-->
नरेंद्र मोदींना न दिसणारे एक वास्तव

नरेंद्र मोदींना न दिसणारे एक वास्तव

संपादकीय पान बुधवार दि. २७ मे २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
नरेंद्र मोदींना न दिसणारे एक वास्तव
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारभाराला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मथुरेत जाहीर सभा घेऊन आपल्या सरकारच्या जमेच्या बाजू त्यांनी मांडल्या. परंतु मोदींना जे समजलेले नाही त्यापेक्षा वेगळे वास्तव आज देशात आहे. मोदींचे हे भाषण पाहिल्यावर एक बाब स्पष्ट जाणवते की, मोदी हे खोटे बोलले तरी मोठ्या सफाईतदारपणे बोलतात. खोटे जरी परत परत बोलले तर ते खरे वाटू लागते या बाबींवर मोदींचा विश्‍वास असावा. त्यामुळेच त्यांनी देशात अच्छे दिन आल्याचा दावा केला. गेल्या वर्षात महागाई तर वाढलेली आहे, भ्रष्टाचार तर कमी झालेला नाही आणि त्याहून सर्वात महत्वाची बाब म्हणजे हिंदू-मुस्लिम धर्मियातील तेढ वाढण्याचे काम या काळात झाले आहे. गेल्या वर्षात हे घडले असताना अच्छे दिन मोदी म्हणतात ते कसले असा प्रश्‍न उपस्थित होतो. कारण एकीकडे मोदी वर्षपूर्तीच्या निमित्ताने देशातून भ्रष्टाचार निपटला गेल्याचा दावा करीत असताना सरकारनेच नेमलेल्या संस्थेच्या वतीने जो एक अहवाल तयार करण्यात आला आहे त्यात धक्कादायक नित्कर्ष जाहीर झाले आहेत. या अहवालानुसार, शहरी भागातील प्रत्येक कुटुंब वर्षाकाठी ४४०० रुपये, तर ग्रामीण भागातील कुटुंब २९०० रुपयांची लाच देत असल्याचे प्रकाशात आले आहे. बेनामी संपत्तीबाबत अभ्यास करण्यासाठी सरकारने नेमलेल्या एका संस्थेने लाचेबाबत सादर केलेली आकडेवारी आश्‍चर्यकारक ठरावी अशी आहे. एखादे काम करवून घेण्यासाठी चहा-नाश्ता ही आम बात असल्याचे आणि त्याला समाजमान्यता असल्याची बाबही समोर आली.नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाईड इकॉनॉमिक रिसर्च (एनसीएईआर) या संस्थेने लखनौ, पाटणा, भुवनेश्वर, चेन्नई, हैदराबाद, पुणे यांसारख्या शहरांसह ग्रामीण भागातही सर्वेक्षण केले. सर्वसाधारण कामे, विविध संस्थांमध्ये प्रवेश आणि पोलीस कर्मचार्‍यांना अधिकाधिक लाच दिली जात असल्याचे त्यात उघड झाले. सरकारने एनसीएईआरसह सार्वजनिक वित्त आणि धोरण राष्ट्रीय संस्था, वित्त व्यवस्थापन राष्ट्रीय संस्थांना काळ्या पैशाचा अंदाज लावण्याची जबाबदारी सोपविली होती. हा अहवाल एक म्हणतो तर मोदी दुसराच दावा करतात. त्यावरुन मोदी किती खोटे बोलतात हे सिध्द होते. देशात पूर्वीप्रमाणे भ्रष्टाचार सुरु आहे, त्याचे प्रमाण एका टक्क्यानेही कमी झालेले नाही, ही वस्तुस्थिती जनतेला जाणवत आहे, मात्र आपल्या पंतप्रधानांना ही बाब समजत नाही. किंवा ते जाणून बुजून ही बाब नजरेआड करीत आहेत. मोदी सरकारच्या काळात गेल्या वर्षात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत ही बाब केवळ आपल्याला नव्हे तर जागतिक पातळीवरील नेत्यांना जाणवली आहे. आजपर्यंत सत्ता नसल्यामुळे जे हिंदुत्ववादी मांजरासारखे लपून छपून आपल्या कारवाया करीत होते ते आता सत्ता आल्यामुळे शेर होऊन खुलेपणाने हिंदुत्वाचा कडवट प्रचार व प्रसार करु लागले आहेत. त्यातून घरवापसीसारखे कार्यक्रम आता राबविण्यात येत आहेत. यामुळे हिंदु-मुस्लिम तेढ निर्माण होत आहे. जे गरीब मुस्लिम आहेत ज्यांना रेशन कार्ड मिळवून देण्याचे आमीष दाखवून हिंदु धर्मात घेण्याचे काम हे हिंदुत्ववादी करीत आहेत. धर्माच्या नावावर लोकांच्या असलेल्या दारिद्—याचा फायदा उठवित धर्मांतर केले जात आहे. अशा प्रकारचे कोणाचेही केले जाणारे धर्मांतर हे चुकीचे आहे. परंतु सत्ता आल्यामुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक होऊन त्यांना संपूर्ण भारत भगवा करण्याच्या प्रेरणेने झपाटले आहे. यातून या दोन धर्मियातील तेढ वाढत जाण्याचा धोका आहे. याचे आणखी एक उत्तम उदाहरण द्यायचे म्हणजे, अलिकडेच मुंबईतील एका हिरे व्यापार्‍याने आपल्या नामवंत कंपनीत एका मुस्लिम तरुणाला तो मुस्लिम असल्याचे कारण दाखवून नोकरी नाकारली. अर्थातच ही गंभीर बाब आहे. जाती-धर्माच्या नावावर एखाद्याला नोकरी नाकारणे हा मोठा गुन्हाच आहे. परंतु करोडोची उलाढाल करणार्‍या या उद्योजकाचे असे करण्याचे धारिष्ट्य आत्ताच कसे झाले? या उद्योजकाचा यापूर्वीही व्यवसाय जगात सुरु होता. परंतु त्यांनी कधी मुस्लिम धर्मियाला नोकरी नाकारण्याचे काम केले नव्हते. आता केले याचे कारण म्हणजे त्यांच्या या विचाराला बळकटी देण्यारे सरकार सत्तेत आले आह आणि संघ परिवाराकडून अशा प्रकारच्या विषारी प्रचाराची मुळे रोवली जात आहेत. त्यामुळे उद्योगपतींना असे करण्यासाठी बळ आले. खरे तर उद्योजकाने असा विचार करणे चुकीचे आहे. या उद्योजकातर्फे जे हिर्‍यांचे उत्पादन केले जाते ते काही फक्त हिंदुनाच विकले जात नाही तर सर्व धर्मियांना विकले जाते. मग येथे काम करणारे कर्मचारी फक्त हिंदूच असण्याचे कारण काय? या उद्योजकाला नरेंद्र मोदी यांच्याकडून पुरस्कार मिळाला आहे व गुजरातमधील एक नामवंत उद्योजक म्हणून त्यांची गणणा होते. अशा वेळी नरेंद्र मोदी या उद्योजकाने मुस्लिम कर्मचार्‍याला नोकरी नाकारल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस दाखविणार नाहीत. त्यांच्या या कृत्यामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कडवा हिंदुत्ववाद पोसला जात आहे. मात्र याला उत्तर देताना एका मुस्लिम संघटनेने हंदु तरुणांना नोकरीची ऑफर देऊन गांधीवादाने उत्तर दिले आहे. ही घटना स्वागतार्ह असली तरी यापासून हिंदुत्ववादी संघटना बोध घेतील का? असा सवाल आहे. नरेंद्र मोदींना देखील हा वास्तव समजणार आहे किंवा नाही हा प्रश्‍न आहे.
----------------------------------------  

0 Response to "नरेंद्र मोदींना न दिसणारे एक वास्तव"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel