात

जाट नेता अजितसिंग: पुन्हा एकदा सत्तेच्या वतरुळात

 जाट नेता अजितसिंग: पुन्हा एकदा सत्तेच्या वतरुळात
 Published on 24 Dec-2011 PRATIMA
माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांचे पुत्र अजितसिंग (वय वर्षे 72) यांना कॉँग्रेसने आपल्या आघाडीत सामील करून घेऊन केंद्रीय नागरी उड्डाणमंत्रिपद बहाल केले आहे. उत्तरप्रदेशातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे हा जाट नेता आता पुन्हा एकदा सत्तेच्या वतरुळात आला आहे. अजितसिंग हे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीत आल्याने त्यांच्या राष्ट्रीय लोकदलाच्या पाच खासदारांमुळे सत्ताधारी आघाडीची सदस्य संख्या आता 272 वरून 277 वर गेली आहे. आयआयटी खरकपूर येथून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेले अजितसिंग हे खरे तर अपघाताने राजकारणात आले, कारण आपले शिक्षण पूर्ण केल्यावर ते तब्बल 15 वर्षे अमेरिकेत नोकरी करीत होते आणि तेथेच स्थायिक होण्याचे त्यांनी जवळजवळ निश्चित केले होते. मात्र, चौधरी चरणसिंग यांच्या निधनानंतर त्यांनी राजकारणात उतरण्याचे ठरवले आणि ते त्यात यशस्वीही झाले. वडिलांप्रमाणे अजितसिंग हेदेखील जाट समाजाचे नेते म्हणून आज उत्तरप्रदेशात ओळखले जातात. संपूर्ण उत्तरप्रदेशात सुमारे सात टक्के आणि उत्तरप्रदेशाच्या पश्चिम भागात 3.7 टक्के जाट आहेत. त्यामुळे जाट समाजातील लोकांची मते आगामी निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहेत. म्हणूनच अजितसिंग यांच्याशी कॉँग्रेसने सहकार्याचा हात पुढे केला आहे. 
अजितसिंग हेदेखील राजकारणात चांगले मुरलेले नेते म्हणून ओळखले जातात. आजवर त्यांनी व्ही. पी. सिंग, पी. व्ही. नरसिंहराव व अटलबिहारी वाजपेयी यांच्या मत्रिमंडळात एक ज्येष्ठ मंत्री म्हणून काम केले आहे. सत्तेशी आपली नाळ टिकून राहावी यासाठी अजितसिंग यांनी वेळोवेळी विविध आघाड्यांशी सहजरीत्या जुळवून घेतले आहे. मात्र, असे करताना त्यांनी आपला मतदारांमधील पाया कधी गमावला नाही. 1198 वर्ष वगळता त्यांनी सहा वेळा लोकसभा निवडणूक जिंकली आहे. 1996 मध्ये ते सर्वात प्रथम राज्यसभेवर गेले. 
उत्तरप्रदेशातील बागपत लोकसभा मतदारसंघाचे ते नेहमीच प्रतिनिधित्व करीत आले आहेत. 1989 मध्ये व्ही. पी. सिंग यांनी त्यांना सर्वात प्रथम केंद्रीय मंत्रिमंडळात घेतले. व्ही. पी. सिंग यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात ते उद्योगमंत्री होते. फेब्रुवारी 1995 मध्ये ते पी. व्ही. नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखालील कॉँग्रेसच्या सरकारमध्ये अन्नमंत्री म्हणून दाखल झाले. त्या वेळी त्यांनी आपला पक्ष कॉँग्रेसमध्ये विलीनही केला होता. 1996 च्या मे महिन्यापर्यंत ते मंत्रिमंडळात होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा कॉँग्रेसकडून फारकत घेतली आणि आपल्या पक्षाला पुन्हा ‘जिवंत’ केले. 2001 मध्ये त्यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीत प्रवेश केला आणि त्यांना केंद्रीय कृषिमंत्रिपदाचा लाभ झाला. मे 2003 पर्यंत ते मंत्री होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीला रामराम केला आणि बराच काळ कुणाशीही आघाडी केली नाही. आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवले. आता ते पुन्हा एकदा कॉँग्रेसच्या आघाडीत सामील झाले आहेत. 
मायावतींनी ज्या वेळी उत्तरप्रदेशाचे चार तुकडे करण्याची घोषणा केली, त्या वेळी अजितसिंग यांनी त्याचे जोरदार स्वागत केले होते. याचे मुख्य कारण म्हणजे उत्तरप्रदेशचा पश्चिम भाग वेगळा केला तर तेथे अजितसिंग यांना चांगल्या जागा मिळू शकतात. त्यामुळे तेथील मुख्यमंत्री पदावर त्यांचा डोळा आहे. अजितसिंग यांची कधीच एकसंघ भूमिका राहिली नसल्याने ते अन्य कोणत्याही पक्षाशी समझोता करू नये म्हणून त्यांना केंद्रात मंत्री करून कॉँग्रेसने आपल्या कळपात आणले आहे. त्याचबरोबर राज्यातील 45 जागा लढवण्यासाठी देऊ केल्या आहेत. काँग्रेसने उत्तरप्रदेशातील आखलेली ही नवीन गणिते कितपत यशस्वी होतील हे आताच सांगणे कठीण आहे; परंतु अजितसिंग यांच्या प्रवेशामुळे कॉँग्रेसला निश्चितच काही प्रमाणात फायदा होईल. 
Prasadkerkar73@gmail.com 

0 Response to "जाट नेता अजितसिंग: पुन्हा एकदा सत्तेच्या वतरुळात"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel