-->
स्मारकाच्या वादाचे वादळ

स्मारकाच्या वादाचे वादळ

संपादकीय पान गुरुवार दि. १९ नोव्हेंेबर २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
स्मारकाच्या वादाचे वादळ
शिवसेनेचे संस्थापक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तीमत्व हे वादळी होते. आता त्यांच्या निधनानंतर उभारण्यात य्ेणार्‍या त्यांच्या स्मारकालाही वादाचे वादळी तडाखे बसण्यास सुरुवात झाली आहे. बाळासाहेबांच्या तिसर्‍या स्मृती दिनाचे निमित्त साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या समवेत यासंबंधीची घोषणा पत्रकार परिषदेत केली. बाळासाहेबांच्या या नियोजित स्मारकासाठी समुद्रकिनारी असलेला व मुंबई महापौरांचे निवासस्थान असलेला ऐतिहासिक वास्तू असलेला बंगला निवडण्यात आला आहे. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या सध्या नरिमन पॉईंट येथील स्मारकाच्या धर्तीवर बाळासाहेबांचे स्मारक उभारले जाणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीगर केले आहे. बाळासाहेबांच्या या स्मारकासाठी एक ट्रस्ट स्थापन करण्यात येणार असून त्याच्या अध्यक्षस्थानी उध्दव ठाकरे असतील. त्याचबरोबर शिवसेनेतील पदाधिकारी, भाजपाचे नेते व विरोधी पक्षांचे नेते असतील असे सांगण्यात आले आहे. सध्याच्या महापौरांचे निवासस्थान असलेला हे ठिकाण म्हणजे दादर चौपाटीच्या किनारी वसलेले आहे. त्यामुळेच राज ठाकरे यांनी महापौरांचा हा बंगला हडप करण्याचा डाव असल्याचे जाहीरपणे म्हटले आहे. एकूणच पाहता ठाकरे घराण्यातील वाद या निमित्ताने उफाळून वर आल्याचे स्पष्ट दिसते. बाळासाहेबांचेही स्मारक काही काळ वादात राहिल असेच दिसते. मुंबईच्या महापौरांचे निवासस्थान आता राणीच्या बागेतील मोकळ्या जागेत हलविण्याची योजना असल्याचे समजते. एकूणच पाहता मुंबईच्या महापौरांची निवासस्थानाची ऐतिहासिक वास्तू आता इतिहासजमा होणार आहे. खरे तर बाळासाहेबांचे स्मारक या बंगल्यात उभारण्याची गरज होती असे नव्हे. एक तर हा बंगला ऐतिहासिक वास्तू असल्याने यात सुधारणा करण्यासाठी अनेक मर्यादा येणार आहेत. शिवाजी महाराजांचे उभारण्यात येणारे अरबी समुद्रातील स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे इंदू मिल येथील स्मारक व आता उभारण्यात येणारे बाळासाहेबांचे स्मारक उभारताना त्या संबंधित महापुरुषांचे व्यक्तीमत्व, त्यांचे विचार याचा प्रसार व्हायला मदतकारक ठरले पाहिजे. बाळासाहेब हे राजकारणी नंतर होते. त्यांचा विचार करताना ते पहिले एक उत्कृष्ट व्यंगचित्रकार, पत्रकार व नंतर राजकारणी म्हणून त्यांचा विचार होतो. आपल्या व्यंगचित्रांच्या आधारावर त्यांनी मराठी माणसास जागे केले. यातूनच पुढे शिवसेनेचा जन्म झाला आणि कालांतराने शिवसेना या संघटनेचे राजकीय पक्षात रुपांतर झाले. सुरुवातीस मराठी माणसांच्या हक्कांसाठी झगडणारी ही शिवसेना हिंदुत्वाचे कंकण हातात घेऊन पुढे राज्यात सत्तेत आली. अर्थात या सर्वांच्या मागे बाळासाहेब ही एकमेव व्यक्ती होती. बाळासाहेबांनी राजकारण केले खरे परंतु पारंपारिक राजकारणाला छेद दिला. जातीपातीचे त्यांनी कधीच राजकारण केले नाही. जात पाहून कधीच कोणाला निवडणुकीत उभे केले नाही. यातून तळागाळातले कार्यकर्ते शिवसेनेचे नगरसेवक, आमदार, खासदारही झाले. बाळासाहेबांनी पक्षीय राजकारण करीत असताना विविध पक्षात अनेक नेत्यांची त्यांची वैयक्तिक मैत्री होती. अनेक कलाकार, चित्रकार यांच्यात ते राजकारणाच्या पलिकडे जाऊन रमत. अशा या बाळासाहेबांचे स्मारक उभारताना त्यांचे केवळ फोटो लावून स्मारक उभारणे अयोग्य ठरेल. बाळासाहेब हे व्यंगचित्रकार होते त्यामुळे त्यांच्या नावाने कलाविषयक संस्था स्थापन करणे, या क्षेत्रात येणार्‍या तरुणांना या संस्थेच्या मार्फत प्रोत्साहन देणे अशा प्रकारच्या कामाला प्राधान्य देणे अधिक उचित ठरणार आहे. बाळासाहेबांचे खरे तर स्मारक इमारतीच्या रुपाने उभारवयाचे असेल तर त्यांचा मातोश्री हाच बंगला योग्य होता. कारण ज्या इमारतीने बाळासाहेबांच्या ़आयुष्यातील क्षण टिपले, ज्या इमारतीत अनेक लोकांनी बाळासाहेबांच्या भेटी गाठी घेतल्या त्या मातोश्रीलाच स्मारक होण्याचा खरा मान मिळावयास पाहिजे होता. स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांना ज्या निवासस्थानी शेवटच्या गोळ्या घातल्या त्या निवासस्थानीच त्यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. यासाठी बाळासाहेबांच्या वासरदारांनी पुढे येऊन मातोश्रीवर स्मारक उभारण्याचा प्रस्ताव दिला पाहिजे होता. कारण मातोश्रीत आजही गेल्यावर बाळासाहेबांचे अस्तित्व ते आज त्या ठिकाणी ते नसले तरी जाणवते. बाळासाहेबांनी शेवटचा श्‍वास याच इमारतीत घेतला होता, हे तमाम शिवसैनिक व महाराष्ट्रातील जनता विसरु शकत नाही. मातोश्रीतील स्मारक हे अधिक जीवंत ठरले असते. उध्दव ठाकरे यांनी खरे तर या कामी पुढाकार घेतला असता ते अधिक संयुक्तीक झाले असते. परंतु तसे न झाल्याने आता या स्मारकाला देखील वादाचे वादळी तडाखे बसतील असे दिसते.
-----------------------------------------------------------

0 Response to "स्मारकाच्या वादाचे वादळ"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel