-->
वर्षपूर्ती साजरी करताना...

वर्षपूर्ती साजरी करताना...

संपादकीय पान मंगळवार दि. २६ मे २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
वर्षपूर्ती साजरी करताना...
नरेंद्र मोदी यांनी आज बरोबर एक वर्षापूर्वी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. आज त्या घटनेला बरोबर एक वर्ष पूर्ण झाले. गेल्या वर्षात जनतेच्या अपेक्षांचा भंग मात्र नरेंद्र मोदींनी केला आहे. ज्या अपेक्षाने जनतेने त्यांच्या पक्षाला बहुमत दिले ते पाहता जनतेच्या या कौलाचा आदर राखत खरे तर त्यांनी जनाभिमूख धोरण आखावयास हवे होते. मात्र सत्तेवर येताच नरेंद्रभाईंनी आपला खरा रंग दाखविण्यास सुरुवात केली आहे. एक वर्षात या सरकारची प्रतिमा ही बड्या भांडवलदारांचे पाठिराखे सरकार अशीच झाली आहे. गेल्या तीस वर्षात खरे तर जनतेने कधी न्वेह ते संपूर्ण बहुमत देऊन एकाच पक्षाला सत्तेत आणले, मात्र भाजपाचे हे सरकार सर्वसामान्यांसाठी काम करण्याऐवजी बड्या भांडवलदारांचे एजंट म्हणून काम करीत असल्याचे स्पष्ट दिसते. जनतेला आपल्या खात्यात विदेशातून आणल्या जाणार्‍या पैशातील १५ लाख रुपये जमा जमा होण्याची अपेक्षा होती. परंतु असे काही घडले नाही. मुळातच सरकारला विदेशात किती पैसा आपल्याकडून गेला आहे त्याचा ठोस आकडाच ठावूक नाही. निवडणुकीच्या काळात जी भाषणे मोदींनी केली होती ती एकप्रकारची फसवेगिरीच होती, हे आता सिध्द होऊ लागले आहे. मात्र काळ हा सूड घेत असतोच. नरेंद्र मोदींनी निवडणुकीपूर्वी एक वर्षे सोशल मिडियावर आक्रमक प्रचार सुरु केला होता. त्यावेळी सत्तेत असणार्‍या कॉँग्रेस पक्षावर घणाघाती टीका सुरु केली होती. लोकांनाही ते आवडले होते कारण गेल्या दहा वर्षात कॉँग्रेसच्या निक्रिय कारभारावर त्यांनी नेमके बोट ठेवले होते. विरोधात असताना सत्ताधार्‍यांवर टीका करणे सोपे असते, मात्र सत्तेत आल्यावर कामे करुन करुन दाखविणे दिसते तेवढे सोपे नसते. मोदींचेही असेच झाले. मोदी राष्ट्रीय राजकारणात आल्याबरोबर देशातल्या दोन-चार उद्योगपतींनी त्यांच्याभोवती फेर धरला. पैशाचा पाऊस पाडला. सगळी सामाजिक माध्यमे जी हुजूर करून समोर उभी राहिली. त्यामुळे गेल्या वर्षी मोदींच्या व्यक्तिमत्त्वाला राष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी याच सामाजिक माध्यमांनी व्टिटर, एसएमएस, फेसबुक ही साधने वापरली. इंटरनेट आणि लॅपटॉप ही साधने सोबतीला होतीच. अनेक वाहिन्या मदतीला होत्या. मोदींची राष्ट्रीय प्रतिमा निर्माण करण्यात सोशल मिडियासह चॅनेल्सचा मोलाच हातभार होता.  भारताच्या सगळया समस्यांची उत्तरे मोदींज़वळ आहेत, असे संदेश वर्षभर सगळीकडे फिरत होते. मोदींची सभा देशात कुठेही होवो, ती थेट दाखविली जात होती. अर्थात त्यामागे पैसा फेकला जात होता. मोदींनी सभेत वाक्ये फेकायची आणि लगेच चॅनेलवाल्यांनी ती झेलायची, असे वर्षभर चालले. सोशल मिडीयाने तर मोदी नावाचा देवदूतच या भारतभूमीवर अवतरल्याचे म्हटले होते. आता मात्र त्याच सोशल मिडियात मोदींची बदनामी सुरु झाली आहे. अर्थात तरुणाई सध्या जे मोदींविषयी सोशल मिडियातून बोलत आहे ते उत्सर्फतपणे व भ्रमनिरास झाल्याने आपली मते व्यक्त करीत आहेत. मोदींच्या गेल्या वर्षाच्या काळात देशातील गरीब हा अधिक गरीब झाला आहे. भ्रष्टाचार निपटण्याचा वादा देखील खोटाच ठरला. भ्रष्टाचार कुठेच कमी झालेला दिसत नाही. सध्याच्या सरकारने घेतलेल्या निर्णयातून भ्रष्टाचार झाला का हे भविष्यात समजणार आहे. लगेचच एका वर्षात ही बाब काही नजरेत येणार नाही. डॉ. मनमोहनसिंग यांच्या काळात झालेला भ्रष्टाचार हा त्यांच्या शेवटच्या दोन वर्षात प्रकर्षाने उघड झाला होता. सर्वसामान्य जनतेला आजही सरकारी कामे करण्यासाठी मग तो साधा एखादा कागदपत्र असो, तो मिळविण्यासाठी शंभराची किंवा पाचशेची नोट ही पुढे सरकवावी लागतेच. ही स्थीती जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत भ्रष्टाचारमुक्त आपण झालो असे म्हणता येणार नाही. जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी सरकार देशातील भांडवलदारांवर सवलतींची बरसात करीत आहे. याचाच एक भाग म्हणून जमीन सुधारणा कायदा सरकारने आणला आहे. यापूर्वीच्या सरकारने शंभर वर्षापूर्वीच्या कायद्यात सुधारणा करुन याबाबतचा नवीन कायदा केला होता त्यात शेतकर्‍यांचे हीत जपण्यात आले होते. देशातील डाव्या पक्षांनीही त्याला म्हणूनच पाठिंबा दिला होता. मात्र आता मोदी सरकारने हा कायदा पूर्णपणे बदलून भांडवलदारांच्या हीताचा केला आहे. त्याचबरोबर सरकारने मोठा गाजावाजा करुन सुरु केलेल्या प्रधानमंत्री जनधन योजना, अटल पेन्शन योजना व प्रधानमंत्री विमा योजना या सर्व योजना म्हणजे यापूर्वीच्या सरकारच्याच योजना नव्याने पॅकेजिंग करुन बाजारात आणल्या आहेत. या योजना यापूर्वीही होत्या. यात नव्या सरकारची नाविण्यपूर्ण एकही योजना नाही. अशा प्रकारे मोदी सरकार जनतेची दिशाभूल करीत आहे. पंतप्रधानांनी गेल्या वर्षातील ५० दिवस विदेशात घालविले आहेत. त्यांच्या दौर्‍याच्या खर्च आता हजार कोटींच्या घरात गेला आहे. मग हेच मोदी डॉ. मनमोहनसिंग विदेश दौर्‍यावर जात त्यावेळी टीका का करायचे असा प्रश्‍न उपस्थित होतो. एकूणच पाहता यापूर्वीचे कऑँग्रेस सरकार व मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकार यात काडीमात्र फरक नाही. उलट भाजपाचे सरकार उघडउघडपणे भांडवलदारांच्या बाजुने उभे राहून कष्टकरी व श्रमीकांविरोधी भूमिका घेत आहे. मोदींचे एक वर्ष सरले आहे. यामुळे जनतेच्या जीवनात काडीमात्र बदल झालेला नाही. उलट महागाई जास्त वाढली आहे. जनतेला आता खरे काय ते व भाजपाचा मुखवटा स्पष्टपणे दिसला आहे.
--------------------------------------------------

0 Response to "वर्षपूर्ती साजरी करताना..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel