-->
संपादकीय पान शनिवार दि. १ नोव्हेंेबर २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
इबोलाचे जागतिक आव्हान
---------------------------------
गेल्या शतकात ज्या विविध साथींच्या रोगांची आव्हाने जगापुढे होती त्याचे प्रमाण आता कमी झाले असले तरीही ही आव्हाने पूर्णपणे संपुष्टात आली असे नव्हे. गेल्या तीन दशकांपूर्वी एडस्‌चा धोका होता. आता त्यावर बर्‍यापैकी नियंत्रण मिळविण्यात यश आलेले असताना इबोला या विषाणूजन्य रोगाने थैमान घातले आहे. याचा प्रार्दुभाव प्रामुख्याने पश्चिम आफ्रिकेतल्या सिएरा लियोन, गयाना, सेनेगल आणि लायबेरिया या देशांमध्ये झाला आहे. या देशांमधला मृतांचा आकडा साडेचार हजारांच्या घरात गेला आहे, सुमारे १० हजार जण बाधित झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे आकडे सांगतात. इबोला हा विषाणुजन्य रोग आफ्रिकी देशांसाठी नवीन नाही. परंतु यावेळी रोगाचे बदललेले स्वरूप त्याला नियंत्रण घालणारी यंत्रणा अपयशी ठरल्याने परिस्थिती गंभीर झाली. इबोलाचा पहिला संसर्ग झाला तो आफ्रिकेतच १९७५ मध्ये झैरे या देशात. बरीच वर्षे हा रोग नियंत्रणात होता. पण २०१२ पर्यंत आफ्रिकेत २४ वेळा इबोलाची साथ येऊन गेली आहे. मात्र गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात या रोगाने पुन्हा एकदा डोके वर काढले. त्याने आफ्रिकेसह अमेरिका, युरोपमध्ये झेप घेतल्याने हाहाकार माजला. पश्चिम आफ्रिकेत इबोलाचा प्रसार होण्यामागे बरीच कारणे आहेत. आफ्रिकेतील यापैकी बरेच देश गेली १० वर्षे यादवीत होरपळत आहेत. देशांतर्गत संघर्षामधून बाहेर पडलेल्या या देशांची अर्थव्यवस्था अतिशय कमकुवत आहे. शिवाय गरिबी, बेरोजगारी आणि निरक्षरता या इथल्या प्रमुख समस्या आहेत. नेमक्या याच समस्या इबोलाचा फैलाव वेगाने पसरण्यासाठी कारणीभूत ठरल्या आहेत. साधारणत: नऊ महिन्यांपूर्वी गयानात जेव्हा पहिल्यांदा इबोलाचा प्रसार झाला त्या वेळी तो एवढा उग्र रूप धारण करेल याची कोणी कल्पनाही केली नव्हती. सियरा लियोन, गयाना, सेनेगल या देशांना तर इबोला या रोगाबद्दल फारशी माहितीही नव्हती. या देशांमधली आरोग्य यंत्रणा मुळात अशक्त आहे. त्यामुळे सुरुवातीच्या काळात आरोग्य मोहिमा सुरू करायला इथल्या शासन यंत्रणांनी फार विलंब केला आणि परिणामी इबोलाने या देशांमध्ये हातपाय पसरले. निरक्षरतेमुळे अंधश्रद्धांचा प्रचंड पगडा इथल्या जनमानसावर आहे. त्यामुळेच हा रोग भानामतीचा प्रकार नसून तो खरा आहे हे मानायलाच मुळी इथली जनता तयार नव्हती. अंधश्रद्धेला चिकटलेल्या इबोलाच्या अनेक कहाण्या आणि अफवा इथे पसरल्या होत्या. त्यामुळेच लोकांमध्ये इबोला हा रोगच आहे आणि त्याच्यावर उपचार घेण्यासाठी आरोग्य शिबिरांमध्ये दाखल होणे अत्यंत गरजेचे आहे हे पटवून देणे हे इथल्या शासन यंत्रणांपुढे मोठे आव्हान होते. कारण जनजागृती केल्यानंतरही बराच काळ लोक रुग्णांना गावात फिरणार्‍या आरोग्य सेवकांपासून लपवून ठेवत. जर एखादा रुग्ण आरोग्य सेवकांनी आरोग्य शिबिरांमध्ये दाखल केलाच तर त्याला मारहाण करायला हे लोक मागेपुढे पाहत नसत. लोकांमध्ये या अंधश्रद्धांच्या प्रचंड पगड्याची या देशांना मोठी किंमत मोजावी लागली. गेल्या डिसेंबरमध्ये गयानामध्ये पहिल्यांदा जेव्हा इबोलाच्या फैलावाला सुरुवात झाली तेव्हा सियरा लियोनमधल्या एका मांत्रिक बाईने आपल्याकडे या रोगावर उपचार असल्याचं सांगितलं आणि मग इबोलाग्रस्त रुग्णांची तिच्याकडे रांग लागली. त्यांच्या संपर्कात येऊन त्या मांत्रिक बाईचा मृत्यू झाला आणि तिच्या अंत्यसंस्कारांचे सोपस्कार करणार्‍या १५ महिलांना इबोलाची लागण झाली आणि मग अल्पावधीतच सियरा लियोनमध्ये इबोलाचे तांडव सुरू झाले. रोग्याला घरातच दडवण्याच्या वृत्तीमुळे या रोगाने उग्र रूप धारण करून गावाच्या गावं गिळंकृत करायला सुरुवात केली. आफ्रिका खंडातल्या, विशेषत: ग्रामीण भागातल्या लोकांच्या दैनंदिन आहारात वटवाघळं, माकडं किंवा या वर्गातल्या जंगली प्राण्यांचं मांस हा एक मोठा घटक आहे. इबोलाचा विषाणू हा मुख्यत: याच प्राण्यांच्या शरीरात असतो. त्यांची शिकार करणार्‍यांना हे प्राणी जखमी किंवा मेलेल्या अवस्थेत आढळले तर शिकारीचे कष्ट वाचतात आणि आयते मांस मिळते म्हणून ती त्यांना पर्वणी वाटते. वर्षानुवर्षे या प्राण्यांची शिकार, त्यांच्या मांसाची विक्री आणि त्याचा आहारात समावेश या टप्प्यांतून इबोला आफ्रिकेत पसरत गेला. त्यामुळेच इबोलाला सुमारे ५० वर्षांचा इतिहास आहे असंच म्हणावं लागेल. वटवाघळाचं मांस पिढ्यान्पिढ्या खात आहोत, त्यामुळे त्याच्या सेवनाने हा रोग होऊच शकत नाही अशी इथल्या माणसांची धारणा होती आणि हीच धारणा आज त्यांच्या जिवावर उठली आहे. त्यातच वटवाघळाचं मांस खाऊ नका अशी जनजागृती करणारी एकही मोहीम इथं अलीकडेपर्यंत राबवली गेली नव्हती, हेही हा रोग पसरण्यामागचे एक कारण आहे. जून, जुलैत या देशांतली इबोलाची स्थिती इतकी गंभीर झाली की अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी आणि संस्थांनी आपल्या कर्मचार्‍यांना तत्काळ देश सोडायला लावले. आपली कार्यालयेही बंद केली. पण जे धैर्याने तिथे राहिले त्यांच्याही मनात भीती होतीच. मृत्यूचे एवढे तांडव सुरू असतानाही सरकारी यंत्रणांचा पैसा अगदी धीम्या गतीने फिरत आहे. या साथीमुळे गावेच्या गावे ओस पडली आहेत. त्यामुळे यंदाच्या मोसमात तिथे पेरणी झाली नाही. परिणामी पुढच्या वर्षी इथं अन्नटंचाईचं मोठं संकट उभं राहणार आहे. शिवाय अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी आपला गाशा गुंडाळण्यास सुरुवात केल्याने त्याचे परिणाम या देशांच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहेत. या देशांमधील सामाजिक व्यवहारही विस्कळीत झाले असून हात मिळवणे, मिठी मारणे यासारख्या औपचरिकतांची जागा आता कोपर मारण्याने घेतली आहे. एकमेकांचा स्पर्शही नकोसा झालेल्या इथल्या माणसांचा एकमेकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून गेला आहे. इबोलाने आफ्रिका अस्वस्थ केली आहे हे एक मोठे जागतिक आव्हान ठरावे.
------------------------------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel